दाटले डोळ्यात अश्रू

दाटले डोळ्यात अश्रू
परी थेंब एक गळेना ।
ओठात थांबले शब्द
जिव्हा ही का वळेना ।

क्षण दुःखाचे भोगतो
नशिबाचे का कळेना ।
भावना ही या सरल्या
पीडा पाठची टळेना ।

शोधतो सुख दुःखात
का मज तेही मिळेना ।
दिले दुःखच मी पेटवून
तरीही का ते जळेना ।
Sanjay R.

” टोचला काटा माझ्या पायात “

टोचला काटा माझ्या पायात
काढू कसा मी तर वाटेत ।

चालता येईना मज आता
हात घ्या राया थोडा हातात ।

सलतो कसा हो तो छातीत
केलंय घर त्यानं पायात ।

उठु ना देई तो बसू ना देई
लक्षच माझे हो त्याच्यात ।

कुणीतरी काढा हळूच जरा
आसवं आलेत ना डोळ्यात ।

उशीर होतोय हो जायाला
अडकले मी या काट्यात ।
Sanjay R.

” प्रेम ज्याचे नाव “

कसे असावे सांगा ते गाव
प्रेम आहे ज्याचे  हो नाव ।


पाहिले तुजला तिथेच मी
घेतला माझ्या मनाचा ठाव ।


उरलोच नाही मीच माझा
असेल प्रेमाचाच हा प्रभाव  ।


मागू कुणास मी आता काय
तुलाच मागतो मला तू पाव ।


स्वप्न मी बघतो एकच आता
अग तू माझी तुझा मी राव ।
Sanjay R.

शब्दांची किमया सारी

शब्दांना हवी वाचा
नकोच ते मुके ।
होते विरळ सारे
नात्यातले धुके ।

शब्द करी अनर्थ
कधी कोणी चुके ।
शब्दांना हवी गोडी
नाते तिथेच टिके ।

शब्दांची किमया सारी
मग पाषाण ही झुके ।
जोडतो बंध मनाचा
दुःखही वाटे फिके ।
Sanjay R.

” नाकावरती रुमाल “

तंत्रज्ञानाची कमाल
होईल सगळीच धमाल ।
हवेच्या प्रदूषणाला
नाकवरती रुमाल ।
अंधार घालवाया
पेटवायची मशाल ।
सोसवत नाही थंडी
ओढायची शाल ।
पावसाचा बचाव
टाकायची तिरपाल ।
असेल पैसा तर
बांधायचा महाल ।
लाजताना होतात ना
गुलाबी गुलाबी गाल ।
रंगात दिसतो उठून
रंग एकच लाल ।
माणूसच माणसाचे
करतो किती हाल ।
त्यासाठी हवी आता
तलवार आणि ढाल ।
घोड्याच्या टाचेला
लावतात ना नाल ।
सुधारेल का जग
की तिरपिच राहील चाल ।
जगा आणि जगू द्या
करू नका बेहाल ।
Sanjay R.

” ओंजळ “

नको कुणाला सुख
असते दुःखच पाठी ।
नशिबाचा फेर सारा
बांधून दुःखाच्या गाठी ।

सोडवू कसे स्वतःला
करते दुःखच दाटी ।
दिवस रात्र करतो यत्न
पळतो सुखाच्या साठी ।

सुख म्हणे जसे पाणी
नाही प्रत्येकाच्या वाटी ।
ओंजळीत मावेल किती
करू कशी ती मी मोठी ।
Sanjay R.

” आयुष्य शंभर वर्षाचे “

लाभले आम्हा का जर
आयुष्य शंभर वर्षाचे ।
होऊन जख्ख म्हातारे
सांगा कसे हो जगायचे ।

ना होणार धड चालणे
जागेवरून कसे उठायचे ।
कळेल का कुणास बोलणे
प्रश्न असेल कसे बोलायचे ।

डोळे झाले आताच कमजोर
चष्मास कसे हो शोधायचे ।
कान होतील बधिर किती
मग नको नको ते ऐकायचे ।

दात नसेल एकही मुखात
काय कसे ते चावायचे ।
नको नको ते म्हातारपण
जगू दे असेच मज जगायचे ।
Sanjay R.

भीती आम्हास कुणाची

भीती आम्हास कुणाची
वाटे आमच्याच मनाची ।
अंतरात दडून सारे
येते आठवण तयाची ।

भीती दाखवी कोणी कधी
दयनीय स्थिती हृदयाची ।
लागे मग सदा काळजी
मंद गती होई श्वासांची ।

नको दाखवू तू रे भीती
सावली तुजवर स्वार्थाची ।
निर्भय आम्ही झालो आता
भीती न उरली चरितार्थाची ।
Sanjay R.

” हवी साथ मला “

हवी साथ मला
हवा हात मला ।
नको एकटेपणा
सांगू कसे तुला ।

आठवतात क्षण ते
हसवायचो मी तुला ।
इश्य तुझ्या गालावर
लाजवायचो मी तुला ।

लटकाच तुझा राग
व्हायचा मग अबोला ।
वेन्धळा मी हा असा
फसायचो मीच तुला ।

तुझ्याविना करमेच ना
विसरेल कसा मी तुला ।
आठवणींच्या सागरात
काठ हवा तुझा मला ।
Sanjay R.

भावनांचा खेळ सारा

भावनांचे खेळ सारे
हवेहवेसे सुखाचे वारे ।

काळोख गर्द दाटता
लुकलूक करती तारे ।

आभास जसा होई
चाले कुणास इशारे ।

जगतो चन्द्र रात्रीचा
चांदण्या देती पहारे ।

आली थंडी आता
येई अंगावर शहारे ।
Sanjay R.

