” मनाचे समाधान “

धडपड सारी चाले
हवे मनाचे समाधान ।
जगायला काय हवे
विचारांचे आदान प्रदान ।
हवे थोडे ज्ञान विज्ञान
हवा थोडासा मान सन्मान ।
माझे माझे म्हणती किती
त्यातच वाटे त्यांना शान ।
लुटतो माणूस माणसाला
उरले कुठे माणुसकीचे भान ।
Sanjay R.

” दिमाखाचे झाले दही “

दिमाखाचे झाले दही
सुचतच नव्हते काही ।
छोटुश्या गोष्टी साठी
विचार होते काहीबाही ।
चुटकीसरशी सुटले सारे
हसत सुटलो हि ही ही ।
नेहमीच होतं असं जेव्हा
शोधू नका दिशा दाही ।
आरोग्यासाठी घातक हे
टेन्शन चिंता नको काही ।
Sanjay R.

” नको तो राग “

नको ते राग सांभाळणे
आहे कार्य कठीण फार ।
पायाखाली नसते जमीन
दूर जातात सारे आधार ।
मुखात असेल ताकत तर
होतो समोरचा मग गार ।
नाहीतर नक्कीच भेटेल
अंग फुटेस्तो पक्का मार ।
Sanjay R.

” मुलं मोठी होताना “

मुलं मोठी होतांना
प्रश्न किती असतात ।
आई वडिलांना मात्र
मुलं नेहमीच छोटी दिसतात ।
लाड प्रेम कौतुक किती
मुलांना सारंच ते देतात ।
क्षणोक्षणी काळजी असते
सर्वस्व ते मुलांनाच देतात ।
हळूहळू होतात मुलं मोठी
पसरून पंख झेप ते दूर घेतात ।
विसरून आपली दुःख सारी
आईवडील मग्न  कौतुकात ।
कधी सुख कधी दुःख
जाता जाता दिवस जातात ।
शेवटी मात्र आईवडील
मागे एकटेच मग उरतात ।
Sanjay R.

” कॉलेज “

असेल मी छोटासाच
शाळेत जायचा कंटाळा ।
पाटी पुस्तक दप्तर पेटी
गुरुजींचे नियम पाळा ।
कॉलेज वाल्यांचा वाटे हेवा
कुठले दप्तर कुठली शाळा ।
एका वहीत सारेच चाले
पिरेड नसायचे अनेक वेळा ।
शाळेसारखा नाही युनिफॉर्म
कॉलेज म्हणजे युवा मेळा ।
Sanjay R.

” विसरलो आम्ही आजोळ “

पोटापाण्याच्या विवंचनेत
सगळेच सारं विसरले ।
पुढे जाण्याची स्पर्धा किती
स्वप्न जगण्याचेही धुसरले ।

अभ्यास असो वा नोकरी
स्पर्धेविना नाही टिकाव ।
ऐपत असो वा नसो
फक्त हवा माणसात बडेजाव ।

आई बाबा आजी आजोबा
दिवस येकट्यात घालवतात ।
कुणालाच कुणाची नाही चिंता
ओलावा नात्यातला विसरतात ।
Sanjay R.

” आपलेही घर असावे “

आपलेही एक घर असावे
मागे पुढे त्याला दार लावावे
जमपुंजी सारीच जवळची
आपल्या त्या घराला लावावी
जेणे करून आयुष्याचे उरलेले दिवस
म्हणजे म्हातारपण त्यात सुखाने जावे
निघा इथून बाहेर कोणी न म्हणावे
पण दिवस कुठे राहिलेत तसे ।
मोठ्या आनंदाने मुलांचा
संसार थाटून देतात आई वडील
आणि मग काही दिवसात तीच मुलं
त्या म्हातार्यांना घराबाहेर काढतात
आणि म्हाताऱ्यांची सारी स्वप्न
तिथेच उधळून टाकतात
कसे आलेत हे दिवस …..
Sanjay R.

” वीरांची गाथा “

आठवा जरा त्या वीरांची गाथा
दिले स्वातंत्र्य उंचावला माथा ।

शूर वीर ते चढलेत फासावर
राष्ट्रभक्तीचे गीत गाता गाता ।

धन्य धन्य ते वीर स्वातंत्र्याचे
धन्य त्यांचे माता आणि पिता ।

घरदार सोडून झाले ते वीर
माँ भारतीची बघून व्यथा ।

नाव किती मी घेऊ वीरांचे
आठवा जरा हो त्यांना आता ।

वचन मागती आज ते सारेच
नका विसरू बलिदानाची कथा ।
Sanjay R.

