येईल कधी ती वेळ नकळे कधी कुणास । हळूच देऊन जाते क्षणभर सुख मनास । लाभतो आनंद किती दिसे गालावर सुहास । जीवनातले क्षण तेच नसे दुःखाचा आभास । वाटे सार्थक जगण्याचे भरतो सुखाचे श्वास । कधी तुटतो विश्वास होतो कती मग त्रास । जीवनाचे रंग किती चाले सुखाचा प्रयास । निखळतो तारा जेव्हा असे तोची अंतिम श्वास । Sanjay R.
करू नकोस आता निरोपाची ते बोलणे अजून आहे जगायचे जरा ऐक माझे म्हणणे । दिवसच किती झाले शिकलोय मी हसणे । आहे जगायचे आनंदात बघायचे तुझे रुसणे । सोबतीने तुझ्याच मी हवे हवेसे तुझे असणे । तुझ्याविना जीवन माझे जसे काट्याचे ते सलणे । Sanjay R.
नाईकांच्या मनात उद्या काय काय करायचे याचे प्लॅनिंग सुरू होते. त्यांना उद्या बरेच काम करायचे होते. त्यासाठी त्यांनी सुट्टी घेण्याचे पक्के केले . तसा त्यांनी मेसेज त्यांच्या वरष्ठांना दीला आणि ते सुट्टी साठी निश्चिन्त झाले. आता उद्याला ते ठरवलेले काम आरामात करू शकणार होते. आज राणीला पण नितु मीतू च्या स्कुल मध्ये जायचे होते. सगळेच सकाळपासून आपापल्या कामात व्यस्त होते. सगळयांच्या चेहऱ्यावर एक वेगळीच खुशी झळकत होती.
सकाळी 9 ला राणी नितु आणि मीतू सोबत त्यांच्या शाळेत गेली. तिनेच टीचर्स ना आपली ओळख नितु आणि मीतू आईच्या रूपाने करून दिली. मुले पण राणीला आपल्या शाळेतील सगळं आईचे बघ आई ते बघा करून दाखवत होते. आई आणि मुलांचे बंधन जुळले होते. तिघेही खूप खुश होते. टीचर्स नि दोन्ही मुले अभ्यासात खूप हुशार असल्याचे राणीला सांगितले. आणि घरीही त्यांच्या अभ्यासाकडे थोडे लक्ष देण्याची राणीला सांगितले. टीचर्स शी संवाद करून ती घरी परत आली.
राणीच्याअगोमाग नाईकही बाहे निघाले. बाहेर निघताच नाईक पाहिले आपल्या बहिणी कडे गेले. आणि बहीण आणि बहीण जवायांना सोबत घेऊन ते पंडितांच्या घरी पोचले. पंडितांशी त्यांचा वडिलांच्या काळापासूनचा घरोबा होता. ते वेळी अवेळी नाईकांना खूप मदत करायचे. पंडित नावाप्रमाणेच पूजा अर्चा , लग्न, मंगल कार्याचे विधिवत कार्य पण करून द्यायचे. कुंडली राशी भविष्य, पण बघायचे. नाईकांनी त्यांना राणी आणि त्यांच्या होणाऱ्या सबंधा बद्दल सांगितले त्यावर त्यांना पण खूप आनंद झाला . त्यांनी विवाहाचा शुभ दिवस काढून दिला आणि सम्पूर्ण कार्य विधी नुसार करण्याचे नाईकांना दिले. येणारा गुरुवार त्यासाठी निश्चित करण्यात आला कार्यक्रम अगदी साधा आणि कमीत कमीत लोकांच्या उपस्थितीत पार पडायचे निश्चित झाले. पंडितांनी कार्यक्रमास लागणाऱ्या साहित्याची सर्व जवाबदारी स्वतः कडेच घेतली. तिथे जवळच असलेल्या मंदिराच्या सभागृहात कार्यक्रमाची जागा निश्चित करण्यात आली. कॅटरर कडे जेवणाच्या व्यवस्थेची जवाबदारी देण्यात आली. बिछायत वगैरे पंडितच मंडळाकडून करून घेणार होते. आता फक्त प्रश्न कपड्यांचा उरला होता. सगळी मंडळी पंडितांना घेऊन तिथूनच रेडिमेड सेन्टर ला पोचले. तिथेच त्यांनी राणीलाही बोलवून घेतले. सगळे कपडे रेडिमेडच घेऊन नाईक मोकळे झाले. आता लग्नाची संपूर्ण व्यवस्था झाली होती. फक्त गुरुवारी आता मंगल कार्य तेवढे बाकी होते.