” विचारांचे करूच काय “

विचारांचे करूच काय
काहीही येतील ते मनात ।
विळून जाते आभाळ सारे
पाऊस पाडून एक क्षणात ।

नको नको ते विचार येई
असेल नसेल जे जे ध्यानात ।
मनही पोचते मग चंद्रावर
कधी तरंगते त्या गगनात ।

होते कधी उलथापालथ
नसते कुठे काहीच कशात ।
सारेच मिळते जगायाला
बघतो मी जेही स्वप्नात ।

तुटून जाते स्वप्न मधेच
राहते सारेच मग हृदयात ।
उदास होते मनही मनात
अश्रू दिसती या डोळ्यात ।
Sanjay R.

” कसा विसरायचा भूतकाळ “

कसा विसरायचा भूतकाळ
आठवणींचा तो जाळ ।
एक एक आठवण तूझी
रात्रीची होते मग सकाळ ।
अस्वस्थ होते मग मन
वाटते तुटलीच कशी ही नाळ ।
सोबत वाटायची तुझी
डोक्यावर रक्षक हे आभाळ ।
ढगातून बरसते पाणी जेव्हा
वाजतात घण घण सारे टाळ ।
नमते मस्तक खाली
का नात्याला नात्याचाच विटाळ ।
Sanjay R.

” नको निरोपाची भाषा “

नको निरोपाची भाषा
आहे मनात किती आशा ।

असतो बघत वाट मी
विचारांना कुठे असते दिशा ।

सुरू असते थैमान डोक्यात
जाते उलटून तसीच निशा ।

शब्द दोनच हवेत मजला
सोडेल कशी मी ती आशा ।
Sanjay R.

उत्तर मग देता येत नाही

कामाचा गराडा इतकाकी
उत्तर मग देता येत नाही ।


मनात तर असते खूप सारे
वाटतं लिहावे शब्द काही ।

लिहायचे काय सुचतही नाही
विचार पडतो मग असाही ।

त्यातच जातो विसरून सारे
हरवून जातो मग तुझ्यातही ।
Sanjay R.

” फिरू नको मागे “

हरू नको पाखरा
फिरू नको मागे ।
उठ जरा डोळे उघड
जग झाले जागे ।

बघ जरा कोण कुठे
जायचे तुजला पुढे
पसर थोडे तुझे पंख
ढगही आकाशात उडे ।

नको गर्व कशाचा
आहे पुढेच ही वाट ।
संकटाला सार मागे
आहे दुष्टांशी गाठ ।
Sanjay R.

” वेळेची काय किंमत “

वेळेची काय किंमत
कधी होते मग गम्मत ।
वाराती मागून घोडे येते
मग वाटते थोडी जम्मत ।

वेळ ठरते कधी भेटीची
सगळेच होतात सम्मत ।
पण येत नाहीत वेळेवर
वाट बघून तुटते हिम्मत ।

स्टॅंडर्ड टाइम म्हणतात ना
चालतो तो थांबत थांबत ।
सारेच होते उशिरा मग
वेळ जातो असाच लांबत ।

वेळेचे महत्व कुठे कुणाला
गप्पा बसतात सांगत ।
इतरांचा होतो तितम्बा
राहतो आपणच रांगत ।
Sanjay R.

” नाही भावनेच्या खुणा “

जाऊ नको पुन्हा
होईल तो गुन्हा ।
मार्गच तो वेगळा
जरी असेल जुना ।
नसेल कोणी तिथे
असतो सुना सुना ।
विचारून बघ जरा
तू आपल्याच मना ।
असेल जरी नाते
नाही भावनेच्या खुणा ।
काळीज उरले कुठे
म्हणे असेल ते छिना ।
Sanjay R.

” काम “

झाले गेले सरले काम
परत तिकडे जाणार नाही ।


थकून गेले आता मी
वळून मागे बघणार नाही ।


दिवसभर कामाचा डोंगर
श्वास घ्यायला फुरसत नाही ।


जो तो येऊन करतो कचरा
कामाची माझ्या किंमत नाही ।


पाणी पाणी होतो जीव
का तुम्हाला कळत नाही ।


दिवसभर चालते काम
आयुष्यभर सम्पत नाही ।
Sanjay R.

गीत गोड प्रकाशाचे

गाऊ चला गीत गोड प्रकाशाचे
तेज पसरले कसे पूर्ण चंद्राचे ।

धारा बरसते मधुर त्या अमृताची
गालात हसणे बघा चांदण्यांचे ।

धरला फेर कसा तो भोवताली
रूप अनोखे दिसे आज गगनाचे ।

रात्र आज बहरली कोजागिरीची
क्षण वेचते धरा हसत आनंदाचे ।
Sanjay R.

” रात्र प्रकाशाची “

रात्र होती प्रकाशाची
डोळे झाले जड ।
वाजत होती खिडकी
आवाज भड भड ।
भीती पण होती मनात
कशाची खड खड ।
निघेना आवाज मुखातून
वाटे धड धड ।
डोळे घेतले मग मिटून
श्वास गड बड ।
उठलोच नाही सकाळी
झाली रडा रड ।
टाकले नेऊन स्मशानात
झाली तडफड ।
बसलो उठून तसाच
डोळे होते जड ।
स्वप्नही पडतात कशी
सारेच अवघड ।
Sanjay R.