काय म्हणतोस तू

काय म्हणतोस  सांग तू रे,
गालात मी हसू कसे रे ।

जमेल कसे ते सांग मजला,
तुही मलाच फसवू नको रे ।

तोंडात नाही एकही दात,
हसताना ते दिसवू कसे रे ।

चष्म्याची काच ही भिंग झाली
डोळ्यांना माझ्या रुसवू नको रे ।

गालावरती पडल्या वळ्या
दिसते तुला ती खळी कुठे रे ।

कानही सांगू तीक्ष्ण किती ते,
आवाज वाटतो सूक्ष्म किति रे ।

डोक्यावरती टक्कल पडले
उडणारे ते केस कुठे रे ।

उठणे होईना बसणे होईना,
कंबर झुकली, उभेच राहवेना ।

तलवार गेली लाठी आली,
हातात काठी दिसते कशी रे ।

बोल म्हणतो गोड किती रे
बोबडे शब्द ओठच गाती रे ।

सोळाची मी, तू सताराचा
वय किती ते सांगू कशी रे।

म्हातारपण हे कुठे थांबते
खो खो करणे थांबवू कसे रे ।

लाल पिवळे रंग फासूनी
सुंदर आता मी दिसू कशी रे ।

वाट पाहते होईल कधी मी
आकाशाची चांदणी मी रे
Sanjay R.

छळ

गुंतलो किती नात्यात या
माझाच मी मज छळतो ।
अंतरात या यातना किती
का असा मी मीच जळते  ।
शोधू कुठे मी गार वारा
कशास असा रे मज छळतो ।
इथे शोधू की तिथे शोधू मी
जीवन कसे हे मीच  पळतो ।
थांबू कुठे मी बळ हे सरले
आकाशातला तयार ढळतो ।
Sanjay R.

भरारी

पंख लागलेत तुला
ये चल घे आता भरारी ।
करायचे क्षितिज पार
राहू नकोस उभा दारी ।
पंखात तुझ्या बळ किती
बघायची तुज धरा सारी ।
प्रत्येक क्षण एक वेगळा
झेलयचे बाण विषारी ।
Sanjay R.

नोंद

नकोच वाटते नोंद कशाची
काय काय ठेवायचे लक्षात ।
दूर नकोच वाटते सारे
हवे मजला सारे साक्षात ।
Sanjay R.

जाऊ नको दूर

जाऊ नको दूर
लागेना मग सूर ।

तुझ्याविना माझे
गाणे होते बेसूर ।

भिरभिर शोधी डोळे
मनही होते आतुर ।

हृदयास सांगू कसे
तेही होते फितूर ।

आग लागे अंतरात
थांबवू कसा धूर ।

आसवंही मग थांबेना
डोळ्यात येतो पूर ।
Sanjay R.

सुगावा

कळलेच नाही काही
लागेल कसा सुगावा ।
हाती लागले काही तर
त्यालाच उलटून बघावा ।
सुशोभित दिसते सारे
समोर असतो दिखावा ।
जर आत बघाल तर
धोंडाच हाती लागावा ।
हसण्यावर नेऊ नका
धोका दूरच असावा ।
प्रयत्न असतात सारे
मासा गळात फसवा ।
Sanjay R.

अडगळ घेते जागा

अडगळ घेते जागा
तोच दुराव्याचा धागा ।
घालावा दूरच जरासे
कसेही तयाशी वागा ।
उरलेच काय आता
कशास कुणास मागा ।
करूच नका विचार
चला कामास लागा ।
Sanjay R.

मन कधी हसते

डोळेच सांगून जातात
काय असते मनात ।
वारा थांबतो थोडा
बोलतो आपल्या कानात ।

मन कधी हसते
दिसते सारे चेहऱ्यात ।
वार असो कुठलाही
दुःख होते काळजात ।

शब्दांचे घाव कठीण
गाल मग रुसतात ।
वाचा होते अबोल
ओठ कुठे बोलतात ।

सुखाचा होताच पाऊस
क्षण आनंदाचे वेचतात ।
बदलून रूप आपुले
सगळेच सोबत हसतात ।
Sanjay R.

विचारांचे ओझे

मनाच्या अडगळीत दडले काय
ढीग विचारांचा करू मी काय ।

मनात आहे जे जे आता
आठवते सारेच जाता येता ।

फुलतो मनात कधी आनंद ।
दुःखही सारेच हृदयात बंद ।

कधी वाटते नकोच काही
लुप्त होतात दिशाही दाही ।

जीवनाची तर हीच दशा
कधी चढते कशाचीही नशा ।

अबोल होते कधी मन माझे ।
फिरतो घेऊन सारेच ओझे ।
Sanjay R.

जळते पणती

मनच झाले हे वादळ वारा
शमवू कसे कुठे किनारा ।

शांत करण्या हवा एकांत
सागर कधी का होतो शांत ।

लाटे वरती येईल लाट
नेई सारेच समुद्र अफाट ।

हवी मजला थोडी शांती
मिळेल केव्हा जळते पणती ।
Sanjay R.

गर्दी

विचारांची होते गर्दी
मोजू कसे त्यात दर्दी
पडतात मग स्वप्न सारे
जातो विसरून ती अर्धी ।
सांगू कुणास खरेखोटे
देऊ कुणास मीही वर्दी ।
पाश सारे गुंतले पायात
जीवनाची ही वाट अर्धी ।
उरले सुरले मनात सारे
सोसवत नाही अफाट गर्दी ।
Sanjay R.

