” चंद्रा “

       चंद्रा , नावाप्रमाणेच सुरेख दिसायची ती. 
रूप रंग छानच  होता. स्वभावाने साधी,  सरळ मनमिळावू . कुणाला घालून पाडून बोलणे तिला कधी सुचयचेच नाही. कुणी काही बोललं, रागावलं, तर सगळं निमूट पणे ऐकून घ्यायची. डोळ्यातली आसवं पुसून परत आपल्या कामी लागायची. इतरांच्या वागण्याचे दुःख व्हायचे पण ती सगळं निमूटपणे सहन करायची. थोड्याच वेळात सगळं विसरून जायची. नेहमी चेहऱ्यावर हास्य ठेवायची. पण तिच्या साध्या सरळ स्वभावाचा गैरफायदाही घेणारे खूप असायचे. त्यासाठी ती आपल्या नशबालाच दोष द्यायची. म्हणायची देवानं माझा स्वभावच असा बनवला तर त्यात माझा काय दोष. माझ्या नशिबात जे जे असेल ते सगळं मी सहन करायला तयार आहे. होऊ दे जे व्हायचं ते. मी करील सगळं सहन.

       आई वडील ही तिचे गरीबच होते. मजुरी करून कसे बसे पोट भरायचे. परिस्थितीनुरूप त्यांनी तिचे लग्न सर्वसाधारण घरात दिनकर रावाशी करून दिले. दिनकररावचे स्वतःचे छोटेशे किराणा दुकान होते. दुकान बऱ्यापैकी चालत असल्याने घर व्यवस्थित चालायचे. प्रपंच चालून थोडी बचत पण व्हायची. दिनकरराव कधी बाहेर कामानिमित्त गेले तर चंद्रा दुकान सांभाळायची. त्यामुळे दुकान असे कधी बंद राहत नसे. त्यामुळे दुकानात काही स्थायी ग्राहक तयार झाले होते.

       घरात सासू सासरे एक नणंद आणि हे दोघे. असा पूर्ण भरलेला परिवार होता. नणंदेचे लग्नाचे वय झाले होते. दिनकररावनी एक साधारण घरातला मुलगा शोधून तिचे लग्न करून दिले. ती पण आता सुखात होती. सासू सासरे म्हातारे असल्याने त्यांचा सम्पूर्ण भार दिनकररावावरच होता.

        होता होता त्यांच्या सुखी संसारात दिनेश आणि राजेश या त्यांच्या दोन मुलांचे आगमन झाले. हळू हळू मुलं ही मोठी होत होती. दुकानाची भरभराट होत होती. आता दुकान थोडे मोठे झाले होते. तीन चार माणसे दुकानात कामाला होती.  पैशाची आवक वाढली होती.   अचानक एक दिवस थोड्या आजाराने सासरे वारले. त्यांच्या पाठोपाठ सासूही वारली. आता घरात चारच लोक उरले होते. दोन्ही मुले  हळू हळू मोठी होत हाती. मुलांचे करता करता चंद्रा दिवसभरात थकून जायची. मुलं मात्र खूप हट्टी आणि जिद्दी होती.  चंद्राला ते खूप त्रास द्यायचे. त्याचा चंद्रा ला खूप त्रास व्हायचा. पण ती सगळा त्रास सहन करायची. म्हणायची आपलेच दात आणि आपलेच ओठ, जे नशिबात आहे ते तर भोगायलाच पाहिजे. नवऱ्याच्या चांगल्या स्वभावामुळे ती आपले दुःख विसरून जायची.  दिनकरराव चा पूर्ण दिवस दुकानातच जायचा. त्यामुळे त्यांना मुलांकडे लक्ष द्यायला वेळच मिळत नसे. त्यामुळे त्यांचे मुलाकडे दुर्लक्ष होत होते. त्यामुळे मुलं कसेबसे चढत उतरत दहावा वर्ग पास झाले. पुढे कॉलेजच्या नावा खाली ते नुसते भटकत असायचे. अभ्यासाचे तर नावच घेत नसत. त्यांची मित्रांची संगतही ठीक नव्हती. हळूहळू मुलं बिघडतच गेली. दिनकर राव मुलांच्या वागणुकीने कंटाळले होते. शेवटी त्यांनी दोघांनाही दुकानात मदती साठी घेतले. पण दुकानातही ते कधी आले तर आले, नाही तर काही बाही कारण सांगून गायब व्हायचे. मुलं पुरते बिघडले होते. दिनकररावांना काय करावे ते कळतच नव्हते.

