ऐक कोरे पान

नजरेपुढे माझ्या
एक कोरे पान ।
नव्हते शब्द त्यावर
पण होत्या भावना ।
कितीतरी वेळ असाच
होतो मी बघत ।
निघायचे तिथून
मनच नव्हते करत ।
अगोदरच मिटवले होते
त्यातले शब्द पट ।
बाजूलाच होते पडलेले
नवे कोरे कागद ।
परत लिहायला
नवीन मनोगत ।
कुणास ठाऊक
भरतील की नाही ।
कळेना काही
की जातील वाऱ्यासह उडत ।
आता सुचत नाही कविता
त्या कथेचा ही अंत ।
पण मनाला वाटत
वाहत राहावी ती धार
अगदी शांत आणि संथ ।
Sanjay R.

फटाके लाडू

झूम झूम जादू
सांगा काय काढु ।
सफाई अभियान
चला अंगण झाडू ।

दिवाळी आली
हवे फटाके लाडू ।
सायंकाळी मस्त
ऍटम बॉम्ब फोडू ।

लाडू चकली कमीच खा
व्हाल नाहीतर जाडू ।
मोटू मोटू म्हणून मग
आम्ही तुम्हालाच छेडु ।

नवे नवे कपडे
जुने आता फाडु ।
दिव्यानच्या माळा
आणि रांगोळी काढू ।
Sanjay R.

दिवाळीचे फटाके

दिवाळी तोंडावर आली पण पैसा….

खिशात एक पैसा नव्हता…

काळजी लागली होती…..

निदान या दिवाळीत तरी कमली ला एखादी साडी घ्यावी, मुलीला फ्रॉक, मुलाला पॅन्ट शर्ट, थोडी मिठाई, थोडे फटाके घ्यावे असे वाटत होते पण पैसाच नाही तर काय आणि कसे खरेदी करणार…..

यंदा पावसाने पाठच सोडली नव्हती…..

शेतात सोयाबीन तर पूर्णच वाहून गेले होते…..

तुरीची झाडही आती पावसाने जळून वळून गेली होती…….

आता आशा फक्त कपाशीची होती…..

अर्धे नुकसान तर आधीच झाले होते……

बियाणे खत औषधाचा सारा खर्च वाया गेला होता…….

पराटी ही साथ देईल असे वाटत नव्हते. बोण्ड अळीचा काहीच भरोसा नव्हता…..

पावसामुळे झाडांची वाढही झाली नव्हती……

आलेली फुलं बोण्ड पकडायच्या आधीच पावसाने गळून पडत होते……

निसर्गाचा प्रकोप सुरूच होता…….. 

निंदन , औषध यातच पैसा लागत होता….. 

तरी बरं होतं की कृषी केंद्र वाला उधारीत सगळं देत होता. नाहीतर जहर पिण्याशिवाय पर्यायच उरला नसता……..

पण आता उधरीचे पैसेही वाढत होते. त्यावर व्याज द्यावे लागणार होते………

तशातच आता ही दिवाळी आली. काय करावे काहीच सुचत नव्हते……..

नामा विचार करत आपल्या पराटी कडे बघत बसला होता……
तशातच संध्याकाळ व्हायला आली…..

सदा त्याला आवाज देत होता पण नामाच्या कानात त्याचा एकही शब्द जात नव्हता…….

शेवटी सदा नामाजवळ पोचला…….

नामा मात्र आपल्याच विचारात इतका मग्न झाला होता की त्याला कशाचेच भान उरले नव्हते…….

सदाने त्याला हलवून भानावर आणले…….

एकदम दचकून उठत नामा बोलला, “काऊन गा सदा काय म्हणत होता”…….


पाय ना गा वावर पुरं वाया गेलं गा”…..

“अमदा कसं होईन गा, कर्ज बी लय झालं ना, कुठून फेडनं होईन कोन जाने”……

“दिवाई आली तर एक पैसा न्हाई खिशात”……. 