” लग्न आयुष्याचा बंध “

लग्न आयुष्याचा बंध
त्यात जीवनाचा आनंद ।
गृहस्थाश्रमीच्या वाटेत
किरण प्रकाशाचे मंद ।
एक एक पाऊल पडता
दरवळे संसारवेलीचा गंध ।
सुख दुःख होती पार
व्हायचे त्यातच धुंद ।
Sanjay R.

पहिली नोकरी पहिला पगार

पहिली पहिली नोकरी
पहिला पहिला पगार  ।
लहानपणी वाटायचं
होऊ दे मोठा
आणीन मी पगार ।
खर्च करील खूप
होईल स्वतःचा आधार ।
आई बाबा ताई दादा
तुम्हा हवा कुठला प्रकार ।
करील खरेदी तुमच्यासाठी
उचलून आणील बाजार ।
खूप केलं तुम्ही माझं
आता होईल मी जवाबदार ।
Sanjay R.

” गोष्ट जाम्बाच्या चोरीची “

दामू आमच्या गावाचा सर्वसाधारण शेतकरी . आमच्या शेताच्या समोरच त्याचे शेत आहे. मी गावाला शेतात गेलो की त्याची भेट होते.
तो मग मुद्दामहून माझ्या जवळ येतो आणि काहीबाही गोष्टी सांगत राहतो. आणि एकदा त्याची गाडी सुरू झाली की किमान दोन तीन तास तरी ती थांबत नाही. त्याच्या गोष्टी ऐकून मग हसून हसून पोट दुखायचे सुरू होते. आता मलाही त्याच्या गोष्टींची इतकी सवय झाली की , गावात शेतावर गेलो आणि दामुची भेट झाली नाही आणि त्याची एक नवीन गोष्ट ऐकली नाही तर गावाला गेल्यासारखेच वाटत नाही. दामुची गोष्ट ऐकली की मन ताजे तवाने झाल्या सारखे वाटते. उत्साह भरतो.

आजही मी गावात आलो आणि नास्ता करून सरळ शेतात गेलो. जाता जाताच दामूच्या शेताकडे लक्ष गेले तर दामू आपल्या कामात मग्न होता. मग मी आपल्या शेतात थोडं फिरावं म्हणून बांधाने निघालो. फिरता फिरता एक नवीनच बोरी चे झाड बरेच मोठे झाल्याचे लक्षात आले. त्याला बोरे लागली होती. लाल हिरवी बोरे पाहून माझ्या तोंडाला पाणी आले आणि सहजच माझे हात ते लाल लाल बोरे तोडण्यासाठी पुढे झाले. बोर पिकले असल्या मुळे थोड्याश्या धक्क्यानेही खाली पडत होते. मी प्रयत्न करून अगदी अलगद हातानी काही बोर तोडली आणि खिशात टाकली. बोर तोडता तोडता काट्याचे ओरफाटेही माझ्या हातांना सहन करावे लागले. आता माझा खिसा बोरांनी पूर्ण भरला होता. एक एक बोर मी तोंडात टाकत त्याचा आस्वाद घेत होतो. बोरांची आंबट गोड चव मला खूप छान वाटत होती.मी शेतात फिरून झाल्यावर ओट्यावर बसत नाही तोच दामू हजर झाला. बापा कवा आले जी, गाडी दिसली तुमची रोडवर मुन लक्षात आलं माया. मनलं चाला भेटून घ्यावं बापुले असं म्हणत तो माझ्या समोर दगडावर बसता झाला. मी त्याला  माझ्या खिशातून चार पाच बोर त्याला दिले. दामुच्या गोष्टी सुरू झाल्या होत्या. गोष्टी गोष्टीत रानातल्या बोरं, पेरू ची गोष्ट आली आणि मग पेरू ची चोरी आणि त्याची झालेली त्याची फजिती ही गोष्ट त्याने सांगायला सुरुवात केली.

आजी त्या वकती मी असन चवदा पंधरा वर्षाचा. गँगच होती आमची पोट्यायची. लय उरफाट्या डोक्याचे पोट्टे होते सगळे. एक दिस मी आन थो वसंता न्हाई का दोघबी कुठूनका आता आठवत न्हाई त येत होतो. रस्त्यात एक मारोड्याची वाडी होती. वाडीत जांबाचे लय झाडं होते. आन मस्त पिकले पिकले जांब लागले होते. म्या त्या राखनी वाल्याले दोनचार जाम्ब मांगतले त थो बहिन मा वर असा बिथरला का सांगू नका. म्हने फुकटात भेटते का, इकत भेटन, लागते का सांग. जो थो इऊन जांब मांगते माही मेहनत कशी निंगन. रातचे चोरं बी घिऊन जातेत, बहिन रातची बी जागली करा लागते. तुले काय हाये. तसा वसंता म्हणे बावाजी आमाले काय दोन जांब दिले तरी चालते जी. पण रखवालदाराने त्यांना तिथून हुसकावून लावले.