स्वप्न मनातली

होतील कशी पूर्ण
स्वप्न या मनातली ।
निशे सवे जातील दूर
सत्यकथा आयुष्यतली ।
तळपतो जरी सूर्य
काय जादू ढगातली ।
धो धो पडतो पाऊस
शक्ती सांगा कुणातली ।
नको गर्दी अपेक्षांची
धुळमाती विचारतली ।
हसू खेळू थोडे आता
बघू गम्मत जीवनातली ।
Sanjay R.

काहीच कळेना

नकोच वाटते सारे
करावे काय ते कळेना ।

मनात विचार असंख्य
डोक्यातून ते वळेना ।

करू किती विचार
वेळही कशी टळेना ।

शून्यात लागली नजर
डोळेही आता ढळेना ।

पाठलाग करते मन
आग हृदयातली जळेना ।

मांडला मी हा खेळ
छळ म्हणता छळेना ।

जाऊ कुठे सांगू कुणा
काहीच मज कळेना ।
Sanjay R.

मन हे फुलले

मन हे फुलले
वाऱ्यावर झुलले ।

झाले मळभ दूर
आशेत ते खुलले ।

आस आता लागली
का तुझ्यात गुंतले ।

ओढ किती ही मनाला
अखेर तेच जिकले ।

नको आता काहीच
दुःखही तर सरले ।
Sanjay R.

मनात फुटली पालवी

मनात फुटली पालवी
रंग हिरवा हिरवा सारा ।
आभाळ आले दाटून
सर सर बरसती धारा ।
सूर्य लपला ढगाआड
आकाशात नाही तारा ।
रंगली कशी ही मैफिल
आता कुणीतरी विचारा ।
रंगात धुंद झालेत सारे
बघा निसर्गाचा पसारा ।
Sanjay R.

मनात फुटली पालवी

मैफिल

मंचावर कविता अवतरली
मैफिल तिथेच रंगली होती ।

भाव भावना व्यक्त होता
प्रगट सारेच करत होती ।

मन होते कुठे हळवे तर
कुठे आसवांची बरसात होती ।

होते सुखदुःखाचे रंग तयात
जगण्याची हीच रीत होती ।
Sanjay R.

वीण नात्याची

नको उसवूस वीण नात्याची
वाढेल घरघर जशी जात्याची ।

असेल आठवण एकेक क्षणाची
अवस्था असेल कशी मनाची ।

कुठे पडेल उनीव तुज कोणाची
असेल  सावली सदाच प्रेमाची ।

आईच तर देते पाखर मायेची
होशील तुही आई कधी मुलाची ।

लोटू नकोस दूर आहे आस घराची
अनमोल ही नाती आहेत जीवाची ।
Sanjay R.

जंगलातला पडका वाडा

एक पडका वाडा . खूप जुना असा तो वाडा. अगदी गावाच्या बाहेर गावापासून बराच लांब .

गावा पासून थोड्याच अंतरावर  जंगल सुरू व्हायचे आणी आत जंगलात तो वाडा होता . तिकडे जायला रस्ता पण नव्हता. कधी काळी रस्ता असावा पण आता तिकडे कोणीच जात नसल्याने रस्ता दिसेनासा झाला असावा.

जंगलाच्या एका बाजूने नदी वाहायची.  जंगली जनावरांचा तिथे वावर असल्याने सगळेच तिकडे जायला घाबरत असत. कुणालाही प्रश्न पडावा या जंगलात इतक्या आत कुणी कशाला बांधला असावा हा वाडा . कोण रहात असेल तिथे. मला कुतूहल निर्माण झाले आणि मग मी ठरवले या वाड्याबद्दलची माहिती काढायचीच. पण कुणीही त्या बद्दल माहिती देऊ शकले नाही. प्रत्यकजन हेच सांगायचा . बाबा तिकडे जाऊ नकोस. जो गेला तो मेला. परत कधीच नाही आला .  चुकूनही तिकडे जायचे नाही. प्राण संकटात द्यायचे नाही. 

प्रश्नाचे उत्तर भेटत नसल्याचे पाहून माझी उत्सुकता अजूनच वाढत होती. कोण सांगेल त्या वाड्याबद्दलची माहिती. मग मी काही गावातल्या जुन्या म्हाताऱ्या लोकांना विचारायचे ठरवले. पण तेही काहीच सांगू शकले नाही.  मग मात्र मी अस्वस्थ व्हायला लागलो. सारख वाटायचं आपणच जावं तिकडे आणि काही शोध लागतो का ते बघावं. पण मनातल्या भीतीचा विजय व्हायचा. आणि माझी हिम्मत तुटायची. अशी बरीच वर्षे निघून गेली.