होता होता गुरुवार उजाडला. सगळे आज पहाटेच जागे झाले होते. सगळ्यांनी आपापली तयारीही आटोपली. आणि सगळे मंदिरात पोचले. मुहूर्त सकाळी नऊ तीस चा ठरला होता. पंडित ही अगोदरच तिथे पोचले होते. सगळी व्यवस्था आटोपली होती. पंडितांनी नऊ लाच आपली पूजा सुरू केली. आणि बरोबर नऊ तीस च्या शुभ मुहूर्तावर राणी आणि नाईकांचे शुभ मंगल पार पडले. मोजकेच लोक तिथे हजर होते. लग्न आटोपताच . जेवण ही तयार होते. सगळेच खूप आनंदात होते. रितू मीतु च्या खुशीला तर पारावरच नव्हता राहिला. लग्न कसे आनंदात पार पडले. राणी आता नाईकांची अर्धनगिनी झाली होती. तीही खूप आनंदात होती. आता तिचीही जवाबदारी वाढली होती. मुलांना पण त्यांची आई मिळाली होती.
या लग्नाने सगळेच खूप खुश होते. सगळ्यात जास्त खुशी मुलांना झाली होती. कारण त्यांची आई गेल्यापासून ते अबोल आणि शांत झाले होते. आई गेल्याचे दुःख त्यांना जास्त बोचत होते. मधल्या काळात त्यांच्याकडे लक्ष द्यायला नाईकांकडे फारसा वेळ नसायचा आणि जो काही वेळ मिळायचा त्यात तेच स्वतः आपल्या दुःखाच्या विचारात असायचे. राणी आल्यापासून मात्र मुलांच्या आईची संपूर्ण जवाबदारी तिनेच उचललेली होती. त्यामुळे मुलेही थोडे आनंदात असायचे. त्यांच्या खाणे पिणे, कपडे, हवे नको सगळ्याच गोष्टी राणीने खूप चांगल्या रीतीने सांभाळल्या होत्या. आणि आता तर ती त्यांची आईच झाली होती. घरात आता आनंद फुलायला लागला होता . नाईकांच्या अर्धा नव्हे तर पूर्णच घरातला भार राणीने उचलला होता. आता ती घरात लागणाऱ्या भाजी पाला, धान्य, किराणा मुलांना के हवे नको त्याकडे सम्पूर्ण लक्ष द्यायची. स्वतः बाजारात जाऊन खरेदी करणे ही तिने आपल्या हातात घेतले होते. त्यामुळे नाईकांना खूप आराम मिळायला लागला होता. Sanjay R.
आज राणी ला काही केल्या झोप येत नव्हती. तिचे सारे लक्ष नितु कडेच जात होते. नितुला खूप ताप भरला होता. टेम्प्रेचर एकशे चार च्या वर दाखवत होते. श्वास जोरा जोरात चालत होते. इतक्या तापामुळे तो कण्हत होता. राणी थंड पाण्याच्या पट्ट्या करून नीतीनच्या डोक्यावर ठेवत होती. सारखे त्याचे टेम्प्रेचर मोजत होती. डॉक्टरांनी काही टेस्ट सांगितल्या होत्या . सगळ्या टेस्ट आटोपल्या होत्या पण रिपोर्ट उद्याला मिळणार होता. राणीच्या डोळ्याला डोळा लागत नव्हता . रात्रभर ती नीतीनच्या उशाला बसून होती. तिला खूप काळजी वाटत होती. सारखे डोक्यात विचार येत होते, रिपोर्ट काय येतील. कसे येतील. तिचा रात्रभर देवाकडे धावा सुरू होता . तिला वाटत होते. नितीन लवकर बरा व्हावा. नाईक ही हॉल मध्ये रात्रभर फेऱ्या मारत होते. मध्ये मध्ये येऊन ते नितीन ला पाहून जात होते . ते वारंवार राणी ला झोपायला जायचे सांगत होते. पण राणी नितीन च्या दूर व्हायला तयार नव्हती. तिच्या डोळ्यात आसवं जमा झाली होती. तिला नितु मीतू चा खूप लळा लागला होता. आता तीला मुलांपासून दूर व्हायचा विचारच कधी शिवत नव्हता. तीचे दोघांवरही खूप प्रेम जडले होते. त्यांना ती आपलीच मुले समजून सांभाळत होती. ती त्या दोन्ही मुलांची आईच झाली होती.