तसे दोघेही गावात आले आणि सगळ्या आपल्या दोस्तायले ती गोष्ट सांगितली. बहिन दोन जांबबी न्हाई दिले गा त्यानं आमाले म्हणत  दामूने आपला रोष सगळ्यापूढे व्यक्त केला. मग सगळ्या नि ठरवले की आज रात्री लेकाची अख्खी वाडीच उतरून आणाची. इक म्हना मंग काय ईकतं तं. सगळ्यांनी रात्रीची तयारी केली सोबत खाली पोते घेतले आणि पाच सहा पोट्टे निघाले वाडीकडे. रात्रीचे सात आठ वाजले होते. सगळ्यांचा अंदाज होता की रखवालदार जेवायला गावात गेला असणार. पण बघितले तर तो तिथेच बसून शेकोटीवर हात शेकत होता. काय करावे याचा विचार करत सगळे तिथेच लपून बसले. रखवालदार जाण्याचे काही चिन्ह दिसत नव्हते. वाट पाहण्याशिवाय पर्याय नव्हता. तसा गँगमधला मधु म्हणाला बहिन किती वाट पहाची गा. चाला लेकले बुढ्याले उचलून इरित टाकू न आपलं काम करू. पण तो विचार कोणालाच पटला न्हाई. तसा काही वेळाने रखवालदार उठून उभा झाला. तशी सगळ्यांची नजर रखवलंदारावर लागली. रखवालदाराने थोड्या काड्या, कचरा जमा करून शेकिटी जवळ ठेवला आणि तोंडातून हूरर हूरर करत आवाज काढला. तो तिथे हजर असल्याची जाणीव करुन देत तो चुपचाप जेवायला म्हणून गावाच्या रस्त्याने लागला. तसे वाट पाहत असलेली गँग हळूच आत वाडीत घुसली. आणि माकडा सारखी सगळी बाग खाली करून टाकली. कच्चे पिकले सारे जाम्ब काढून घेतले. सहा सात पोते भरले. आणि प्रत्येकजण आपले आपले पोते  खांद्यावर घेऊन परत निघाले. गाव जवळ येताच आता एवढे पोते ठेवायचे कुठे, घरी तर नेता येत नाही, नाहीतर चोरी फुटेल आणि बापाचा मार पडेल ते वेगळंच. मग सगळे पोते आमराईत झुडपामध्ये लपवून ठेवायचे ठरले. रस्त्याने येता येता सगळ्यांचे जांब खाणे सुरू झाले होते. मग सगळे आमराईत घुसले. मोठे झुडूप पाहून त्यात ते सगळे पोते लपवून ठेऊन सगळे गावात आले.

आता दुसऱ्या दिवशी सकाळपासून पोरांचे एकच काम होते , बस जांब खायचे. दिवसभर सगळे जांबवरच होते. दुसरा तिसरा दिवस ही जांबवरच निघाला. मात्र दिवस थंडीचे आणि पोटात तीन दिवसांपासून पोटात नुसते जांब होते. सगळे पोर मस्तीत होते. रखवालदाराला धडा शिकवल्याचे समाधान होते. पण रात्री वसंता ची अचानक तब्येत बिघडली. तो नुसता थरथर कापत होता आणि उलटया करत होता. एक एक करता करता सगळी गँगच आजारी झाली. गावात बातमी पसरली. याचा पोरगा, त्याचा पोरगा करत सगळे पोरं बिमार होऊन राहिले होते. काय झालं कुणाला काहीच कळत नव्हतं. सगळ्यांची आजाराची लक्षणे सारखीच होती. कोणी म्हणत होतं काहीतरी हा करणीचा प्रभाव असेल, कोणी म्हणत होत गावावर हे भलतीच आफतच आली. कोणी काही कोणी काही बोलत होते. दुसऱ्या दिवशी सकाळी सकाळी रखवालदार गावात आला आणि सांगू लागला चार दिस अगोदर बहिन अक्खी वाडी उतरून नेली जी चोरायनं. बहिन दुपारी दोन पोट्टे आलते, जाम्ब मांगे, म्या त्यायले हाकलून देलत, त्यायचीच करामत असन असं वाटते, आता म्या कोनाले पाह्यलं नाही त नाव कसं घेऊ कोणाचं, माही सगळी मेहनत बेकार गेली म्हणून तो रडत होता. दामुच्या वडिलांनी ती गोष्ट ऐकली आणि त्यांना संशय आला. घरी येऊन ते दामू जवळ गेले. दामू थंडीने थरथर कापत होता. उलट्या करून करून चेहरा निस्तेज झाला होता. त्याच्याच्याने उठून बसने पण होत नव्हते. त्यानी दामुला विचारले. बाबू खरं सांग तुन काय खाल्लं . तुले इतकी थंडी भरली. जांब खाल्ले का गा. तसा दामू बोलला हो जी. मूनच असन अस झालं. झालं सगळ्यांच्या आजाराचे कारण कळले होते. गावातल्या एका जाणकार वैद्याने ताबडतोब सगळ्या पोरांना उपचार केला. आणि सगळे परत मस्त दुरुस्त झाले.