मीही आता शहरात नोकरीला लागलो होतो. कामाच्या गराड्यात मी तो वाडाही विसरलो होतो. पण अचानक एक दिवस माझा मित्र शिरीष मझ्याकडे आला, म्हणाला, ” विशाल चल यार या दिवाळीत मस्त आठ दिवस सुट्टी घेऊ आणि कुठेतरी छान फिरून येऊ. रोज तेच ते काम करून कंटाळा आला बघ. काहीतरी वेगळं करावं वाटतंय, काही साहसी  . काही थरारक असं वेगळं काहीतरी करावं वाटते रे. खूप कंटाळा आला या रोजच्या कामाचा. “मग त्यानेच सुचवले, ” चल यार आपण तुझ्याच गावाला जाऊ. मस्त जंगल फिरू. काही वेगळं नक्कीच अनुभवायला मिळेल. ”  मग अचानक मला त्या वाड्याची आठवण झाली. मी त्याला म्हणालो, बघ शिरीष तुला वाटत ना काहीतरी वेगळं करावं. अशी एक जागा आमच्या गावाकडे आहे. तुझ्यात तेवढी हिम्मत असेल तर सांग . मी पण येईल तुझ्या सोबत.” आणि मग मी त्याला त्या वाड्याबद्दल सगळे सांगितले.  तसा तो म्हणाला आरे यार तू आत्ता संगतोयस, अगोदर का नाही सांगितलं. आपण नक्कीच तिकडे जाऊन आलो असतो. जाउ दे आता जाऊ या आपण पुढल्या आठवड्यात सलग चार दिवस सुट्ट्या आहेत. ते चार दिवस आपण तुझ्या गावात घालवायचे. ठरले , एकदम पक्के. “

आम्ही दोघांनीही आपापल्या ब्यागा भरल्या. आणि बुधवारी रात्रीच गावात पोचलो. गुरुवार ते रविवार सलग चार दिवस सुट्टी होती. रात्री मस्त खास भाजी भाकरी चा बेत होता. जेवण करून आम्ही आरामात लेटलो. तो एकदम सकाळीच जाग आली.

अंघोळ चहा नास्ता आटोपून आम्ही दोघेही त्या वाड्याकडे निघालो. सोबतीला गावाचाच आमच्याच वयाचा माझा मित्र शिवा सोबतीला होता. सगळयांनी आपल्या पाठीवरच्या ब्यागा सोबत घेतल्या, त्यात आवश्यक ते सगळे सामान होते.  मी आपल्या ब्याग मध्ये कॅमेरा, बॅटरी चे सेल,  टॉर्च, रस्सी, कैची, चाकू, लायटर,  मोबाईल व इतर आवश्यक सामान व थोडे नाश्त्याचे पाकीट, पाण्याच्या बॉटल्स सोबत घेतले. शिवाने आम्हा तिघांसाठी चांगली दोन दिवस पुरेल इतकी न्याहारी बांधून घेतली होती. प्रत्येकाने आम्ही हातात काठी घेतली आणि तिघेही निघालो त्या पडक्या वाड्याच्या दिशेने.

  आता मुख्य रस्त्यापासून आत जायचे होते. तिकडे जायला रस्ता हा नव्हताच, झाडा झुडपातून रस्ता काढत आम्ही तिघेही पुढे जात होतो. तेवढ्यात समोर एक लांब साप फणा काढून समोर उभा ठाकला. आम्ही तिघेही जागेवरच थांबलो. शिवा ने एक छोटासा दगड उचलून दुसऱया दिशेने भिरकावला. तिकडे पाला पाचोळ्याचा आवाज झाला. तो आवाज ऐकून साप त्या दिशेने निघून गेला. परत आम्ही तिघेही पुढे चालायला लागलो. मध्ये मध्ये जँगली जनावरांचे , पखरांचे आवाज येत होते. पुढे एका उंच झाडावर काही बंदर आरामात बसून होते. आम्हाला बघून त्यांनी जागेवरच उड्या घेतल्या. आणि हुप हुप करत आवाज काढला. कदाचित ते बाकी सगळ्या प्राण्यांना सतर्कतेचा इशारा देत असावे.

मी, शिरीष आणि शिवा रस्ता काढत पुढे चालत होतो. तेवढ्यात आम्हाला ती पडक्या वाड्याची इमारत दिसायला लागली. आम्हा तिघांचीही उत्सुकता वाढत होती. तेवढ्यात झाडीतून  फडफडण्याचा आवाज आला,  आणि तो आवाज पुढे पुढे जात बंद झाला. कुठले तरी जनावर किंवा पक्षी झाडीत बसून असणार, आणि आमचा माग लागताच ते तिथून पळून गेले असावे. पण ते काय होते ते कुणालाच कळले नाही. मग आम्ही  तिघांनीही आता आपल्या काठ्या खाली आपटत त्यांचा आवाज काढायला सुरुवात केली. तेवढ्यात शिरिष च्या डोक्याला टोच मारून एक कावळा काव काव करत उडत गेला. आम्हा तिघांसाठीही हा वेगळाच अनुभव होता. काय होत आहे काहीच कळत नव्हते. मनात थोडी भीती भरली होती. पडका वाडा समोरच दिसायला लागला होता. वाड्याची खूपच पडझड झाली होती.  समोरचे मुख्य गेट कसेतरी तोल सांभाळत उभे होते. कंपाउंड वॉल कुठे शाबूत तर कुठे धाराशायी झाली होती. आम्ही तिघेही आता कंपाऊंड वॉल च्या आत पोचलो होतो. सगळीकडे झुडपं वाढलेली होती. खाली पाय ठेवताना जपूनच ठेवावा लागत होता.  तेवढ्यात एक ससा आडवा गेला.  तसा शिवा ने सगळ्यांना थांबण्याचा इशारा केला. आम्ही तिघेही जागेवरच थांबलो. सशाच्या मागोमाग एक अतिशय चपळ गतीने भला मोठा साप जात होता. क्षणात दोघेही अदृश्य झाले.

