सोबतीला असतो कोण
एकटेच यायचे इथे ।
जोडायचे मग एकेकाला
कसे जुळते नाते तिथे ।
रोज एक नवा दिवस
काय ध्येय काय कुठे ।
क्षण क्षण सरतो पुढे
मागे मागे सारे सुटे ।
पोटासाठी परिक्रमा
घामासोबत रक्त आटे ।
शेवटी हातात शून्य
रास्त्यावरती सारे काटे ।
Sanjay R.

सोबतीला असतो कोण
एकटेच यायचे इथे ।
जोडायचे मग एकेकाला
कसे जुळते नाते तिथे ।
रोज एक नवा दिवस
काय ध्येय काय कुठे ।
क्षण क्षण सरतो पुढे
मागे मागे सारे सुटे ।
पोटासाठी परिक्रमा
घामासोबत रक्त आटे ।
शेवटी हातात शून्य
रास्त्यावरती सारे काटे ।
Sanjay R.
सगळेच म्हणतात मला
आहेस तू बळीराजा ।
भोगतो मात्र दुनियेची
दुःख हीच माझी सजा ।
फाटक तुटकच नशिबात
राहतो नेहमी अंधारात ।
अख्ख आयुष्य गेलं बघा
निरंतर असतो कष्टात ।
आडोशाला भिंती चार
वर फाटक तुटक छप्पर ।
शिक्षण पाणी पण शून्य
पोरही निघाले सारे टिप्पर ।
आशा मात्र सुटत नाही
उपसतो कष्टाचा डोंगर ।
एकच पाऊस देतो धोका
फिरते मेहनतीवर नांगर ।
लुटारू तर सांगू किती
खिसा भरतो व्यापारी ।
कर्ज काढूनच जगतो मी
झकास चालते सावकारी ।
राजकारण्यांच काय सांगू
देऊन जातात आश्वासन ।
शेतकऱ्यांचा नाही कोणी
काय करते सरकार पन ।
रडत फडत जातो दिवस
कुठला आला दिवाळ सण ।
नशीबाचाच फेरा आहे
हेच आमचे जीवन मरण ।
Sanjay R.
आज दसरा आहे, पण वाटतच नाही दसरा आहे म्हणून, मन अशांत होतं. उठल्या बरोबर गाडी धुवायला घेतली. हेच आजकाल प्रमुख वाहन झाले होते. त्याची आज पूजा करायची होती. सकाळीच तयार होऊन बाजारात गेलो, अगदीच तुरळक दुकानं थाटली होती. झेंडूची फुलं आणि सोन पण विकायला होत.
म्हटलं चला सोनं घेऊ या. सायंकाळ आज मस्त जाईल, थोरामोठ्यांना सोनं देऊ आणि त्यांचे आशीर्वाद घेऊ. नेहमीसारखीच वर्दळ होईल. सगळ्यांच्या गाठी भेटी होतील. सगळ्यांचा हाल अहवाल मिळेल. सायंकाळ कशी मस्त जाईल.
झेंडूची फुल, सोनं, आंब्याची पानं आणि इतर काही वस्तू घेऊन घरी आलो. बसून छान झेंडूच्या फुलांचे हार तयार केले. त्यात हिरवी हिरवी आंब्याची पानं घातली. मनात उत्साह भरला. दाराला तोरण लावले हार चढवला. गाडीला पण एक हार चढवला. देवाच्या फोटोला हार घातले. घरातले होते नव्हते सारे शस्त्र म्हणजे खल बत्ता, कांदे कापायची पावशी, काढले, मस्त धुवून त्यांना देवासमोर मांडले आणि शस्त्र पूजा केली. आजकाल शस्त्रपूज या शस्त्रांचीच होते, तलवार भाले बिचवे उरलेच कुठे. आणि आम्ही कुठे रणांगणात लढाईला जाणार. घरात कांदा कप्तान होते तीच आमची लढाई. किती अश्रू निघतात तेही करताना. कधी कधी तर डोळे पण सुजतात या खोट्या रडण्याने.
घरात पुरी भाजी चा बेत सुरू होता. नैवेद्याला गोड म्हणून खमंग तुपातला शिरा भाजने सुरू होते. तो सुगंध हवा हवासा वाटत होता. दुपारी देवाला नैवेद्य करून जेवण आटोपले. आणि आरामात घर सजवायला घेतले. सगळ्या वस्तू व्यवस्थित धुवून पुसून जागच्या जागी ठेवल्या. थोडी स्वच्छता केली. सायंकाळी लोक येतील. सगळं कसं टाप टीप दिसायला हवं. करता करता बराच वेळ गेला.