अशातच सकाळ झाली. नितीनला आता झोप लागली होती. तो शांतपणे झोपला होता. ते पाहून राणी सकाळच्या कामाला लागली. आज तिने सकाळीच स्वयंपाक करून घेतला. नितीन साठी तिने सोजी आणि वरणाचे पाणी काढून ठेवले. तो पर्यंत मीतू आणि नाईक जागे झाले. तिने नाईकांना चहा दिला. नाईक खूप तणावात दिसत होते. त्यांना रात्रीचे जागरण आणि नितुची काळजी सारखी स्वस्थ बसू देत नव्हती. नाईक तयार होऊन डॉक्टरांकडे रिपोर्ट घ्यायला गेले. मीतूला दूध नास्ता देऊन, तिला तयार करून परत राणी परत नितु शेजारी जाऊन बसली. नितु अजूनही झोपेतच होता. राणीने त्याचे टेम्प्रेचर मोजले. आता नितुचा ताप कमी झाला होता. मधेच तो जागा झाला. आता त्यालाही बरे वाटत होते. राणीने त्याचे हात पाय चेहरा कोमट पाण्याने पुसून दिले. त्याचे कंगव्याने केस व्यवस्थित करून दिले. आणि किचन मधून तिने दूध कोमट करून आणले. आता राणी चमच्या चमच्याने नितुला दूध भरवत होती. तेवढ्यात नाईक डॉक्टरांकडून परत आले. त्याचा चेहरा थोडा काळजी मुक्त वाटत होता. ते येताच राणीने त्यांना पाणी दिले. तसे नाईकच बोलले. सगळे रिपोर्ट नॉर्मल आले आहेत. काळजी करण्याची गरज नाही. डॉक्टरांनी काही औषधं लिहून दिलीत ती पण सोबतच घेऊन आलो. दोन तीन दिवसात नितीन नॉर्मल होईल. खेळा फिरायला लागेल. थोडा विकनेस राहील पण लवकरच भरून निघेल असे डॉक्टर बोलले. ते थर्मा मीटर घे बरं टेम्प्रेचर बघू या किती आहे ते. तशी राणी थर्मामित्र घेऊन आली आणि तिने ते नाईकांच्या हाती दिले. नाईकांनी नीतीनचे टेम्प्रेचर मोजले ते छ्यान्नव भरले. आता ताप पूर्ण पणे कमी झाला होता. नाईकांचे टेन्शन कमी झाले होते. राणीलाही बरे वाटत होते. मनोमन तिने देवाचे आभार मानले. दोन दिवसातच नितीन चांगला झाला आणि खेळायला फिरायला लागला. पण नाईकांना आता वेगळाच विचार सारखा सतावत होता.
आज रविवार होता सगळेच थोडे उशिरा झोपून उठले. तशी राणी तयार होऊन आपल्या कामाला लागली. तिने नाश्त्यासाठी उपमा केला होता. आणि तिघांनाही प्लेट मध्ये काढून दिला. सगळे आरामात आनंदात उपम्याचा स्वाद घेत होते. तसा नाईकांनी राणी ला आवाज दिला. आणि तिलाही आपली प्लेट भरून घ्यायला सांगितले . राणीने आपली प्लेट भरून घेतली. नाईकांनी राणीलाही डायनिंग टेबल वर बसवून घेतले. तितक्यात मीतूला ठसका लागला तशीच राणी धावत पळत किचन मध्ये गेली आणि तिने मीतू साठी पाणी घेऊन आली. तिने आपल्या हाताने मीतूला पाणी पाजले. तिच्या पाठीवरुन हात फिरवला. राणी खूप वेळ मीतूची पाठीवरुन हात फिरवत राहिली. नाईकांना ते बघून खूप छान वाटले. राणीचे दोन्ही मुलांवर सारखेच प्रेम बघून नाईकांना भरून आले. तसे ते मुलांकडे बघून बोलले. राणी तुम्हा दोघांचीही किती काळजी घेते. तुम्ही तिच्या साठी काय काय करता सांगा बरं. तशी मीतू म्हणाली आम्ही पण राणी आंटीवर खूप प्रेम करतो. आम्हला ती खूप आवडते. आम्ही तिच्या शिवायचा तर आता विचारच करू शकत नाही. पप्पा तिला सांगा ना रोज माझ्या सोबत झोपायला. ती तिकडे आऊट हाऊसला जाऊन झोपते. तिला माझ्या सोबतच झोपायला सांगा. मी म्हटले पण ती ऐकत नाही. तुम्ही सांगा आत्ता . तुमचेच ती ऐकेल. पप्पा सांगा ना तिला काही. तसे मीतूचे बोलणे ऐकून नाईकांना खूप छान वाटले. त्यांनी मीतूला विचारले तुला राणी तुझी आई झाली तर आवडेल का. तसे नितु मीतू दोघेही एक स्वरात बोलले खरच पप्पा आम्हाला खूप आवडेल. सांगा आत्ता सांगा आंटी ला आमची आई हो म्हणून. तशीही ती आमची आता आईच आहे. तीच तर आमचं सगळं सगळं करते. आंटी तू हो म्हण ना. तसे राणी ने दोघांनाही आपल्या कुशीत घेतले आणि दोघांच्याही डोक्यावरून हात फिरवायला लागली. नाईक राणीचा होकार समजले होते.