       आता वयोमानाप्रमाणे दिनकर रावनाही दुकानाचा व्याप सांभाळणे कठीण होत होते. मुलांची सदा काळजी लागली असायची. सकाळी घरातून गेलेली मुलं रात्री केव्हा परत यायची ते कळत नव्हते. दुकानात यायचे ते फक्त गल्ल्यातून पैसे घ्यायसाठी तेवढे यायचे. एकदिवस अचानक दिनकररावना हृदयविकाराचा झटका आला आणि त्यातच ते निघून गेले.

       आता सगळा भार चंद्रावरच येऊन पडला. चंद्रा एकटी पडली होती. तिला घर बघू की दुकान बघू की काय बघू असे होऊन गेले. हळू हळू दुकानाची व्यवस्था कोलमडायला लागली. जेही दुकानातून पैसे यायचे ते मुलं भांडण करून घेऊन जायचे. आता ते फक्त पैसे घेण्यासाठी तेवढे घरी यायचे. पैशाच्या अभावामुळे दुकानात माल भरणे पण कठीण झाले होते. जुन्या घेतलेल्या मालाची उधारी वाढत होती. त्यामुळे नवीन माल द्यायला कोणीच तयार नव्हते. मुलांना काही सांगायला जावे तर तेच तिच्यावर आरडाओरड करायचे. सगळे दुकान तुझ्यामुळेच बसले असा दोष तिला द्यायचे. घरात खूप भांडण करायचे. तिला मारहाण करायचे. त्यामुळे चंद्राची मानसिक स्थिती  ही बिघडत चालली होती. त्यात देणेदार वसुली साठी सारखे चकरा लावत होते. देणेदारांची रक्कम वाढतच होती. त्यांचा तगादा आता सहनशक्ती च्या बाहेर झाला होता. शेवटी व्हायचे तेच झाले. देणेदाराने घर आणि दुकानावर कब्जा केला. चंद्रा बेघर झाली. तिचे मानसिक संतुलन पूर्णतः बिघडले. कोणीच तिला आधार द्यायला तयार झाले नाहीत. आणि चंद्रा रस्त्यावर आली. मुले तर केव्हाच गायब झाले होते. त्यांना कशाचीच काळजी नव्हती. त्यांच्यात माणुसकीच उरली नव्हती.

        चंद्रा आता रस्त्याच्या कडेला कुठे तरी बसून रहायची. तिला कशाचेच भान उरले नव्हते. कुणी काही दिलं तर खायची नाही तर उपाशी तशीच शून्यात नजर लावून बसून रहायची. भिकार्याहूनही वाईट स्थिती तिची झाली होती. तिचे दोन दोन मुले असून सुद्धा ती बेवारस झाली होती. आजाराने पछाडली होती. तिच्याकडे कोणीच लक्ष देत नव्हते. कित्येक दिवसात तिने आंघोळ बघितली नव्हती. शरीरावर मातीचे थर जमा झाले होते. अंगावरचे कपडे जीर्ण झाले होते. 

        थंडीचे दिवस होते ते. एक समाजसेवी संस्थेचे कार्यकर्ते गरिबांना, बेवारस लोकांना ब्लॅंकेट वाटपाच्या कार्याला रात्री निघायचे आणि गरजूंना ब्लॅंकेट वाटायचे. अशाच एका कार्यकर्त्याच्या दृष्टीस चंद्रा पडली. त्याने आपल्या इतर मित्रांना तिची ती हकीकत सांगितली. शेवटी संस्थेने निर्णय घेतला आणि तिला तिथून उचलून आणले. तिची आंघोळ करून नवीन कपडे तिला घातले. डाक्टर कडे नेऊन इलाज करवला आणि तिला वृद्धाश्रमात पोचवले. त्यासाठी लागणारी सर्व करवाई त्या संस्थेनेच केली. आज आता चंद्रा वृद्धाश्रमात कुठेतरी कोपऱ्यात शून्यात नजर लावून  आपल्या मुलांची वाट बघत बसलेली असते.  कधी येतील तिची ती मुलं.

Sanjay Ronghe
Nagpur

Leave a Reply

Fill in your details below or click an icon to log in:

WordPress.com Logo

You are commenting using your WordPress.com account. Log Out /  Change )

Twitter picture

You are commenting using your Twitter account. Log Out /  Change )

Facebook photo

You are commenting using your Facebook account. Log Out /  Change )

Connecting to %s

This site uses Akismet to reduce spam. Learn how your comment data is processed.