आता आम्ही तिघेही वाड्याच्या पुढच्या भागात पोचलो होतो. दारातच कुठल्या मोठा प्राण्यांचा सांगाडा पडलेला होता. कदाचित तो प्राणी कुठल्यातरी हिंसक जनावराची शिकार झालेला असावा. आता तिथे फक्त हाडांचा सापळा तेवढा बाकी उरला होता. आम्ही तिघेही तो हाडांचा सापळा बघून थोडे घाबरलो होतो. जवळपास कुठले हिंसक जनावर तर लपून बसले नसावे. आम्हाला शंका आली. मग आम्ही आजूबाजूला अंदाज घ्यायला लागलो. तिघांनीही काठी खाली आपटून आवाज करण्याचा प्रयत्न केला. तितक्यात एक काळे काळे लांब केस असलेले जनावर झुडपातून आमच्याकडेच बघत असल्याचे जाणवले. आम्ही तिघेही काठ्या उगारून त्या जनावरकडे बघायला लागलो. ते लांब लांब केस असलेले, लांब तोंड असलेले काळे अस्वल होते. आता आम्हा तिघांनाही घाम फुटला. तोंडातून आवाज निघत नव्हता. आम्ही सगळे त्या अस्वलाकडे बघत होतो. ते केव्हा आमच्यावर झडप घेईल काहीच सांगता येत नव्हते. तसे शिवाने आपली काठी जोर जोरात खाली जमिनीवर आपटायला सुरुवात केली. तसे शिरीष आणि मी भानावर आलो, आणि शिवासारखेच आम्ही आपली काठी आपटायला लागलो. ते बघून अस्वल घाबरले आणि गुरगुरात झाडीतून अदृश्य झाले.  तेव्हा कुठे आम्हा तिघाच्याही जीवात जीव आला .

आता आम्ही वाड्याच्या मुख्य दरवाजा पुढे पोचलो होतो. दार उघडे सताड होते. आत जाण्याची कोणाचीच हिम्मत होत नव्हती. आम्ही तिघेही एकमेकांकडे बघत होतो. मग शिवानेच परत काठी आपटून आतला अंदाज घेण्याचा प्रयत्न केला. आत पूर्ण अंधार जाणवत होता. त्यामुळे आतमध्ये काय आहे ते कळत नव्हते. शिरीष ने मग आपला टॉर्च काढला. टॉर्च च्या प्रकाशात त्यानी आतला अंदाज घेतला तेवढ्यात आतून फडफड करत काही कबुतर बाहेर उडाले. तो फडफडण्याचा आवाज ऐकून परत आम्ही तिघेही थोडे घाबरले. पण कबुतर असल्याची खात्री होताच परत आम्ही मोठा श्वास सोडला. टॉर्च च्या प्रकाशात आतला थोडा अंदाज आला. तो खूप मोठा हॉल असावा. आणि त्याचे मागे आणि आजूबाजूला काही खोल्या असाव्यात. पण आत पाय ठेवायची कोणाचीच हिम्मत होत नव्हती. मग आम्ही तिघानीही आपले आपले टॉर्च काढले, आता सम्पूर्ण हॉल प्रकाशित झाला होता.

आत काही तुटके फुटके सामान अस्ताव्यस्त पडलेले होते. आत अजून कुठले जनावर असल्याचे वाटत नव्हते. आत कुबट असा वास येत होता. मग शिवा ने हिम्मत करून आत प्रवेश केला. त्याच्या मागोमाग मी आणि शिरीष ही आता पोचलो. आतले दृश्य बघून तर आम्हा तिघांनाही थरकाप सुटला. जिकडे तिकडे हाडांचे सापळे, सुकलेले मासांचे गोळे किडे, माकडे, पसरलेले होते. कोळ्यांच्या जाळ्याने भरलेला सम्पूर्ण वाडा भयावह भासत होता. आत घाण कुबट असा वास पसरलेला होता. कित्येक वर्षात तिथे कोणी मनुष्य आला नसल्याचे दिसत होते. तिथे फक्त जंगली जनावरे येत जात असल्याचे दिसत होते. जिकडे तिकडे कबुतर आणि वटवाघूळ यांची वस्ती दिसत होती. भिंतीमधून दारे खिडक्या काढून नेल्याचे दिसत होते. उपयोगी पडणारे असे काहीच सामान तीथे दिसत नव्हते, होत्या त्या फक्त पडक्या भकास वाटणाऱ्या भिंती आणि भीती दाखवणारे हाडांचे सापळे.

uमग आम्ही तिघांनीही अजून वाड्याच्या आत जायचे ठरवले. हॉल पार करून आम्ही आतल्या खोली मध्ये पोचलो. तिथेही काही वेगळे चित्र नव्हते बाहेरच्या सारखीच स्थिती तिथेही होती. मग आम्ही एक एक खोली चेक करत आत पोचलो. आत खूप मोठे किचन होते. तिथे चार स्वयंपाकाच्या चुली लागलेल्या होत्या. चुलीच्या वर धुपट काढायला नळकांडे लागलेले होते. पाण्यासाठी मोठे रांजण होते, ते आता तूट फूट झाले होते.