राणीच्या या अबोल होकारावर नाईक खूप समाधानी होते. त्यांना अशाच मुलावर खुप प्रेम करणाऱ्या साथीदाराची गरज होती. तशी राणी सुस्वरूप सुस्वभावी होतीच. आणि मुख्य म्हणजे ती सम्पूर्ण घराचा भार उचलण्यास पूर्णपणे समर्थ अशी जोडीदार होणार होती. त्याबद्दल नाईकांना पूर्णपणे खात्री होती. फक्त ती एका गरीब कुटुंबातली स्त्री होती. तिच्या मागे आज कुणीच नव्हते. ती पूर्णतः एकटीच होती. आणि तिला नाईकांचाच पूर्णपणे आधार होता. पुढेही ती तेच प्रेम मुलांवर कायम ठेवेल याबद्दल कुठलीच शंका घ्यायला जागा नव्हती. मुलांनीही तिला आपल्या आईचा दर्जा अगोदरच दिला होता. आता फक्त कायदेशीर रित्या नाईक आणि राणी यांच्या नात्याला बंधनात बांधायचे तेवढे बाकी होते. नाईकांच्या मनात वेगवेगळे विचार सुरू होते. तितक्यात रितूचा आवाज नाईकांच्या कानी पडला. मीतू नितुला सांगत होती. नितु दादा उद्या माझ्या क्लास टीचर नि स्कुल मध्ये पालकांना मीटिंग साठी बोलवले आहे. मी आईलाच सोबत घेऊन जाऊ कारे. त्यावर नितीन बोलला माझ्या पण टीचरनी पालकांना मीटिंग साठी बोलावले आहे. आपण आईलाच सोबत घेऊन जाऊ या. चल आपण आईला त्यासाठी तयार करू या. आणि पप्पांना पण आई ला सोबत यायला सांगा म्हणून सांगू या. नाईकांना ते बोल ऐकून खूप छान वाटले.
इथे तिथे मी शोधू कुठे थकलो आता बघू कुठे । मनात माझ्या काय कुठे स्वप्न तर होते फार मोठे । सुटले आचार तुटले विचार मन झाले ना किती छोटे । मिळेना काही नको सारे वाटे सांगतो आता नशीबच खोटे । Sanjay R.
राणी तिचे नाव, वाटावे कुठल्या महा साम्राज्याची सम्राधनी असावी, सुंदर नव्हे तर अती सुंदर , तसेच तिचे राहणे आणि तसेच तिचे वागणे बोलणे. विचारही तिचे तसेच साजेशे. पण देवाचेच चुकले. गरीब घरात जन्माला घातले. तिच्या सौंदर्याची विचारांची तिथे काहीच किंमत नव्हती. फाटक्या तुटक्या कपड्यात ती अंग झाकायची. कधी मिळाली तर भाजी भाकरी नाहीतर कुणाच्या घरचं रात्रीचे उरलेले जेवण तेच होतं नशिबात. घर पाहावं तर तेही तुटकं फुटकं पाणोळ्याचं. त्यात एकच खोली त्यातच सगळा संसार चालायचा . सोबतीला म्हातारे आई बाप. आई नेहमीच आजारी. सदा झोपलेलीच असायची. बाप उठून सकाळी मोळी करून विकायसाठी काड्या जमा करायला जायचा नि परत यायचा तो नेहमीच टूल दारू पिऊन यायचा नि सरळ आडवा पडायचा. त्याचे जेवण, खाणे कधीच घरात नसायचे. फक्त झोपायला तेवढा घरात यायचा. राणी त्यांचीच लेक. पण तिच्याकडे कोणीच लक्ष देत नसत. तिला समजायला लागले तेव्हा पासून तीच चार दोन घरी धुणं भांडे करून आईचे आणि स्वतःचे पोट भरायची. त्यांच्याच घरचं काही उरलं सुरलं घरी घेऊन यायची. स्वतःही खायची. आईला ही खाऊ घालायची. दिवसा मागून दिवस जात राहिले, वर्ष लोटले. आता राणी विस एकवीसची झाली असावी. चेहऱ्यावर तारुण्याची झळाळी आली होती. पण परिस्थिती मुळे चेहऱ्यावर तेज उरलेच नव्हते. लग्नही तिचे व्हायचे होते. आई आजारी असल्याने मुलगाही कोण बघणार. आणि लग्न केले तर आईकडे कोण बघणार. म्हणून तिनेही लग्नाचा विचार बाजूलाच ठेवला होता.
आज राणीला एका नवीन घरचे काम मिळाले होते. काम नाईकांच्या घरचे होते. ते बँकेत नोकरीवर होते. घरात ते आणि त्यांची दोन छोटी छोटी मुले नितु म्हणजे नितीन सहा वर्षाचा आणि मीतू म्हणजे मिताली चार वर्षांची. दोघात फक्त दोन वर्षांचा फरक होता. या दोन मुलांना सांभाळायचे काम तिला मिळाले होते. सोबत घरातली सगळी काम, स्वैपाक, कपडे धुणे, ठेव रेव सगळंच करायचं होतं. सकाळी नऊ ते सायंकाळी सहा पर्यंत काम होते. पगारही चांगलाच मिळणार होता. सोबत जेवण नास्ता चहा सगळंच मिळणार होतं. स्वतःच सगळं करून संपूर्ण घर सांभाळायचं होत. आणि मुलांना पूर्ण काळजीने सांभाळायचे होते. नाईकांची पत्नी कोरोना मधेच गेली होती. मुलांकडे बघायला कोणीच नव्हते. नाईकही मुलांसोबत एकटे पडले होते. ते सारखे विचारात असायचे. मुलांचा प्रश्न सारखा त्यांना अस्वस्थ करायचा. शेवटी त्यांनी निर्णय घेतला पूर्ण वेळ एक बाई ठेवायची आणि मुलांना मोठे करायचे. दुसऱ्या लग्नाचा विचारच त्यांना नकोसा वाटत होता. ते सावत्र आई मुलांना कसे वागवते ते बघून ऐकून होते. म्हणून त्यांनी तो विचारच डोक्यातून बाद केला होता. त्यांनी तसे त्यांच्या बहिणीकडे बोलूनही दाखवले होते. नाईकांची बहीण सरिता . तिच्याकडेच राणी धुणे भांडे करायची. सरीताला राणी बद्दल चांगलीच माहिती होती. तिच्या बद्दल सरीताला पूर्ण विश्वास होता. सरिता तिला अगदी लहानपणापासून ओळखत होती. म्हणूनच तिने तिच्या दादाकडे राणीला कामासाठी लावून दिले होते. नाईकांनाही अशीच महितीतली बाई कामं आणि मुलांचा समभाळ करायला हवी होती. त्याशिवाय त्यांच्याकडे काहीच पर्याय नव्हता. राणीला कामाला ठेवल्यामुळे नाईकांची मुलांची दिवस भराची काळजी कमी होणार होती. बाकी वेळ ते घरी असणारच होते. अडी अडचणीला सारिताही मदतीला राहणारच होती. राणीही नवीन काम मिळाल्याने खूप खुश होती.