दामू सांगत होता त्या दिवसापासून त्याला जांबाची हिकच बसली. त्याने त्यानंतर जवळपास चार पाच वर्षे तरी कधी जांबाला हात लावला नव्हता. अशी झाली दामुची जांबाची चोरी. ती गोस्ट ऐकून मी ही खूप हसलो.
संजय रोंघे

” जीवन विचारांचा ग्रंथ “

तुझ्या असण्याची
कल्पनाच होती
आठवणींनीच मात्र
मन व्हायचे संथ ।

मनालाही तेव्हा
होते कुठले काम
विचारांचा तसाच
झाला एक ग्रंथ ।

लिहीत गेलो
पाना मागून पाने
प्रत्येक पानाला नव्हती
दुसऱ्याची खंत ।

प्रत्येक प्रकरण होते
जीवनाचा एक अंक
कळलेच नाही मला
नी झाला अंत ।
Sanjay R.

” मोबाईलचे व्यसन “

व्यसन कसे हे मोबाईलचे
विसर पडतो स्वतःचा ।
लक्षच नसते कशात
स्क्रीन दिसतो मोबाईलचा ।

कोणी काय टाकली कॉमेंट
फिगर मोजतो लाईक्सचा ।
रंगून जातो त्यातच मग
व्यसनीच झालो मोबाईलचा ।

सुटता सुटेना हे व्यसन आता
विसर पडला जीवनाचा ।
यायचे आहे बाहेर यातून
आनंद हवा मज जगायचा ।
Sanjay R.

” शाळेचे दिवस “

आले का आता शाळेचे दिवस
वर्ष तर सारे घरातच गेले ।
पुस्तक नाही पाटी नाही
सारेच दिवस कोरोना नेच नेले ।
होऊ दे आता शाळा सुरू एकदा
गुरुजींचे आहोत आम्ही पक्के चेले ।
गुरुजी मित्र वर्ग आणि फळा खडू
विसरलो सारेच काय हो हे झाले ।
जाईल आता शाळेत करू अभ्यास
करा आता हो दार शाळेचे खुले ।
Sanjay R.


” मनात ही क्षुधा “

मनात ही क्षुधा
नी डोळ्यात आस ।
स्वप्नातही सदा
फक्त आभास ।
स्वार्थ असा की
अंतरात चाले ध्यास ।
सरेल दिवस सारे
थांबेल कधी श्वास ।
अंतालाच आता
सम्पतील सारे प्रयास ।
जीवनाचे काय मोल
का आहे हे खास ।
Sanjay R.

” रात्र ही काळी “

रात्र ही काळी
चंद्र लपला नी
चांदण्यांची पाळी ।

गेला कुठे चंद्र
का तो असा
चांदणीला छळी ।

शोधू कुठे आता
किती हा अंधार
चांदणी आंधळी ।

येणार तो सूर्य
होणार पहाट
दिसेल का सकाळी ।

रात्र अमावसेची
चंद्राविनाच होते
उत्सवात काळी ।
Sanjay R.

” उत्सव प्रेमाचा “

स्पर्धेसाठी

उत्सव आज प्रेमाचा
उत्साह किती मनाचा ।
तुझ्या विना नको काही
संदेश तुज हा मोलाचा ।

रिता अजुन हा कोपरा
तुझ्यासवे मज भरायचा ।
गुलाब बघतो वाट तुझी
गंध हवा त्यास मोगऱ्याचा ।

वाट पाहुनी थकलो आता
क्षण हवा मज आनंदाचा ।
अंत होऊ दे अखेर आता
उदय होईल उत्साहाचा ।

संजय रोंघे

” मन गूढ विचारांचे भांडार “

मन हे तर आहे कसे
गूढ विचारांचे भांडार ।
कधी येईल काय मनात
करील कोण त्याचा विचार ।
क्षणात बदले फेर आपला
नसे कशास कशाचा सार ।
होते कधी ते हळवे इतके
कधी करी मग अति बेजार ।
सरतो जेव्हा विवेक सारा
जडतो मनास कुठला आजार ।
कधी होती मग सिद्ध विचार
नसतो कुठेच कुठला प्रचार
विजयाचे मग वेध लागती
विसरून जाती सारे आधार ।
Sanjay R.