” झाला गाव सुना कवितेचे प्रकाशन “

माझे व्यासपीठ मासिक मुंबई फेब्रुवारी 2020 अंकात माझ्या ” झाला गाव सुना ” या कवितेचा समावेश करण्यात आला. संपादकांचे खूप खूप आभार .

” कुणी सांगा निरोप माझा “

स्वप्न नकळत येतात
देऊन आनंद जातात ।
कुणी सांगा निरोप माझा
ठेऊ किती मी मनात ।

सागर विचारांचा भरला
मावेना आता अंतरात ।
मन करून आज मोकळे
विहरायचे मज अनंतात ।

प्रतीक्षा वाटे नको आता
घे सामावून मज तुझ्यात ।
दिसणार नाही तुला रे
थेंब आसवांचा डोळ्यात ।
Sanjay R.

” बघू किती मी वाट “

नशीबातच माझ्या आहे
फक्त वाट पाहणं ।
ताटकळत बसायचं
उघडून डोळ्याचं पापनं ।

मनात वादळ विचारांचं
लागते श्वासांना धाप ।
कधी कधी तर होतो
अंतरात थरकाप ।

नको वाटतं आता
वाट कुणाची बघणं ।
स्वछंद कसं असत
बघावं ते जगणं ।
Sanjay R.

” कसे व्हायचे महान “

व्हायचे असेल महान
करून घ्यायचा सन्मान ।
योग्यता असो नसो
बस ठेवायचे स्वतःचे ध्यान ।

मी मोठा मी मोठा करत
मिळवायचा आपलाच मान ।
ओळखतात लोकं सारे
हे मिरवणुकीतलं निशान ।

स्वतःच्या स्वार्थापाई
होतो कसा तो बेभान ।
बुद्धी शुद्धी नसतेच त्याला
मिरवतो सारे ठेऊन गहाण ।

हिरा खरा दूरच असतो
असतो त्याला आत्मसम्मान ।
अंधारातही चमचमतो हिरा
त्याची तर अलगच शान ।
Sanjay R.

” जाऊ भूत पाहाले “

लय झालं जेवण
मुन टाकलं आंग ।
दोस्त आले सपनात
म्हने जाचं कुठं सांग ।

इचार केला थोडा
मनलं जाऊ भूत पाहाले ।
भेता का लेकहो
झाले आडदांड काहाले ।

झाले मंग सरळ
म्हने जाऊ भुताच्या घरी ।
घेऊ शोध जरासा
गोष्ट हाये का खरी ।

गेलो मंग सारेच
हाये तिकडं दरी ।
संग वंग होते सारे
पन भेव वाटे तरी ।

जवा पोचलो तेथ
अंधार लय भारी ।
पांढरे कपडे घालून
होती नाचत परी ।

झुंन झुंन तिचे चाळ वाजे
मनलं गोठ हाये खरी ।
बायको हालवे जोरात
पायतो त मी घरी ।
Sanjay R.

” विखुरले मणी “

तुटला धागा
विखुरले मणी
वेचू कसे मी
सांगा ना कोणी ।

धो धो पाऊस
पडतंय पाणी ।
सुचतात कशी
पावसाची गाणी ।

फुलते अंगणात
रात राणी ।
दरवळतो गन्ध
रात्र दिवाणी ।

निशब्द झाली
मुखातली वाणी ।
ऐकायची आता
विरहाची गाणी ।
Sanjay R.

” अभ्यासाचा भार “

लहानश्या वयात
अभ्यासाचा डोंगर ।
पुस्तकांचे ओझे
शाळा कॉलेजचा नांगर ।

लेखन वाचन घोकमपट्टी
शिक्षकांचा मार ।
आई बाबांची कटकट
होम वर्क चा भार ।

रोजच असते परीक्षा
लिहा अभ्यासाचा सार ।
25 वर्षे अशीच जातात
जीवन तार तार ।

मिळते शेवटी डिग्री
मानायचे कुणाचे आभार ।
नोकरीसाठी मग
फिरायांचे दारोदार ।

जीवनच सरते सारे
नाही कशाचाच आधार ।
जिवंतपनी मरणाचे
झेलायचे नुसते वार ।
Sanjay R.

” कोरोना व्हायरस “

चीन मध्ये झाला लोचा
पसरला सगळीकडे कोरोना व्हायरस….

माणसांवर आली मोठी आफत
वाचायचे कसे यातून उत्तर सांगा बस….

गंभीर हा आजार किती
डॉक्टर सारे मिळून शोधताहेत लस…..

हवेच्या वेगाने पसरतोय आजार
मरणाऱ्यांची संख्या वाढतेय छातीत होते धस्स….
Sanjay R.

” प्रेम कथा “

तुझ्या माझ्या प्रेमाची
आहे ही एक कथा ।
वाटे जशी आहे त्या
लैला मजनूची गाथा ।
झेलले वार किती
अंतरात साऱ्या व्यथा ।
नाही सरले प्रेम परी
झुकतो तयापुढे माथा ।
Sanjay R.