आज तिचा कामाचा पहिलाच दिवस होता. तिने तयार होऊन देवाला हात जोडले. आईला नमस्कार केला. तिचा आशीर्वाद घेऊन ती नाईकांकडे पोचली. नाईक वाटच बघत होते. राणीने नाईकांना अगोदरही सरिता ताई कडे बघितले होते. तिला नाईकांबद्दल माहिती होती. नाईक खूप चांगल्या स्वभावाचे आहेत हे राणीला ठाऊक होते. नाईकांनी राणी ला घरातले सगळे काम , स्वयंपाक घरातले बाकी सामान कुठे काय आहे ते सगळे समजावून सांगितले. सोबत नितु आणि मीतू च्या जेवण नास्ता, अभ्यास, खेळ, झोपणे सगळ्या गोष्टी समजावून सांगितल्या. आणि ते नितु मितूला राणीच्या स्वाधीन करून ऑफिसला निघून गेले. आज पहिला दिवस असल्याने स्वयंपाकाला वेळ होणार होता म्हणून नाईक बाहेरच जेवण करणार होते. पण उद्या पासून ते सोबत टिफिन घेऊन जाणार असे त्यांनी राणी ला सांगितले. तेव्हा आल्याबरोबर तिला स्वयंपाकाला लागावे लागणार होते. बाकी घरातले सामान भाजी पाला नाईक स्वतःच आणून देणार होते. त्यामुळे राणीला फक्त घरातले तेवढे बघायचे होते.
नितु मीतू जवळच्याच स्कुल मध्ये शिकत होते. नितु फर्स्ट क्लास ला तर मीतू के जी वन ला होती. पण स्कुल बंद असल्याने ते घरीच राहणार होते. नितु मीतू दोघेही शांत स्वभावाचे असल्याने राणी ला खूप छान वाटत होते. थोड्याच वेळात ते राणीशी राणी आंटी राणी आंटी करून तिच्या सोबत मिक्स झाले होते. तिच्या मागे पुढे करत होते. राणीने स्वयंपाक करून मुलांना आणि स्वतः साठीही वाढून घेतले. आज पहिल्यांदा ती आरामात बसून मुलांसोबत जेवण करत होती. मुलंही तिच्या सोबतीने खुश होती. जेवण करून मुलं आपल्या अभ्यासाला लागली. सोबत राणीही त्यांची पुस्तके बघण्यात वाचण्यात दंग झाली. तशी राणीही वर्ग सात पर्यंत शाळेत जात होती. पण आई आजारी पडायला लागल्यावर सगळा भार तिच्यावर आल्याने तिची शाळा बंद झाली होती. अभ्यास आटोपल्यावर ते राणीला तिच्या कामात मदत करत होते. त्यांचे राणीला हे दाखव ते दाखव सारखे सुरू होते. तशातच मुलं थकून गेली आणि बेडरूम मध्ये जाऊन झोपी गेली. राणी मग इतर कामाला लागली. तिने कपडे भांडे केले. घर साफ सफाई केली. सगळे सामान व्यवस्थित लावले. तोपर्यंत मुलं झोपेतून उठली. राणी ने त्यांना दूध बिस्कीट दिले. मुलं खूप खुश होती. त्यांचं सगळं राणी अगदी आई सारखं करत होती. पाच वाजता तिने परत स्वयंपाक करायला घेतला. स्वयंपाक करून तिने भांडे धुवून व्यवस्थित लावून ठेवले. जेवणाचे डायनिंग टेबल वर आणून व्यवस्थित झाकून लावून ठेवले. तोपर्यत नाईक ऑफिस मधून परत आलेत. मुलांना खुश पाहून नाईकही खुश झालेत. राणी ने नाईकांना चहा देऊन, नाईकांना सांगून ती घरी परत आली.
