रंग पंचमी

लहान पण आठवते अजून.
पूर्ण वर्ष जायचं होळीची वाट बघता बघता.
तेव्हा होळीची दोन दोन दिवस सुट्टी असायची.
त्यामुळे वर्गात अगोदरच रंग पंचमी सुरू व्हायची.
वर्गात मग रंग शाईचे उपयोगी पडायचे. एकमेकांच्या अंगावर शाई फेकून रंगोत्सव साजरा व्हायचा. कुणी चिडायचा, कुणी मारायला धावायचा, पण त्यातही खूप मजा यायची. होळीच्या दिवशी सुट्टी असल्याने सगळी मित्र मंडळी लाकड जमा करायला निघायची. गावाबाहेर वाळलेली झाडे बघून ती ओढत आणायची. त्यातही ऐक वेगळीच मजा होती.
होळी पेटली की मग रात्रभर जागरण असायचे. कधी आमच्यातले मोठे उनाड पोरे, कुणाच्या घरुन लाकडे, बाजा, खाटा, पण चोरून आणून होळीत स्वाहा करायचे. मग दुसऱ्या दिवशी ज्याच्या घरून ते आणले ते खूप आरडाओरडा करायचे. शिव्या घालायचे. पण लाकडे कुणी आणली ते कधीच कळत नसे.
मग सकाळी रंग खेळायला सुरुवात व्हायची.
प्रत्येकाचा वेगळा रंग असायचा. सगळ्यांचे चेहरे अगदी अनोळखी होऊन जायचे. कुणी पाणी फेकून ओले करायचे, तर कुणी चिखलाने आंघोळ घालायचे. कुणाचा रंग हिरवा लाल तर कुणाचा काळा.
त्या रंगात आई पण आपल्या मुलाला ओळखत नसे. शेवटी रंग खेळून थकलो की मग घरी जाऊन आंघोळ करायची, लागलेले रंग फिकट व्हायचे पण निघायचे मात्र नाही.
मग पुरण पोळी, करंज्या चिवडा यांचा नास्ता करूनच पोट भरून जायचे.
या सगळ्या आनंदात एखादा व्यक्ती दारू पिऊन तुल्ल होऊन यायचा. खूप ओरड करायचा. मुलं त्याला घाबरायचे पण दुरून त्याची नक्कल करायचे. मग तो खूप चिडायचा, शीवी द्यायचा , मागे धावायचा सुद्धा. पण त्या पळापळी त खूप मजा यायची.
आजकाल मात्र ती मजा तो आनंद हरवला आहे असे वाटते.
आता नैसर्गिक रंगांची जागा रासायनिक रंग गुलालानी घेतली. व्यसन करणाऱ्यांची संख्या ही खूप वाढली. जंगले उरली नाहीत म्हणून लाकडे जाळणे पण कमी झाले.
त्यामुळे होळीत रंग खेळायला भीतीच जास्त वाटते.
रंग पंचमीच्या हार्दिक शुभेच्छा  
Sanjay Ronghe

प्रवास

जनमापासून सुरू इथे
आयुष्याचा प्रवास……

आहेत मार्ग अनेक
फक्त मनात हवा ध्यास…..

प्रवासात या
जगणे फार कठीण…….

असेल मरण सोपे
पण होते तेही कठीण…..

जन्मापासून अंतापर्यंत
येतात अनेक टप्पे……

जगणण्याच्या या शर्यतीत
रोजच भोगायचे धक्के…..

आई बाबा ताई दादा
काका मामा आत्या……

आजी आणि आजोबा
किती किती ही नाती….

प्रत्येक टप्प्यात लाभतात
मित्र मैत्रिणी सोबती…..

सगळी नाती संभाळण
आहे किती कठीण….

मन जुळले तर
घट्ट होते नात्याची विण….

परिश्रमाने इथे मिळतो
मान आणि सन्मान…..

पैश्या शिवाय होते काय
सगळ्यांचे असते तिकडेच ध्यान….

करत पैसा पैसा जगायचे
सोडून सारे शेवटी असेच मरायचे…

नको तो लोभ
क्रोध मोह मत्सर नकोच ती तऱ्हा…

माया ममता प्रेम
हवा वात्सल्याचा झरा…..

सखे सोबती
मिळतात इथे खूप….

मोजकेच असतात त्यात
ओळखा त्यांचे रूप…..

काही सुटतात नवीन मिळतात
प्रवास चालतो निरंतर…..

जुने जाणार नवे येणार
पडत नाही अंतर …..

हसत हसत जगायचे
दुःख मागे सारायचे…..

दुखाविना सुख नाही
दुःखही हसत जगायचे……

बालपण सोपे इथे
आई बाबा देतात हात…

तारुण्याची हवाच न्यारी
मिळते तिथे सोबतीची साथ….