तिथून मग आम्ही मागच्या आवारात पोचलो. तोही परिसर खूप मोठा होता.  मागच्या बाजूलाही काही खोल्या काढलेल्या होत्या. त्यातल्या काही पडलेल्या तर काही सुस्थितीत होत्या. तिथे कोणी राहत असावे असे मात्र वाटत नव्हते. बाजूला एक मचाण बांधलेले होते . मचाण बरेच उंच होते आम्ही ते चढून वर पोचलो. मचाण बऱ्यापैकी स्थितीत होते. वरून वाड्याच्या चारही बाजूला लक्ष ठेवता येत होते. एका बाजूला वाहणारी नदी दिसत होती सगळीकडे जंगलाचे विलोभनीय दृश्य दिसत होते. मात्र तिकडून एक पाऊलवाट असावी असे मात्र भासत होते. आता सायंकाळ झाली होती. मग आम्ही त्या मचानावरच आपला मुक्काम करायचे ठरवले. कारण त्या परिसरात तितकी सुरक्षीत अशी कुठलीच जागा दिसत नव्हती. मचाणावर कुठल्याही जनावरास चढणे शक्य नव्हते. मग आम्ही ते मचाण चांगले साफ सुफ केले. सोबत आणलेली चादर त्यावर पसरली. आणि जंगलाचे विलोभनीय दृश्य बघत गप्पा गोष्टी करत शिवा ने आणलेल्या न्याहारी चा आम्ही  आस्वाद घेत बराच वेळ बसून राहिलो.

हळू हळू अंधाराचे साम्राज्य वाढत होते. पक्षी आपापल्या घरत्याकडे परतले होते. त्यांच्या चिवचिवण्याचा आवाज येत होता.  हळूहळू तो आवाज शांत झाला आणि सम्पूर्ण परिसर आता एक वेगळ्या रुपात अवतरीत झाला होता. आकाशात चांदण्यांनी गर्दी केली होती. मधेच कोल्ह्याची कुई कुई ऐकू येत होती. कबुतरांची गुटूरगु ऐकू येत होती. तर मध्ये मध्ये वेगवेगळे जनावरांचे आवाज ऐकू येत होते. आमच्या डोळ्यावर झापेची गुंगी पसरत होती. तशातच आम्ही केव्हा झोपी गेलो ते कळलेच नाही.

रात्री अचानक गुरगुरण्याचा आवाज ऐकून मला जाग आली . मी अंधारात कानोसा घेण्याचा प्रयत्न केला पण काहीच लक्षात येत नव्हते आणि दिसतही नव्हते. शिरीष आणि शिवा तर मस्त घोरत पडलेले होते. मात्र त्या गुरगुरण्याचा आवाजाने माझी झोप पुरती उडाली होती. मचाणीच्या खाली उतरणे आता अति धोक्याचे होते. आता तिथे प्राण्यांनी आपला कब्जा केला होता. मध्ये मध्ये कधी चमचमणारे डोळे मला घाबरवत होते. पण त्याही परिस्थितीत आम्ही अगदी सुरक्षित आहोत ही भावना मला जास्त सुखाची वाटत होती.

आता गुरगुरण्याचा आवाज वाढला होता. कदाचीत दोन प्राणी आणलेल्या शिकारी साठी एकमेकांशी भांडत असावेत असे वाटत होते. मी डोळे फाडून पाहण्याचा प्रयत्न करत होतो. मधेच मला वाटले टॉर्च काढून त्याच्या प्रकाश काय असावे ते बघावे. पण मग विचार आला जर ते आपली उपस्थिती पाहून जास्तच आक्रमक झाले तर, म्हणून मी माझ्या मनाला समजावून तो विचार काढून टाकला आणि तसाच पडून राहिलो. पण काही वेळानंतर माझे मलाच राहवले नाही मी शिरीष ला हळूच जागे केले. तोही मग त्या गुरगुरण्याचा आवाज ऐकू लागला. आमची कुरबुर ऐकून शिवा ही जागा झाला.

तेवढ्यात कुणाच्या पावलांचा आवाज आमच्या कानी पडला. आम्ही तिघेही त्या दिशेने बघण्याचा प्रयत्न करू लागलो. अंधारात काहीच अंदाज लागत नव्हता. पण कोणी तरी नदी च्या दिशेला जात असावे असा भास नक्कीच होत होता. आम्ही विचार करायला लागलो. कोण असेल इतक्या रात्री इथे या भयानक जंगलात. वाड्यात कोणी राहात असेल का. पण आपण आलो तेव्हा आपल्याला का कोणी दिसले नाही. इतक्या रात्री वाड्यात कशाला आला असेल. की आपण इथे आलेलो पाहून तोही आपल्याला भीती दाखवण्यास गावतलाच कोणी आपल्या मागोमाग आला असेल. मात्र आम्ही तिघेही आता थोडे घाबरलो होतो. पण कशाचाच अंदाज लागत नव्हता.