सीमोलंघनाला जायची वेळ झाली. थोडे नवीन असलेले कपडे घालून तयार झालो. कपाटात ठेवलेला परफ्युम काढला. दोनदा तीनदा अंगावर उडवला. सुगन्ध छान येतोय याची खात्री करून घेतली. थोडा घरात पण शिपडला. सगळे घर सुगनदीत झाले होते. मधेच बायको बोलून गेली. अहो हे कशाला मारलं, आता माझं डोकं दुखणार, तुम्हाला माहिती आहे ना मला याची एलर्जी आहे ते. तरी मी ते आलमारीत लपवून ठेवले होते. तिथे पण तुम्ही शोध लावलाच. मी थोडा खजील झालो. पण म्हटलं अग आज दसरा सो उत्साह भरायला नको का. आजच्या दिवस चालवून घे. पंखा चालू करतो. थोड्या वेळात कमी होईल सुगन्ध. तुला त्रास नाही होणार.
बायकोला सांगून मी बाहेर पडलो
सीमोल्लंघनाला… कुठे जायचे काहीच ठरवले नव्हते. बाहेर रस्त्यावर आलो तर गर्दी खूपच तुरळक दिसत होती. सगळे कदाचीत घरी परतणार असावेत. दरवर्षी सीमोल्लंघनाला जाणारी ती गर्दीच नव्हती. सगळं कसं शांत शांत भासत होतं. तरीही मी आपला चालत राहिलो. तसाच चालत चालत गावाच्या बाहेर पोचलो होतो. माणसांचा अगदी शुकशुकाट वाटत होता . सूर्यही परतीला पोचला होता. दरवर्षी लागणारी खेळण्यांची दुकानं लहान मोठ्यांची गर्दी काहीच नव्हतं. रावण दाहनही कुठेच दिसले नाही. यंदा रावणाला आनंद झाला असणार . मी तसाच परत घरी पोचलो.
आता थोडा अंधार पडला होता. घरात येताच हात पाय धुवून देवाला नमस्कार केला. पाहिले सोने देवाला द्यायचे या नियमाने देवाला सोने दिले. नमस्कार केला. बायकोनेही मला सोने दिले. नमस्कार करून आता सगळ्या बाहेरच्या थोरामोठयांना सोने द्यायला आपण मोकळे, म्हणून हॉल मध्ये आलो. आई बाबांची आठवण येत होती. दरवर्षी त्याना सोनं द्यायचो आणि ते भरभरून आशीर्वाद द्यायचे ते आठवलं. ते जाऊन आता चार वर्षे झाली होती पण आठवण मात्र सुटत नव्हती. आठवण आली की सगळं आठवायचं. आपलं लहानपण ते मोठं होईस्तो त्यांनी आपली घेतलेली काळजी, त्यांचे लाड प्रेम आणि कौतुक. आता त्यातलं काहीच उरलं नव्हतं. मन हळवं झालं. बायकोनेही माझ्या मनात काय चाललं ते ओळखलं . आणि तीही हळवी झाली. वातावरण आनंदी व्हावं म्हणून ती बोलली चला आता लोकं येतील. थोडा चेहरा मोहरा बदला. थोडे आनंदी दिसा. चला तयारी करा आता.
आम्ही दोघेही तयार झालो आणि वाट भट बसलो सोनं वाटायची. बराच वेळ निघून गेला पण यंदा कोणीच कोणाकडे सोनं द्यायला आलं नाही की गेलं नाही. मग आम्हीही कपडे बदलून घेतले. मधेच बायको विचारून गेली जेवण करणार का. जेवायचाही मुडच गेला. नको वाटत होतं. मग तशेच झोपायला गेलो.
शेवटी बायकोच बोलली हे पूर्ण वर्षच कोरोनाने आपल्या विळख्यात घेतलं. सगळं आयुष्यच थांबवलं. माहीत नाही कधी जाणार हा कोरोना.
ना दसरा ना दिवाळी… घ्यायची फक्त कोरोनीलची गोळी . जाऊ द्या जातील हेही दिवस.. आणि मग परत एकदा सगळे आनंदी होतील…
संजय रोंघे
नागपूर
हळूच मोहरून जातो
हळुवार स्पर्श मायेचा ।
होते मन भीर भीर
आठवतो पदर आईचा ।
अजूनही आहे अंतरात
भरलेला गंध जाईचा ।
ओढ कशी वासराला
हंबरडा चाले गाईचा ।
माया ममता प्रेम सारे
स्पर्श एकच सुखाचा ।
फिरता हात पाठीवरती
सरतो लवलेश दुःखाचा ।
Sanjay R.