येकाचे होतात दोन
बांधून एकमेकांशी गाठ….

दोनचे जेव्हा होतात चार
जवाबदारी मग धरते पाठ…..

जगणे मरणे तिथेच कळते
जीवनाची लागते वाट….

रात्र सरते दिवस उजाडतो
ती असते नवी पहाट…..

हळू हळू मग दिवस जातात
वार्धक्याची मिळते साद….

कठीण असतो हा प्रवास
माणूस ठरतो इथेच बाद….

आयुष्यभराचे चित्र डोळ्यात
विचार असंख्य असती मनात….

नको नको वाटे साऱ्यास
धावा करतो ने क्षणात…..

अंत यात्रा असते कठीण
उरते तिथे क्षीण काया….

उतरतिचा तोच काळ
का सरते तेव्हाच माया……

लढण्याचे जेव्हा नसते बळ
नियती गाठते आपला तळ….

लेक मुलगी करी दुर्लक्ष
भोगतो स्वतः स्वतःचा छळ….

दिवस येतो अंत्यविधीचा
चार सोबती घेई खांद्यावर….

अग्निचा तिथे डोंब उसळतो
देती सोडून मध्यावर…..

प्रवासाचा होतो अंत
सोडून जातो इथेच सारे…

भस्म होते शरीर नश्वर
राख उडते येताच वारे….

Sanjay R.

” गावाकडच्या जुन्या गोष्टी “

आज गावाला जायचं म्हटलं की खूप कंटाळा येतो. मात्र लहान असतांना गावाला जायचं म्हटलं की खूप आनंद व्हायचा. जायचा दिवस येईपर्यंत मग नुसती स्वप्न रंगायची . कसं जायचं, केव्हा जायचं, कुठे कुठे जायचं, गेल्यावर काय काय करायचं, कुना कुणाला भेटायचं. शेतात काय असेल, आंब्याच्या झाडाला आंबे लागले असतील मग ते कसे तोडायचे. राखणदार असेल मग त्याला चुकवून कसे झाडावर चढायचे. सगळ्या गोष्टीवर विचार व्हायचे.
आणि मग गावाला गेल्यावर मस्त मजा करायची.
आंबे , बेल फळ, शिंदीच्या झाडाचा बुंधा चिंचा खाताना खूप मस्त मजा यायची, गावातल्या मुलांसोबत गाई बैलांना घेऊन शेतात चरायला न्यायचे, नदीत सकाळी पोहायला जायचे, सायंकाळी नदी काठी फिरायला जायचे, कधी जाळे लावून मासे पकडायचे, रात्री अंगणात खाटेवर पडून चांदणे मोजायचे तर सप्तर्षी म्हणजे चार चांदण्या म्हणजे बुढीचे खाटले आणि तीन चांदण्या म्हणजे तीन चोर , ते तीन चोर बुढी झोपायची वाट बघत आहेत,आणि चोरीच्या भीती पाई बुढी कशी रात्रभर जागी राहते या कथेवर चर्चा व्हायची. झोप येईस्तो कथा कथन चालायचे, त्यात राजा राणी, राक्षस अशा अनेक कथा असायच्या.
आज मात्र गावातील ते जीवन पूर्ण पणे बदललंय.
नद्यांच्या ठिकाणी नुसती एक नाली वाहतेय.
आमराईतले आंब्याचे बन पूर्णतः गायब झाले आहे. शिंदीचे बन पण संपले आहे, एखादं दुसरे झाड फक्त साक्ष द्यायला उभे आहे.
गावातले जीवनच पूर्णतः बदलून गेले.
मातीच्या घरा ऐवजी विटा सिमेंट ची घरं झालीत.
सोबत गावातली माणसं पण बदलली.
त्यावेळची माया, प्रेम, जिव्हाळा आता उरलाच नाही.
आता ते गावच राहिले नाही. त्याचे पण शहरीकरण झाले आहे. लोकं पण कोरड्या मनाची झालेली दिसतात.
काळानुसार बदल तर व्हायलाच हवा. पण जो एक कोरडेपणा जाणवतो, तो बघून मन दुःखी होते.
गाव गावच राहिला नाही.