थोड्याच वेळात पाखरांची चिव चिव सुरू झाली. आता पहाट होत होती. आम्हीही आता उठून  आजूबाजूचा अंदाज घेत होतो. मग आम्हीही ठरवले की चला खाली उतरून नदी कडे जाऊन यायचे. खालचा अंदाज घेऊन आम्ही मचानावरून खाली आलो. आणि तिघेही नदीच्या दिशेने चालायला लागलो. वाट काढत काढत आम्ही नदीवर पोचलो तर आम्हला आश्चर्याचा धक्काच बसला . एक साधू बाबा वाटणारा वृद्ध काठावर पद्मासन अवस्थेत बसलेला होता. त्याची दाढी जटा वाढलेल्या होत्या. कमरेला एक पंचा लावलेला होता. बाकी पूर्ण शरीर उघडे होते. बाजूला त्याची काठी पडलेली होती. त्याने आताच आपली आंघोळ करून ध्यान अवस्थेत तो बसला असावा. त्याला कशाचेच भय वाटत नसावे. 

आम्ही त्यांचेच जवळ जाऊन पोचलो. ते मात्र आपल्या ध्यान क्रियेत पूर्णपणे मग्न होते.

आम्ही त्यांचे ध्यान पूर्ण होण्याची वाट बघत बसलो. बऱ्याच वेळाने ते आपल्या ध्यान मुद्रेतून परत आले. मग आमच्याकडे बघत म्हणाले . कुठून आलात . आम्ही त्यांना आमचा परिचय दिला. तसे ते म्हणाले इतक्या घनदाट जंगलात येण्याचे काय प्रयोजन होते. आम्ही त्यांना आमच्या जिज्ञासे पोटी तिथे आल्याचे सांगितले. तसे ते म्हणाले. इथे जंगली जनावरांचा खूप वावर असतो. इथे येणे खूप धोक्याचे आहे. पण इथला निसर्ग खूप छान आहे. या निसर्गाच्या प्रेमापोटीच मी इथे थांबलो आहे. गेली कित्येक वर्षे मी इथेच राहतो.

मग त्यांनी आपली जीवनाची गाथाच आमच्या पुढे उघडली. वयाच्या सातव्या वर्षीच त्यांनी घर सोडले. प्रथम भिक्षा मागून पोट भरायचे . पण लवकरच त्याचा कंटाळा आला. मग ते ऋषिकेश ला गेले. तिथे साधू संतांच्या सानिध्यात राहिले. शिक्षण वाचन खूप केले. मग ते भारत भ्रमणाला निघालो बरीच वर्षे भ्रमणात गेले. त्यानंतर हळू हळू शरीर थकायला आले. भ्रमण करता करता ते त्या भागात आले आणि तिथलेच झाले.

वाड्याच्या मागच्या भागाला एका खोलचा ते रात्री आडोसा घेतात. बाकी दिवस भर ते जंगलात फिरत असतात. जंगलातच काही खाण्या पिण्याचे शोधून त्यावरच ते आपले पोट भरत कंद मुळे पाने फळे फुले हाच त्यांचा आहार होता. कधी एखाद वेळी ते जवळपासच्या गावात जात . पण त्यांना परत इथली आठवण आली की ते परत येत.

इथेच जंगलात त्यांना राहायला आवडते. मोह माया  राग लोभ क्रोध या पासून ते विरक्त झाले होते. तिथले प्राणी पक्षी झाडे झुडपेच त्यांचा परिवार झाला होता. त्यात ते खूप आनंदी होते. ते मूळचे कदाचित त्याच भागातले असावे . त्यांना आपले घर ,गाव नातेवाईक काहीच आठवत नव्हते.

मग आम्ही त्यांना विचारले की त्यांना एवढ्या दाट जंगलात भीती वाटत नाही का. तर ते म्हणाले. पोरांनो माणसा पेक्षा हे प्राणी, ही झाडं हा निसर्ग जास्त प्रेमळ आहे. आपण त्यांना जपलं की तेही आपल्याला जपतात. त्यांच्यापासून कशाचे भय.

आम्हालाही त्यांचे म्हणणे पटले. आपण बघतोच ना माणूसच माणसास लुटतो. एकमेकास मारायला धावतो. खून आत्त्याचार अनाचार समाजात किती वाढलाय.  खरच होतं ते माणसांपेक्षा ही जनावरे जास्त प्रेमळ आणि चांगली असावीत.

मग साधुबाबाच आम्हाला जंगलात घेऊन गेले. त्यांनी तिथून काही फळं, कंद मूळ गोळा केली. परत आम्ही नदी काठी आलो. त्यांनी ते वाहत्या पाण्यात छान स्वच्छ केले . आम्हाला खाण्यास दिले. त्यांनीही ते आमच्या सोबत खाल्ले. खरच खूप रुचकर होते ते सगळे. मग आम्ही झाडाखाली बराच वेळ बसून राहिलो. झाडाच्या सावलीत गार गार वारा खूपच आल्हाद दायक वाटत होता. तिथली ती शुद्ध हवा पिऊन टाकवीशी वाटत होती.

नंतर मग आम्ही साधू बाबांसोबत जंगलात बरेच भटकलो. त्यांनी वेगवेगळी झाडे त्यांचे गुणधर्म, कुठल्या उपचाराला ते चालतात. त्यांना कधी फुलं फळं लागतात. अशी खूप काही माहिती सांगितली.

जंगलातल्या त्यांच्या वास्तव्याच्या काही घटनाही सांगितल्या. अशीच सायंकाळ होत आली. आम्ही रात्री मुक्काम करून परत एक दिवस थांबण्याचा आमचा मानस त्यांना सांगितला. त्यानाही आमच्या जंगल सफारी चा उत्साह बघून आनंद झाला होता.