स्वभावच माणसाचा असा
नसतो कधी समाधानी ।
म्हणतो मी काय कमी
दिखावा नुसता स्वाभिमानी ।
अज्ञानाचा असूनही सागर
सांगे मीच मोठा ज्ञानी ।
माणूसच तो माणसासारखा
त्याच्यासारखा नाही कोणी ।
Sanjay R.
आजची सकाळ ना मला
थोडी वेगळीच वाटली ।
निळे आभाळ सूर्याची लाली
सौंदर्याने धरा कशी नटली ।
हिरवी पाने रंगीबेरंगी फुले
धरा ही कशी रंगात भिजली ।
झुळझुळ वारा डुलता पसारा
सृष्टी सारी ही किती सजली ।
जिकडे तिकडे हिरवा गालिचा
दवबिंदूनी झाली धरती ओली ।
प्रसन्न झालो बघून थाट धरेचा
हास्य पसरले क्षणात गाली ।
Sanjay R.
आयुष्य आहे रस्ता
मनुष्य एक प्रवासी
अखंड चाले प्रवास
नाही कोणी निवासी
जगतो आम्ही सारे
जग हे आभासी ।
अस्तित्वाची लढाई
खेळ चाले जीवाशी ।
स्वप्न उरात किती
खेळ चाले मनाशी ।
थकून भागून निजतो
ठेवतो बांधून उशाशी ।
Sanjay R.
मनाला कुठले सुख
त्याला तर असते हाव ।
हे हवे ते हवे सारेच हवे
सुरू असते धावाधाव ।
कधी म्हणतो देवाला
एकदा मला पाव ।
पावलाच कधी तर
घेत नाही परत नाव ।
आयुष्य जाते असच
नुसता जीवाला काव ।
सरते शेवटी मात्र मग
बसतो कुरवाळत घाव ।
कधी सुख कधी दुःख
हेच जीवनाचे नाव ।
वेळ काढून थोडा
जीवाला जीव लाव ।
Sanjay R.
जगणे मरणे नाही हाती
ध्येय काय या जीवनाचे ।
दिवस रात्र चाले अभ्यास
असते खूप खूप शिकायचे ।
नोकरीसाठी झिजते चप्पल
सांगा किती धडपडायचे ।
नोकरी व्यापार कुठे आधार
कष्टच करून मग जगायचे ।
चाले सदाचा एकच संघर्ष
मलाही तुमच्यात बसायचे ।
दिवसामागे दिवस जातात
राहूनच जाते मागे हसायचे ।
कळतच नाही सरते सारं
सांगा नाही मला हो मरायचे ।
Sanjay R.
असेल नातं हळवं
पण आहे ते दृढ ।
मनात असते तगमग
पण नसतो त्यात सूड ।
घेतो मी सांभाळून
वार कितीही झाले ।
विसरायला काय लागतं
चुकते कधी आपले ।
चुकभुल देणे घेणे
दोन बाजूंचे नाणे ।
संसार हा असाच
गातो कधी रडगाणे ।
प्रेमाला कुठला बंध
विचारच होतात बेधुंद ।
क्षण दुखाचाही येतो
शोधू त्यातही आनंद ।
Sanjay R.
मनात किती आठवणी
जपतो एक एक मणी ।
आयुष्याचा क्षण प्रत्येक
सांगा टिपला तेथे कोणी ।
एकांतात होते मज याद
मनाचा आहे मी ऋणी ।
आठवण देते कधी आनंद
तर कधी डोळ्यात पाणी ।
व्यथित जेव्हा होते मन
तेव्हा मन मनाला जाणी ।
Sanjay R.
दे जरा सन्मान तू
या स्त्री शक्तीला ।
कर विचार थोडा
सांगा त्या व्यक्तीला ।
करू नको अन्याय
विचार तू मनाला ।
कोण ही नारी
विसरलास का आईला ।
हो जागा थोडा
बघ तुझ्या बहिणीला ।
उभी बाजूला तुझ्या
सांग तू पत्नीला ।
झाली मोठी थोडी
बघ तुझ्या मुलीला ।
नाते असो कुठलेही
स्थान हृदयात प्रेमाला ।
प्रत्येक रुपात दिसेल
कर तू नमन देवतेला ।
दुर्गा अंबा जगदंबा
भय तिचे राक्षसाला ।
होऊन निडर लढते
करतो सलाम शौर्याला ।
नारी तूच आहे महान
नाही शंका कोणाला ।
नतमस्तक आम्ही सारे
आधार तुझा जीवनाला ।
Sanjay R.