आज राणी खूप खुश होती. तिने आईला नाईकांकडे काय काय केले ते सगळे सांगितले. आईला पण पोरीचे नवीन काम ऐकून बरे वाटले. तिच्या चेहऱ्यावर ही हास्य फुलले. राणीने आज देवाच्या फोटो पुढे दिवा दिवा लावला आणि नमस्कार करून तिने आज आईसाठी खास खिचडी मांडली. माय लेकी आज पहिल्यांदा आनंदात जेवत होत्या. बाप कधीतरी रात्री येऊन झोपला आणि सकाळी उठून आपल्या कामाला निघून गेला.
राणी सकाळी उठून तयार होऊन नाईकांकडे कमला आली. आज तिने नाईकांना टिफिन करून दिला. नाईक आपला टिफिन घेऊन कामावर निघून गेले. मुलांना पण आता राणी आंटी ची सवय होऊन गेली होती आणि राणीला ही मुलांची सवय झाली होती. ती आता मुलांचा अभ्यास पण घ्यायला लागली होती. त्यांना प्रत्येक गोष्टीत ती मदत करायची. मुलं सकाळ होताच राणीची वाट बघायला लागले होते. त्यांना तिच्याशिवाय बिलकुल करमत नसे. दिवस भर आंटी आंटी करून तिला भंडावून सोडायचे. राणीलाही मुलांचे सगळे करण्यात खूप आनंद मिळायचा. तिला मुलाशिवाय आणि मुलांना राणी शिवाय बिलकुल करमत नसे.
असेच दिवसामागून दिवस जात होते. अशातच एक दिवस राणीच्या आईची तब्येत खूप बिघडली. राणी तिला दवाखान्यात घेऊन गेली. पण परिस्थिती हाताबाहेर असल्याचे सांगून डॉक्टरांनी आईचा अंत जवळ असल्याचे सांगितले. नाईकांनी ही जमेल तेवढी मदत केली. औषध पाणी, डॉक्टरांची फी सगळं नाईकच करत होते. पण देवाच्या इच्छेपुढे कुणाचे काय चालते. आणि आईने आपले प्राण सोडले. राणी खूप दुःखी झाली होती. आई साठी राणी खूप रडली. तिला काहीच सुचत नव्हते. ती तशीच बसून रहायची अशातच पंधरा दिवस निघून गेले. राणी चे वडीलही गेल्या चार पाच दिवस पासून परत आले नव्हते. त्यांचा पण कुठेच पत्ता लागला नव्हता. राणीला काहीच सुचत नव्हते. शेवटी नाईकच राणी च्या घरी आलेत आणि तिला समजावून आपल्या घरी घेऊन आले. नितु मीतू ही राणी च्या दुःखात खूप दुःखी झाले होते. राणी रडायला लागले की तेही राणी सोबत रडायचे. परिस्थिती ची जाण ठेऊन नाईकांनी राणीला त्यांच्याच घरी आउट हाऊस मध्ये राणीला राहायला एक खोली दिली होती. आता राणी दिवसभर पाहिजे तेव्हा मुलांचे करायला हजर होती. हळू हळू राणी आपले दुःख विसरून जायचा प्रयत्न करत होती. आणि ती आपला पूर्ण वेळ मुलांना द्यायला लागली होती. मुलंही राणी शिवाय राहायचेच नाहीत. राणीचा पूर्ण झोपे पर्यंतचा वेळ मुलांसोबतच जायचा.
असेच काही वर्षे निघून गेली. मुलंही आता मोठी झाली होती. पण मुलं आणि राणी मधले प्रेम कमी होण्या ऐवजी वाढतच गेले. ते राणीला आपल्या आईच मानायला लागले होते. राणीचाही मुलांमध्ये खूप जीव होता. मुलांच्या प्रेमापोटीच तीच्या मनात स्वतःचा विचारही कधीच आला नव्हता. तिने आपले सर्वस्व मुलांना देऊन टाकले होते. ती नाईकांच्या घरालाच आपले घर समजून सगळे प्रेमाने करत होती. ती आता नाईकांच्या घरातील एक मेम्बरच झाली होती. ते मुलं आणि राणी मधले एक अनोखे बंधन होते. आणि राणी नितु मीतूची खरी आई झाली झाली होती. Sanjay R.
करू नकोस इशारे कळले मजला सारे । अंतरात पेटली आग धगधगताहेत निखारे । आहे कोण इथे कुणाचा व्यर्थ आहेत नाते सारे । नको आता वाटे मजला दूरच बरे चमचमते तारे । Sanjay R.
दूर किती किनारा झुंज देतोय वारा । बेफाम सुटल्या लाटा वरून पडती धारा । डगमगते नाव पाण्यात करते कुणा इशारा । दाटले आकाश ढगांनी लोपला कुठे तो तारा । चमचम करते मधेच दिसे विजेचा नजारा । का कोपला असा तू हो शांत जरा सागरा । Sanjay R.
अल्याड काय पल्याड काय समजेना मला । बघू कुठे मी शोधू कुठे सांगू काय तुला । ध्यानात काय मनात काय सांगतो मी तुला । शोधते नजर नसतेस हजर हवी ग तूच मला । Sanjay R.