“लेकरायले कपडे, फटाके आन थोडस गोड धोड कराचा इचार होता, पर सारच आता पाण्यात गेलं ना”……..

“मांगल्या वर्षी बी असच झालं आन अमदा बी तसच”……

“कधी सरन हे दरिद्री कोण जाणे बाप्पा”……

तसा सदा बोलला, “भाऊ नाम कायले एवढा इचार करत, सबन बराबर होते”……

“तू लोड नको घेऊ”…..

“पाय आता काल पटवारी यिउन गेला ना, सरकार कानं  अतिवृष्टी ची काही मदत करनार हाये…. पाहू होईन कायतरी……. देव करन कायतरी”…..

“तू कानी भायच लोड घेते. देवालेबी आपली चिंता हायेच ना. होते सगळं बराबर. चाल घरी जाऊ”…….

सदाच्या धीराने नामाला थोडे बरे वाटले. दोघेही मग घराकडे निघाले…….

घरी पोचताच कमालीच्या डोक्यावरचे चिंतेचे वादळ थोडे कमी झाले…….

ती म्हणाली “काऊन जी सकाय पासून वावरात गेले, जेवा गिवा च इसरून गेलते का, मी कवा पासून वाट पाऊन रायली”…….


कायले इतली चिंता करता, होते सबन बराबर. उद्या कान अकाउंट मधी पैसे टाकणार हाये सरकार त्या अति वृष्टी चे…….

“उद्या पायजा बँकेत जाऊन, मंग होते ना दिवाई आपली साजरी”……

“रोज जेवाले भेटते थेच त लय हाये”……

“होईन लेकाचा कापूस”……

“खंडन सारं कर्ज”…..

“नाही खडलं त देऊ पुढच्या साली, मुन का लहानसं तोंड करून वावरात जाऊन अभायाकड  पहात बसा लागते का”……

“चाला या हात पाय धून मी जेवाले वाढतो. आज म्या अंबाडीची डायभाजी केली. तुमले आवडते ना. चाला या बर”……

असे म्हणून कमली चुली कडे वळली.

दुसऱ्या दिशी सकाइ सकाई पटवारी गावात आला……

त्यानं लांब लचक लिस्टच आणली ज्याचे ज्याचे पैसे जमा झाले होते त्या सगळ्यायचे नाव त्या लिस्ट मध्ये होते…….

नामा ही तिकडे धावला. पटवाऱ्याने लिस्ट वाचून दाखवली…….

नामचेही नाव त्यात होते. आपले नाव ऐकून नामाच्या चेहऱ्यावर हास्याची लकीर पसरली….

त्याची चिंता आता थोडी कमी झाली होती….

नाही काहीत दिवाळी त साजरी करता येणार होती……

कमालीची साडी, पोरीचा फ्रॉक, पोराचं शर्ट पॅन्ट मिठाई, फटाके त्यात होणार होते…….

त्याने मनातल्या मनात देवाचे आणि सरकारचे आभार मानले……

घरात आता आनंदाचे वातावरण पसरले होते.

संजय रोंघे,

नागपूर .

मोबाईल – 8380074730

महागाई

पन्नास वर्षा पूर्वी
स्वस्त होते का सारे ।
म्हणतात महागाई पेटली
जगणे नाही खरे ।

विचार थोडा केला
तेव्हा पगार होता किती ।
खर्चाला नव्हत्या वाटा
हलाखीचीच होती स्थिती ।

मोबाईल टीव्ही गाडी
काहीच तर नव्हते तेव्हा ।
हिंडणे फिरणे चालायचे
काम असेल जेव्हा ।

कमावता असे एकटा
मात्र संसार असे मोठा ।
आता कमावते दोघेही
तरी पैशाचाच तोटा ।

शौक पाणी वाढले
नाही मरणाची भीती ।
डॉक्टरही कसा लुटतो
शिल्लक करतो रीती ।

येऊन जाऊन सारखच
नव्हतं तेव्हाही स्वस्त ।
कमी पैशात ही भागते
फक्त विचार हवेत मस्त ।
Sanjay R.