संजय रोंघे
नागपूर

” पाणी पाणी करायचं कोणी “

उन्हाळा आला की सगळ्यांच्या पुढे एकच प्रश्न उभा राहतो आणि तो म्हणजे पाणी . भारताच्या बहुतांश भागात पाण्याची खूप मोठी समस्या आहे .
काही भाग तर असेही आहेत कि जिथे वर्षभर पाण्याची समस्या असते . आणि जिथे पाणी आहे त्या भागात पाण्याचे नियोजन नाही, पाण्याचा अपव्यय जास्त आहे . जसे कुणालाच काही देणे घेणे नाही . या विषयाच्या मुळाशी आपण गेलो तर असे लक्षात येईल की ही पाणी समस्या आपणच आपल्यावर ओढवून घेतलेली आहे.
पाणी समस्येचे पहिले प्रमुख कारण म्हणजे वृक्ष तोड . आपण बघतोच आहोत हळूहळू जंगल नाहीसे होत आहेत आणी ठीक ठिकाणी कारखाने, माणसांच्या वस्त्या झपाट्यानं वाढत आहेत. जंगल कमी होत असल्यानं तिथले पशु पक्षी प्राणी यांची संख्या पण कमी होत आहे. आणि मग त्यांचे अतिक्रमण माणसांच्या वस्त्यांमध्ये होत आहे . पूर्वी शेतांमध्ये आंबा चिंच वड पिंपळ जांभूळ मोह लिंब या मोठमोठया वृक्षांची लोक शेताच्या कडेने जोपासना करत. त्या मुळे शेतात वातावरण थंड राहून पाण्याची पूर्तता व्हायची , पाण्याची पातळी पण जास्त खोल नसायची. परंतु आज सगळे कडे वृक्ष तोड सुरु आहे. शेतकरी शेतातील आणि बांधावरील झाडं तोडून त्यांच्या वाहितीची जागा वाढवत आहेत. शेतातील वृक्षतोडीचे दुसरे कारण म्हणजे शेतातील झाडांवर माकडांचे कळप येऊन वस्ती करायला लागलेत आणि पिकांचे नुकसान करायला लागलेत , म्हणून शेतकरी ही झाडच कापून नष्ट करत आहेत . जंगल कमी झाल्याने तिथल्या प्राण्यांनी त्यांचा मोर्चा गावाकडे वळवला आणि शेतात घुसून आपले पोट भरू लागलेत. हयात प्रामुख्याने रोही, रान डुक्कर, हरीण, नीलगाय मोर, ससे, उंदीर आणि इतर जंगली पशु, पक्षी, प्राणी, आहेत. यामुळे सारे निसर्गाचे चक्रच बदलले दिसत आहे. नद्या, नाले, तळे, डबके सगळेच संपुष्टात आले आहेत. जंगलात पाण्याचे स्रोत सुकून गेलेत, पशु, पक्षी, प्राणी अन्न आणी पाण्याच्या शोधात गाव, शहरापर्यंत येऊन पोहोचलेत. त्यामुळे मानवाच्या जीविताला धोका निर्माण झालेला आहे.

पाणी समस्येचे दुसरे प्रमुख कारण पृथ्वीच्या तापमानातील वाढ. सूर्य आणि पृथ्वी यांच्या कक्षेतील अंतर हळू हळू कमी होत आहे त्यामुळे पृथ्वीवरील तापमान दिवसेंदिवस वाढत आहे. याच्या परिणामामुळे पृथ्वी वरील पाण्याचे बाष्पीभव होऊन पाण्याचे साठे प्रभावित होत आहेत. पावसाचे प्रमाण कमी झालेले आहे. त्यामुळे पाण्याची कमतरता जाणवू लागली आहे. जमिनीतील पाण्याची पातळीही खूप खोल जाऊन पोहोचली. तापमानातील वाढी मुळे लोकांचा कल हवा थंड करणाऱ्या उपकरणाच्या वापराकडे वळला. ही उपकरणे वातावरणात स्वतःची गर्मी सोडत असल्या मुळे वातावरण अजून गरम व्हायला लागले. तसेच लोकसंख्या वाढी मुळे वाहनांची संख्या वाढली. त्या मुळे वातावरण अजूनच गरम होत आहे. आणि वायूचे प्रदूषण जास्त प्रमाणात व्हायला लागले . या सर्व परिणामांमुळे निसर्गाचा असमतोल निर्माण झाला आणी पाण्याची भीषण कमतरता होऊ लागली.