मग त्यानी रात्रीच्या खाण्याची आमची व्यवस्था केली. मग आम्ही त्या वाड्यावर परत आलो. आम्ही रात्र त्यांच्या सोबतच त्यांच्या त्या खोलीत घालवली. मात्र आता आमच्या मनातले भय पूर्ण पणे निघाले होते. जंगली जनावरांपासून आपला बचाव कसा करायचा तेही त्यांनी आम्हाला सांगितले.

वैराग्यातही ते किती आनंदी आणि समाधानी होते त्याचे तेज त्यांच्या चेहऱ्यावर झळकत होते. वाडा सून सान असला तरी तो सुरक्षित असल्याचे त्यांनी सांगितले. पण गेल्या कित्येक वर्षात तिथे भीती पोटी कोणीही येत नसल्याचे सांगितले.

भूत प्रेत पिशाच्च ह्या फक्त मनाच्या कल्पना आहेत. वास्तवात असलं काहीच या भूतलावर असेल असं त्यांनी कधीही अनुभवलं किव्वा बघितलं नव्हतं.

मनी वसे ते स्वप्नी दिसे ही म्हण अगदी खरी असल्याचे त्यांनी सांगितले. त्यांचे विचार आम्हला पटत होते. अशाच गप्पा करत रात्री आम्ही झोपी गेलो.

रात्री अचानक मला जाग आली तर साधू बाबा खोलीत नव्हते. मी आजू बाजूला बघितले तर शिवा आणि शिरीष दोघेही घोरत पडलेले होते. मी दाराकडे बघितलं तर दार लावून होते . मला थोडी काळजी वाटली. मी दोघांनाही जागे केले. काय झाले, काय झाले करत दोघेही उठले. मी त्यांना साधुबाबा कुठे गेले दिसत नाहीत ते सांगताच तेही भानावर आले.

दार आतून तर बंदच होते. मग साधू बाबा जाणार कुठे आम्ही आता मात्र थोडे घाबरलो. मला दरदरून घाम फुटला. शिरीष ही खूप घाबरला.

मात्र शिवा शांत होता. त्याने मला आणि सुहासला पाणी दिले. आम्ही पाणी पिऊन परत विचार करायला लागलो. कुठे आणि कसे गायब झालेत हे साधू बाबा . आम्हाला कसे कळले नाही. ते या वाड्यात राहणारे भूत तर नसेल. नाना प्रश्न मनात येऊ लागले. म्हणजे काल आपण पूर्ण दिवस भुता सोबत घालवला . पण का ?  का असे झाले. आम्हाला का कळले नाही. आमच्या लक्षात का आले नाही. मला तर पक्के वाटायला लागले की ते या वाड्यातले भूतच असावे. आणि म्हणूनच कोणीही या वाड्याकडे फिरकत नसावे.


पण मग

परत विचार आलेत, ते तर साक्षात आमच्या सोबत होते. बोलत होते, किस्से सांगत होते. त्यांनी आपल्या जीवनाचा पूर्ण इतिहास आम्हाला कथन केला होता. मग असं कसं होऊ शकते की ते असे अदृश्य होऊन जातील. काल जे दिवसभर आमच्यासोबत होते ते कोण होते. आमचे डोके तर  पार फिरून गेले होते. मनात भीती भरली होती.

आता पुढे काय होणार याची चिंता चेहऱ्यावर दिसत होती. दार उघडून बाहेर बघण्याची पण हिम्मत होत नव्हती. आता पुढे काय करायचे काहीच सुचत नव्हते.

मीच मग शिरीशला म्हणालो, शिऱ्या बघ ना यार इथे कुठे काही गुप्त मार्ग किंवा भुयारी मार्ग तर नाही. कदाचित त्या मार्गाने ते बाहेर गेले असतील.

मी तसे काही दिसते का याचा शोधही घ्यायला लागलो. मी त्या रूमचा कोपरा नि कोपरा शोधून काढला पण कुठेच काही दिसत नव्हते. खोलीत फक्त एक भिंतीमध्येच काढलेली आलमारी दिसत होती. मी ती दोनदा तीनदा उघडून बघितली पण त्यात काहीच दिसत नव्हते. मग मला संशय आला की कदाचित एखादी भिंतच तो दरवाजा असू शकेल जे मागे पुढे होत असेल. मग मी भिंतींना ढकलून मागे पुढे होतात का ते पण करून बघितले. पण सगळी निराशाच पदरात पडत होती.

साधू बाबा कुठे गेले, कसे गेले, आम्हाला न सांगता का गेले काहीच समजायला मार्ग नव्हता. मग मात्र मी दार उघडून बाहेर बघायचे ठरवले.

आमच्या बॅग जशाच्या तश्या, जिथे ठेवल्या होत्या त्या तशाच तिथेच होत्या. मी बॅग मधून टॉर्च काढला आणी दार उघडले. मी दारात उभे राहूनच अंदाज घेण्याचा प्रयत्न करत होतो. बाहेरही काहीच अंदाज येत नव्हता.

जर साधू बाबा मनुष्य आहेत तर ते इतक्या रात्री अदृश्य कसे होतील. याचा अर्थ हाच होत होता की ते कुणीतरी योग पुरुष असावेत किव्वा काही भुताटकीचा तो प्रकार असावा. 