साथ

प्रेमाला ही हवी
कुणाची साथ ।
वाटतं मलाही
हवा एक हात ।

उगवतो  सूर्य
नि होते प्रभात ।
ढग येतो आडवा
मग होतो घात ।

चूक कुठे ढगांची
होते ना बरसात ।
फुलते धरती आणि
जीव येतो जीवात ।

प्रेमाला ही हवी
कुणाची साथ ।
वाटतं मलाही
हवा एक हात ।
Sanjay R.

आठवण

आठवणीनेच मला
होतो किती आनंद ।
वाटतं आता जडला
मला तुझाच छंद ।

तुझ्या आठवणीत
शोधतो मी गंध ।
येशील का जवळ
होशील का सुगंध ।

तुझ्या नि माझ्यात
जुळला एक बंध ।
जवळ आलो की
का होतो मी बेधुंद ।
Sanjay R.

मन झाले सैरभैर

मन झाले सैरभैर
सावरू कसे मी त्यास ।
सुचेना मज काही
सदा असे तुझा ध्यास ।

मनात एकच आस
त्यातही आहे विश्वास ।
बरसतील सरी आणि
भिजतील चिंब श्वास ।

नको सावरू तू मन
नको आवरू तू तन ।
चल जाऊ दूर कुठे
तिथे घालवू दोन क्षण ।
Sanjay R.

नाव ही जीवनाची

अथांग सागरात निघाली
नाव ही जीवनाची ।
नाही ठाउक किनारा
ओढली चादर आकाशाची ।

नकळे मी जाऊ कुठे
मावळल्या साऱ्या आशा ।
सूर्य होता सोबतीला
ठरवली त्यानेच दिशा ।

सूर्य मावळता आकाश्यातून
लागला चन्द्र दिसाया ।
चांदण्यांनी दिली वाट
लागलो मीही हसाया ।

पहाटेला लागला किनारा
होता गार गार वारा ।
पक्षांची झाली किलबिल
आला सूर्य होऊन तारा ।
Sanjay R.

जीवनाच्या वाटेवर

जीवनाच्या वाटेवर
किती इथे प्रवासी ।
जगताहेत सारेच
काही त्यात हौसी ।

सुख असो वा दुःख
कुणी सदा रडतो ।
कुणी अडखळून
वाटेतच पडतो ।

काटेकुटे दगड धोंडे
वाट आहे कठीण ।
हसत हसत करू पार
येईल कशाला शीण ।

लोभ नको मोह नको
करतात आम्हा दिन ।
बघा एकदा करून
माणूसच हवा लिन ।
Sanjay R.

रेशीमगाठ

बांधली तू गाठ जशी
जीवनात माझ्याशी ।
सोडू नकोस आता
भांडलो जरी तुझ्याशी ।

घरातली भांडी जशी
आवाज तर करतातच ।
तुझ्या माझ्यातला वाद
असू दे तेवढ्या पुरताच ।

सदा असाच फुलू दे
नात्याचा हा रेशमी बंध ।
निघेल उजळून घर सारे
दरवळेल प्रेमाचा सुगंध ।
Sanjay R.

सुटेना गाठ

नशिबाने बांधली
दारिद्र्याशी गाठ ।
सुटता सुटेना
दिसेना वाट ।

गरिबीचा गुंता हा
गुरफटलो त्यात ।
कामासाठी सांगा
का पडतात हात ।

दिवसभर गळतो घाम
तरीही होतो घात ।
कष्टाचे होते पाणी
नाही कशाची साथ ।
Sanjay R.

गाठ

वेढा घेऊनच बांधता येतो
दोन धाग्यांची गाठ ।
असेच असते नात्याचेही
मन बांधायचं हाच परिपाठ ।
Sanjay R.