नको जाऊस दूर नकोच हा दुरावा । मनात काय माझ्या कशास हवा पुरावा । ठाऊक तुलाही आहे चाले कुणाचा धावा । आठवण होताच तुझी मिळतो मज विसावा । साथ सदा हवी मज मनात वाजतो पावा । नाते तुझे आणि माझे आईचा लाडका तू छावा । Sanjay R.
मन आठवणींचा डोह असतो नाही का. अगदी बालपणापासूनच्या तर आत्ता एक क्षणापूर्वी पर्यंतच्या साऱ्याच आठवणी त्या डोहात साचलेल्या असतात. त्या आठवणींना थोडा उजाळा द्या आणि तो मग तो प्रसंग अगदी जशाच्या तसा आपल्या डोळ्यापुढे अभ राहतो. यात सुखाचे क्षण असतात. काही दुःखाचे क्षण असतात. काही अंगावर काटा आणणारे प्रसंग असतात तर काही मनाला रोमांचित करणारे प्रसंग असतात. किती किती गोष्टी या डोहात जशाच्या तश्या साठवून राहतात. अशीच एक आठवण... ती आठवताच माझ्या मनाला सुखावून जाते. आणि मग माझा मीच माझ्यावर हसत राहतो. काय ते बालपण आणि कसले ते विचार. त्या वेळी मी लहानच बहुतेक दुसरी तिसरीत असावा. तो दिवस रविवारचा असावा कारण त्या दिवशी मी घरीच होतो. आईची कामाची धावपळ सुरू होती. पप्पा बाहेरगावी कुठे तरी गेलेले होते. आईचा स्वयंपाक आटोपला आणि तिने जेवायला वाढले. मी आणि आई जेवायला बसलो. आईने मला सकाळीच केलेले गरम गरम जेवण वाढले भाजी, पोळी, वरण, भात ताटात होते. मी आईच्या ताटाकडे बघितले. तिच्या ताटात रात्रीच्या उरलेल्या पोळीचा फोडणी दिलेला चिवडा दिसला. तो बघून मलाही तो खायची इच्छा झाली आणि मी हट्टच धरून बसलो . मला तोच आईच्या ताटातला चिवडा हवा होता. पण आई माझ्या तब्येतीच्या काळजीपोटी तो द्यायला तयारच नव्हती. पण मला तर तोच चिवडा हवा होता. मी हट्टालाच पेटलो होतो. शेवटी आईने मला दमच भरला. म्हणाली ताटात जे वाढून दिले तेच खा नाही तर उपाशी राहा. तुला तो शिळ्या पोळीचा चिवडा मिळणार नाही. त्या पोळ्या काल दुपारच्या आहेत. त्याने तुझे पोट दुखेल. पण मी कुठे मानणार. मला तेच हवे होते. मीही मग हट्टच धरून ठेवला . माझा हट्ट बघून तीही जिद्द धरून बसली . म्हणाली नाही मिळणार म्हणजे नाही मिळणार . नसेल खायचे तर उठ आणि चालायला लाग. फालतूचे लाड खूप झालेत. मलाही मग खूप राग आला आणि सरळ उठून बाहेर आलो आणि चालायला लागलो. कुठे जायचे काहीच कळत नव्हते. मनात विचार आला आई नेहमीच मला रागावत असते. नकोच हा तिचा रसाग. मनात मग एक वेगळाच विचार डोक्यात आला. घर सोडून पळून जण्याचा विचार. चला घर सोडून पळून जावे . तेच बरे होईल. मग रागवत बस म्हणा आईला कुणाला रागवायचे ते. मी नसेल तर कुणावर रागावेल बघू या. शेवटी मी ठरवलेच, मी आता इथे नाही राहणार. जाईल कुठेही. राहील एकटा कसाही. आणि सरळ बाहेर येऊन वाटेला लागलो. कुठे जायचे काहीच कळत नव्हते. मग आठवले पेपर मध्ये वाचले होते कोणी एक मुलगा घरातून पळून जाऊन मुंबई ला निघून गेला होता . मुंबई किती मोठे शहर आपल्याला तिथे कोणीच ओळखणार नाही. आणि रागावणार पण नाही कोणी. छान आरामात राहू. अभ्यासही नसेल, आईचा राग नसेल, पप्पांचा मार पण नसेल . मुंबईला जाणेच छान राहील. मग मीही ठरवले आपण मुंबईलाच जायचे. राहू कुठेही कसेही मुंबईत. तिथे आईचे रागावणे तर नसेल. तेच खूप छान होईल. आणि मी निघालो रेल्वे स्टेशन कडे. खूप चालल्या नंतर मी स्टेशनवर पोचलो. खूप चालल्याने पाय खूप दुखत होते. स्टेशन वॉर खूप गर्दी होती. गर्दीतून वाट काढत मी फ्लॅटफॉर्म वर जायला निघालो पण मधेच टी सी उभा होता. मनात विचार आला, टी सी ने पकडले तर काय करायचे. तिकीट घ्यायला खिशात पैसे पण नव्हते. गर्दीतून लपत छपत मी तसाच प्लँटफॉर्म वर आलो. तिथे तर गर्दी खूप जास्त होती. काहीच सुचत नव्हते. पायही खूप दुखत होते. तिथेच एक रिकामा बेंच बघून मी बेंचवर बसलो. कोणी आपल्याला बघत नाही याची काळजी घेत बराच वेळ बेंचवरच बसून राहिलो. गाड्या येत होत्या जात होत्या. उतरणारे लोक घाई घाईने उतरत होते. चढणारे लोक घाई घाईने चढत होते. पोचवायला आलेले लोक टाटा बाय बाय करून परत जात होते. मी खूप वेळ तेच चित्र बघत राहिलो. आणि मला पण मुंबई ला जायचे आहे हे विसरून गेलो. अजूनही पाय दुखत होते. उठवेसेच वाटत नव्हते. मग हळू हळू पोटात कावळे ओरडायला लागले. फ्लॅटफॉर्मवर चहा आणि खाण्याचे पदार्थ विकणारे ओरडून ओरडून पदार्थ विकत होते. त्यांना बघून मला भूक जाणवायला लागली. त्या पदार्थांचा सुगंध मला सारखी भुकेची जाणीव करून देत होता. आता तिथे बसणे मला अगदी कठीण होऊन गेले होते.