नवरात्री महोत्सव आहे सुरू
वाटतं मला काय काय करू ।
आठवते मला देवळतली गर्दी
जाता येत नाही होईल सर्दी ।
चौका चौकात देवीची आरास
निघताच येत नाही होतो त्रास ।
मनात होतं यंदा दांड्या खेळायचं
घरातल्या घरात कसं नाचायचं ।
बघा जरा आलेत कसे हे दिवस
सम्पू दे कोरोना मी करतो नवस ।
दिवाळी दसरा येइल पुन्हा परत
वर्ष हे यंदाचे आलेच आता सरत ।
Sanjay R.
गण्या आमचा लय भारी
म्हने लगन पायतो करून ।
पोरगी रावबाची दिसते हेमा
म्हने आनतो तिले धरून ।
घर हाये लहान पन
लगन झाल्यावर चालन ।
मायले सुख भेटन
आन बा ले आयतं जेवन ।
मलेबी होईन थोडी मदत
थोडं कामबी थे करन ।
मलेच भरा लागते पानी
थे बी थे भरन ।
माय म्हने मोठा आला तू
बायको तुई काय काय करन ।
एवढं काम करून बापू
पोरगी जगन का मरन ।
सून माई कवतीकाची
लय लाडाची थे आसन ।
मीच करीन काम आनं
थे गोष्टी करत बसन ।
हरिक आला गण्याले
मायचं बोलन आयकून ।
म्हने कराचंच आता लगन
देऊ अमदा धडकून ।
Sanjay R.
निघतो रथ संसाराचा
त्याला असती चाके दोन ।
चाले रथ रोज पुढे पुढे
खाच खळगे कुठे कोण ।
लक्ष असते जीवनाचे
विश्वास असतो विजयाचा ।
जय पराजय बाजू अनेक
उत्सव होतो आनंदाचा ।
डोकावून जाते दुःख कधी
विचार त्याचा नसतो मनी ।
प्रयत्नांची मग होते शर्थ
दूर होतात सारे शनी ।
फुलते मग बाग फुलांची
पाखरं होती दोन पक्षांची ।
दिवसामागून दिवस जाती
अविरत चाले चाकं रथाची ।
Sanjay R.
चला करू आपण सारे
आज अनोखी वारी ।
काय महत्व जीवनात या
सांगतो तुझे ग नारी ।
पाठ पंढवते संस्कारांचे
आहेस किती तू विचारी ।
शिक्षित करते घर सारे
घरची शान आहे नारी ।
माणूस म्हणे मी कामी
असेल रिकामा तो जरी ।
भार उचलते स्त्रीच सारा
असू दे कितीही भारी ।
घेऊन ती अचूक निर्णय
देई आनंदाची फेरी ।
नारी विना तर होईल काय
जगत जननी तू भारी ।
अंबा जगदंबा लक्ष्मीही तू
पूजन होई घरो घरी ।
विरांगणेची गाथा तुझीच
स्तवन करतो सारी ।
Sanjay R.
शोधतो मी मला
दिसलो का कुणाला ।
आहे कुठे मी सांगा
विचारले माझ्या मनाला ।
ब्रह्मांड हे केवढे
व्यापले कण कण इथे ।
पाताळ धरती आकाश
अनंत विशाल जिथे ।
ग्रह तारे आणि नक्षत्र
जीव सजीव निर्जीव ।
दृश्य कोणी अदृश्य
सीमा नाही आजीव ।
परिक्रमा या जीवनाची
संपता कधी संपेना ।
अविरत चाले शोध
कोणी कुणास मिळेना ।
Sanjay R.
काय लिहिणार रोजनिशी
जीवनच आपले भंगार ।
अजुबाजूला बघतो जेव्हा
पेटतो मस्तकात अंगार ।
जिकडे तिकडे सावळा गोंधळ
पेटते दहशतीची चिंगार ।
माणुसकीच उरली नाही
फक्त माणसं इथे रंगणार ।
Sanjay R.
इच्छा हा असा प्रकार
मन देई त्यास आकार ।
सोडूनि सारे विकार
करा इच्छेस साकार ।
इच्छा करवी विचार
तद्वत बदले आचार ।
कोणी होई लाचार
अंगी कुणाच्या संचार ।
करु या सहज वार
लागेल नौका पार ।
कुठे कुठला सार
बस इच्छे वरती मार ।
नका पत्करू हार
नव्हे जीवन भार ।
करु संकटावर प्रहार
पुरे छोटासा आधार ।
Sanjay R.
झालो जरी मोठा मी
बालपण मला छळतं ।
येणार नाहीत दिवस परत
मनाला माझ्या कळतं ।
खूप वाटतं व्हावं छोटं
मन भूतकाळात पळतं ।
येणार नाहीत ते दिवस
त्यातच मन हळहळतं ।
कधी वाटत रडावं जोरात
पण वयामुळे ते अडतं ।
आनंदही आतच असतो
आतल्या आत मन जळतं ।
Sanjay R.