भूतकाळ विसरा आता

भूतकाळ विसरा आता
हवा भविष्याचा विचार ।
चला घेहू या झेप उंच
करू भविष्यात संचार ।

झाले गेले विसरून आता
टाकू पाऊल एक पुढे ।
नवनवीन येतील अनूभव
गिरवू आयुष्याचे धडे ।
Sanjay R.

अंतकाळ

नकळत कधी
होतो एक गुन्हा ।
जडते मग सवय त्याची
करतो पुन्हा पुन्हा ।

अशीच कधीतरी
लागली ती सवय ।
चोरीच होती ती
नेले चोरून हृदय ।

नकळत झाले सारे
हवा वाटायचा एकांत ।
मनाने सोडला ताबा
झाले ते संथ ।

हरवायचो आठवणीत
शुद्ध नसे कशाची ।
चाहूल लागता तिची
होई धडधड श्वासांची ।

ती मात्र जगावेगळी
पत्ताच नव्हता कशाचा
हरवलेला मी असा
दोष माझ्याच मनाचा ।

एकदा झाली गाठ
कडी चिमुकले बाळ ।
परतलो मी भानावर
प्रेमाचा तो अंत काळ ।
Sanjay R.

आली परतून रात्र

मज लागले वेध कशाचे
नजर लागली आकाशात ।
निघाली उजळून धरा
स्वच्छ सारेच प्रकाशात ।

वाटले सरला आता काळोख
रात्र परत होणे नाही ।
अंधाराची झाली चोरी
चन्द्र चांदण्या नव्हते काही ।

सूर्य निघाला गस्ती वर
होता तापला त्याचा पारा ।
आभाळ झाले सारे काळे
येऊन गेला मधेच वारा ।

दिवस असाच निघून गेला
आली परतून मग रात्र ।
चन्द्र चांदण्या सारेच हसले
जणू नाटकाचे सारेच पात्र ।
Sanjay R.

आई मागते भिक्षा

आई मी मागते तुज भिक्षा

आश्रय हवा नको देऊ शिक्षा ।

मोठा होईस्तो तुज आम्ही

दिली  रे सारीच तर शिक्षा ।

संस्कार कुठे का कसे नडले

घेतली तू रे भलतीच दीक्षा ।

लोटलेस आम्हा दूर असे

हीच तर आहे रे तुझी परीक्षा ।

जगू मरू रे कसेही आम्ही

काळजी वाटते रे तुझी लक्षा ।

दे सु संस्कार तू पोरांसी

तुलाही न मिळो अशी शिक्षा ।

Sanjay R.

नातेच खोटे

सर्वस्व लावून पणाला
लहानाचे करतात मोठे ।
प्रेम पैसा काळजी किती
वाटते इतर नातेच खोटे ।
माय बापाची माया कशी
वाटे लेकास ठेऊ कुठे ।
लेक होतो जेव्हा मोठा
आईबाप त्यास नको वाटे ।
Sanjay R.

आश्रय

वर आकाश
खाली धरती ।
नाही छत
डोक्यावरती ।

शोधू कुठे मी
आश्रय आता ।
सांग तू रे
तूच विधाता ।

पोटास लागे
अन्न पाणी ।
हातास काम
जीवन कहाणी ।

आश्रयास जरी
आहे ही धरा ।
नशीब ठरविते
आयुष्याचा फेरा ।
Sanjay R.

करवा चौथ

बघू दे चंद्राचे मुख
केला निर्जल उपवास ।
राहवत नाही आता
थांबतील का असेच श्वास ।
जेवणात आहे पंचपक्वान्न
लागला त्यांचाच ध्यास ।
ये ये रे चंद्रा आता
तुझ्या दर्शनाची आहे आस ।
करवा चौथ आहे आज
दिवस आहे किती खास ।
तुझ्या दर्शना शिवाय रे
जाईल कसा पोटात घास ।
Sanjay R.