मग मी दार परत बंद करून घेतले. शिरीष पण पुरता घाबरून गेला होता. शिवा मात्र अजूनही शांतच दिसत होता. तो आमच्याशी बोलतही नव्हता. तो फक्त आमच्याकडे टक लावून बघत होता.

मग मलाच एक वेगळा संशय आला. हा शिवा आमची अशी मजा का बघतोय. त्याला नक्कीच साधू बाबांबद्दल काही तरी माहीत असणार. कदाचित साधुबाबांच्या कुठल्यातरी कटात तोही सहभागी असणार. पण मग मी तो माझ्या मनातला विचार काढून टाकला. कारण जंगलात निघताना तोही आमच्या इतकाच अनभीज्ञ होता.

तितक्यात दार वाजले. आम्ही एकमेकांकडे बघायला लागलो. मग मात्र शिवा उठला आणि त्याने दार उघडले. आम्ही बघतो तर काय साधू बाबा दारात उभे होते. त्यांच्या हातात काही कंद मूळ फळं होती. ते आमच्या नाश्त्याची व्यवस्था करून परतले होते.

मग मात्र शिवा जोराजोरात हसायला लागला. आम्ही ते बघून परत घाबरून गेलो. मला तर वाटले साधू बाबा भूत आहेत. त्यांनी शिवाला संमोहित करून स्वतःच्या वश केले आणि आता, त्यानीच शिवा कडून ते दार उघडून घेतले. शिवा जोराजोरात हसतोय ते पण साधुबाबांच्याच प्रभावा मुळे. तो शांत होता तेही त्यांच्या प्रभावामुळेच असावे असेच मला वाटायला लागले.

मग मी आणखीच घाबरलो. आता तोंडातून शब्दही निघत नव्हते. सम्पूर्ण शरीर भीतीने हलायला लागले. घामाने मी ओला चिंब झालो. माझ्यापेक्षा काही वेगळी परिस्थिती शिरीशची ही नव्हती.

आमची ती अवस्था बघून शिवाच बोलला. बाबा बघा दोघेही किती घाबरलेत. तुम्ही बाहेर गेलात तेव्हा हे दोघेही झोपलेले होते. म्हणून मी तुम्ही बाहेर जाताच दार आतून लावून घेतले आणि झोपून गेलो. पण मधेच विशाल जागा झाला, तुम्हला इथे नाही हे पाहून तो घाबरला. आणि आम्हाला जागे केले. मी त्यांची मग मजाच बघायची म्हणून काहीच बोललो नाही. तर यांचे विचार बघा कुठे कुठे जाऊन आलेत. त्यांनीं तुम्हला तर चक्क भूतच करून टाकले.  आताही ते तुम्हला भूतच समजत आहेत.

मग मात्र साधू बाबांच्या चेहऱ्यावर हलके स्मित झळकले. ते म्हणाले पोरांनो तुम्ही झोपले होते. आणि मला प्रातःर्विधी करिता जायचे होते. म्हणून मी यालाच उठवून दार आतून बंद करून घ्यायला सांगितले. तुम्हा सगळ्यांची झोपमोड होऊ नये हीच माझी मनीषा होती.

चला विसरा सारे. आता प्रकाश होत आहे. आपण नदीवर जाऊन तयार होऊ या. आता भीती गेली ना तुमची. चला तर मग उठा.

मग आम्ही चौघेही नदीवर गेलोअंघोळ वैगरे करून तयार झालो. खूप प्रसन्न वाटत होते. साधुबाबांची ध्यान तपस्या आटोपली. मग आम्ही सकाळची न्याहारी फळावर करून साधुबाबांसोबत जंगल भ्रमणाला निघालो.

साधुबाबांसोबत आमचा वेळ खूप छान गेला. त्यांनी आम्हास जंगलातल्या खूप काही गोष्टी, झाडे ,पक्षी, पशु  यांची ओळख त्यांची विशेषतः सगळे सगळे सांगितले. त्यांची घरटी दाखवली. अशीच मग दुपार झाली. आम्ही परत फळे, कंद, मुळे खाऊन आमचे पोट भरले व परतीला निघालो. साधुबाबा आम्हाला जंगलाच्या सीमेपर्यंत सोडायला आले. मग आम्ही त्यांचा निरोप घेऊन गावात परतलो.

अजूनही मला ते साधुबाबा नेहमी आठवतात. परत एकदा त्यांना भेटावेसे वाटते. पण नंतर शिवाकडूनच कळले की मधे कधीतरी तो तिकडे जाऊन आला पण आता साधुबाबा तिथे नव्हते. ते कदाचित परत आपल्या भ्रमणास गेले असावेत.

समाप्त…..

संजय रोंघे

विचारांचा वाद

मनात विचारांचा वाद
वाटते आशेची साद ।

अंतरात उठतो नाद
हृदयाची मिळते दाद ।

लागते वेड मनाला
होते मग ते आजाद ।

भरतो श्वास उरात
किती किती तो आल्हाद ।

येतो परतून घरट्यात
जीवनाशी चालतो संवाद ।
Sanjay R.

रचशील किती खलबत

पडशील ना भाऊ
तू गडगडत ।
रचशील सांग किती
तू रे खलबत ।
ठेव स्वार्थ बाजूला
पी थोडं सरबत ।
डोकं  होऊ दे शांत
विचार कर अलबत ।
विजयी तूच होशील
सर होईल पर्वत ।
Sanjay R.