तसा मी स्टेशनच्या बाहेर आलो. आणि घराच्या दिशेने परत निघालो. सकाळचा माझा राग निवळला होता. आणि त्याची जागा भुकेने घेतली होती. आमच्या घराच्या जवळ एक मंदिर होते. नकळत माझे पाय मंदिराकडे वळले. मी मंदिरात आलो. देवाचे दर्शन घेतले आणि मग परत आई आठवली. परत घरी गेल्यावर आई रागावेल , कदाचित इतका वेळ कुठे होता म्हणून मारही देईल या भीती पोटी मी देवळातच बसून राहिलो. तिथून उठवेसेच वाटत नव्हते. आता पाय पण खूप दुखत होते आणि भुकेचे तर विचारूच नका. सारखा मनात विचार येत होता, आजू बाजूला कुणाच्या घरी जावे आणि भिकारी जशी भीक मागतात तशी भीक मागून आणावी आणि भूक शांत करावी. पण त्याचीही लाज मनात वाटत होती. मग बाजूला पाण्याचा नळ होता त्यावर जाऊन पोटभर पाणी पिलो. आता थोडे शांत वाटत होते. आणि मग मी तसाच तिथे मंदिरात खूप वेळ बसून राहिलो. किती वेळ तसाच गेला ते कळलेच नाही. आई बद्दलचा राग आणि भीती मात्र मनातून जात नव्हते. आता सायंकाळ व्हायला आली होती. परत भूक आपले डोके वर काढत होती. मग मात्र मी तिथून बाहेर आलो.बाहेर येऊन घराच्या वाटेकडे पाहत किती वेळ उभा राहिलो ते कळलेच नाही. मन द्विधा परिस्थितीत अडकले होते. आता आईची खूपच भीती वाटायला लागली होती. वाटत होते आता मार पक्का मिळणार. मन सारखे रडत होते. काहीच सुचत नव्हते. असा बराच वेळ निघून गेला. तशातच मला आई तिकडेच येताना दिसली. तसा मी आणखीच घाबरलो . काय करावे काहीच कळत नव्हते. आणि मग मी जिवाच्या आकांताने पळायला लागलो. तशी आईही माझ्या मागे धावायला लागली. मी पुढे आणि आई मागे मला आवाज देत असा पाठलाग सुरू झाला. बरेच अंतर मी पार केले होते आणि आई मागे पडली होती. मात्र मधेच एका व्यक्तीने माझे बखोटे धरले आणि मला माझ्या आईच्या स्वाधीन केले. मी पुरता घाबरून गेलो होतो. आईच्या माराची भीती वाटत होती. आणि त्या भीती पायी मला रडायला येत होते. मी रडत होतो आणि सोबत माझ्या माझी आईही रडत होती. समजावत होती. बाळा असे कोणी निघून जातात का. चल घरी चल. तुला भूक लागली असेल ना चल जेवण कर. घरी चल. कुठे गेला होता माझा बाळ. शोधून शोधून थकून गेली रे मी तुला. आणि तू इथे देवळात लपून बसला होतास. असं परत कधी कधीच जायचे नाही बरं का. असा राग बरा नसतो बरं. त्यात तुलाही त्रास होणार आणि मला पण त्रास होणार. चल बाळा चल घरी चल. तुही जेवला नाहीस आणि मी पण जेवली नाही रे तुझ्यासाठी. आणि मग तिने मला तिच्या कुशीत घेतले आणि खूप खूप पापे घेतले. तीही माझ्या सोबत सारखी आसवे गाळत होती. हुंदके देत होती. मग आम्ही घरी आलो. आईनेच माझे हात पाय धुवून दिले आणि जेवायला वाढले. आईनेच मग स्वतःच्या हाताने मला भरवले. तिच्या डोळ्यातले आसवं मात्र थांबत नव्हते. खरच आई ही आईच असते.