” कल्पनेतले विश्व “

आला जमाना इंटरनेटचा
कल्पनेतल्या विश्वाचा ।
गाठ भेट होते आता
स्पर्श हवा मोबाईलचा ।

दूर कितीही असाल तुम्ही
वेळ हवा फक्त क्षणाचा ।
न बघताही होते मैत्री
मित्र किती तो गुणाचा ।

मनात येता विचार कुठला
इतिहास दिसतो जगाचा ।
हवे नको ते सारेच मिळते
आधार झाला जनाचा ।

धोकेही यात आहे अपार
फळतो धंदा फसव्यानचा ।
विवेक बुद्धीचा करून वापर
आनंद उचला जीवनाचा ।
Sanjay R.

” ये ग चिऊ, ये रे काऊ “

ये ग चिऊ ये रे काऊ
या ना थोडे सोबत गाऊ ।
झाड पडले जंगल सरले
प्रश्न तुमचा आता कुठे राहू ।

गेलात सोडून सारे तूम्ही
सांगा तुम्हास कुठे पाहू ।
बालपणातले सोबती तुम्ही
शोध तुमचा कुठे घेऊ ।

लावले अंगणात झाड मी
तिथेच आता आपण राहू ।
सांगतो मी तुम्हास आता
नका नका रे कुठेच जाऊ ।

चला आता घरी जाऊ ।।
Sanjay R.

” मोह माया “

कधीतरी होईल बरे
विचारात जगतो या ।
झर झर जातात दिवस
भविष्याची मोह माया ।

उलगडता भूत काळ
वाटे दिवस गेले वाया ।
पण असतो तोच मजबूत
आज आणि उद्याचा पाया ।

चिंता किती भविष्याची
सारतो दूर सुखाची छाया ।
नकळत मग संपते सारे
कुठे उरते मग मागे काया ।
Sanjay R.

” काय माणसाची गती “

माणसाचे हो वर्ग किती
न कळणारी ही रीती ।

पैश्यानी तोलायचे
एवढंच आपल्या हाती ।

उच्च आणि मध्यम बघा
समावल्या यात किती जाती ।

खलच्याला हो वरच्यांची
नेहमीच असते भीती ।

मिटत आहेत आता
जुन्या जाती आणि पाती ।

नवीन वर्ग होतोय बघा
त्यात गरिबी आणि श्रीमंती ।

मरतो माणूस गरिबीने
श्रीमंतांना माज अती ।

वाटोळं होईल सारच आता
काय ही माणसाची गती ।
Sanjay R.

” ऊब प्रेमाची “

पावसाचे झाले आता
थंडीचा कहर ।
सगळं अंग हलते
होते कशी थर थर ।
सायंकाळी बघा
रिकामेच दिसते शहर ।
प्रेमाची ऊब देणारं
भरलेलं असते घर ।
Sanjay R.

” वाद संवाद “

तू तिथे दूर, मी इथे
मग येते मला याद ।
चिव चिव करत चिमणी
पोचवते तुझी साद ।

शब्दांचा शब्दांशी
होतो जेव्हा वाद ।
शब्द अंतरातले मग
करून जातात संवाद ।
Sanjay R.

” नाही मी कुणी देव “

देवांचा देव महादेव
नाही मी कुणी देव ।
मी तर साधा माणूस
मला दुराचाराचे भेव ।
विचारांपासून देवा अशा
दूरच मला रे ठेव ।
सद्विवेक सदाचारी जो
आहे तोच माझा देव ।
सुखी समाधानी आनंदी
सगळ्यांना देवा तू ठेव ।
Sanjay R.

” संवाद “

असेल संवाद तर
येते आठवण ।
मनात भावनांची
होते साठवण ।
गुंतत जातं मग
विचारी मन ।
बंधनाच्या परिघात
अधीर होतो क्षण ।
Sanjay R.

” संक्रांतीच्या हार्दिक शुभेच्छा “

तिळगुळाची ना
चवच किती न्यारी ।
गोड बोलणं का
इतकं भारी ।
शब्दच शब्दांना
जपतात ना जरी ।
अंतरात विचारांना
जपा थोडं तरी ।
शब्दांनिच जुळतात
नाती किती तरी ।
आनंदी जिवनाचा
मंत्र ओठांच्या दारी ।
Sanjay R.

” हळदी कुंकू “

आली संक्रांत
तीळ गूळ घ्या ।
नसेल बोलायचे तर
तीळ साखर द्या ।

शेंगा बोराचं
वाण मोठं भारी ।
स्त्रिया मिरवायला
जातात शेजारी ।

चिंगी आज खुश
होणार तिची लूट ।
वातावरणात गारवा
पप्पाना हवी सूट ।

संक्रांत आली
घेऊन आनंदी रंग ।
बंटी ही आपला
पतंग उडवण्यात दंग ।
Sanjay R.