पाणी समस्येचे तिसरे प्रमुख कारण म्हणजे लोकसंख्येची वाढ. जगात लोकसंख्या झपाट्याने वाढत असून गाव आणि शहरांच्या सीमा झपाट्याने वाढत चालल्या आहेत, शेती, जंगल आणि वृक्ष कमी होत आहेत. सिमेंट कॉंक्रिट ची घरे, रस्ते मोठ्या प्रमाणात बांधली जात आहेत ज्यामुळे भूतलावरील तापमानात अजून भर पडत आहे. लोकांना रोजगाराच्या संधी प्राप्त व्हाव्या यासाठी कारखाने आणी उद्योग मोठ्या प्रमाणात वाढत आहेत. तिथे पाण्याचा वापर वाढलेला आहे. कारखान्यात लागणाऱ्या सयंत्रांमधून निघणाऱ्या धूर, विषारी गॅसेस, सांडपाणी या मुळे परिसरातील हवा, पाणी आणि जमीन प्रभावित होत आहे, प्रदूषित होत. सभोवतालचे तापमान वाढत आहे . या सर्व कारणांमुळे निसर्गाचा असमतोल निर्माण झालेला आहे आणि त्यामुळे पावसाचे प्रमाण कमी झाले , आणि दुष्काळाचे सावट अधिक गंभीर रूप धारण करायला लागले, विहारी, नद्या, नाले, तळे आटायला लागलेत. उन्हाळ्यात तर सगळे पाण्याचे स्रोत ठण ठण व्हायला लागलेत. जमिनीतील पाण्याची पातळी अती खोलात जाऊन पोहोचली आहे. लोकसंख्या वाढी मुळे पाण्याची गरज वाढली आहे. घरोघरी विहिरी, बोअर झालेत आणि जमिनीतील पाण्याचा उपसा वाढला. त्या मुळे जमिनीतील पाण्याची पातळी जास्तच खोल गेली. आणि सर्व सृष्टी वरील जीव, जंतू, प्राणी, वृक्ष यांना पाण्याच्या भीषण समस्येला तोंड द्यावे लागत आहे.

गावात शहरात आपण बघतोच आहोत पाण्याची किती भीषण समस्या आहे. नद्या नाले विहिरी सुकून गेलेत. जमीन कितीही खोदली तरी पाण्याचा एक थेम्ब सुद्धा हाती लागत नाही. मनुष्य प्राण्यांचे स्थलांतरण होत आहे. निसर्गाच्या असमतोलपणामुळे पाऊस पाडण्याचे प्रमाण काम झाले . उन्हाळ्याचा काळ खंड वाढला आणि पाऊस थंडी चा कमी झाला. हिवाळा पावसाळा पण उन्हळ्यासारखाच भासायला लागला. पावसाळ्यात कुठे पाऊस बिल्कुल पडत नाही आणि कुठे पडलाच तर अतिवृष्टी होऊन पुराचे थैमान बघायला मिळते. गर्मी जास्त आणि पाऊस कमी या अश्या निसर्गाच्या असमतोलपणा मुळे माणसाचे जीवन फारच कठीण होऊन गेलेले आहे. शेती व्यवसाय संपूर्णतः पावसाच्या पाण्यावर अवलंबून असल्या मुळे शेतामध्ये धान्याचे उत्पादन कमी झालेले आहे. शेतकरी हलाखीचे जीवन जगण्यास बाध्य झाला आहे. अन्न धान्याच्या किमती शिगेला जाऊन पोहोचल्या. भाज्यांच्या किमती नियंत्रणाच्या बाहेर गेल्या. माणसाचे जीवन अगदी खडतर झाले. याचा परिणाम संपूर्ण मनुष्य जातीला भोगावा लागत आहे.

निसर्गाचे चक्र जर असेच सुरु राहिले तर हळू हळू माणूस, प्राणी, पशु , पक्षी यातील काहीच या भूतलावर उरणार नाही अशी परिस्थिती निर्माण होत आहे. म्हणूनच म्हणतात पुढचे महायुद्ध जे होईल ते पाण्यासाठी लढले जाईल आणि ते भाकीत खरे होईल असे वाटते.

या पाणी समस्यांवर वेळीच उपाय योजना करण्याची फार मोठी गरज निर्माण झालेली आहे. सरकार आपल्या परीने यावर उपाय करण्याचे प्रयत्न करीत आहेच. पण त्याला आधार म्हणून प्रत्येकाने आपला वाटा उचलण्याची गरज आहे. यासाठी नद्यांची जोडणी, पर्यावरणावर नियंत्रण , वृक्षारोपण, जंगलांचे सवंर्धन, धरण बंधारे यांचे बांधकाम, वाहून जाणाऱ्या पावसाच्या पाण्याचे जमिनीत पुनर्भरण, पाण्याचे नियोजन, पाण्याचा आवश्यक तेवढाच वापर , वाहनांचा कमीत कमी वापर, उद्योग कारखाने यात सोलर ऊर्जेचा वापर इत्यादी अनेक उपक्रम हाती घेण्याची फार मोठी गरज निर्माण झाली आहे.

आंम्ही आजच या समस्ये विषयी सतर्क होऊन पुढची वाटचाल केली तरच या पृथ्वीतलावरील जीव सृष्टीचे संरक्षण शक्य आहे नाही तर आमच्या येणाऱ्या पिढीला जगण्याची फार मोठी चिंता आम्ही देऊन जाणार आहोत. तेव्हा वेळीच सावध होऊन निसर्ग, पाऊस आणि पाणी यांचे यांचे समायोजन, संवर्धन करण्याची गरज आहे.

संजय रोंघे

मोबा- 8380074730

” आई बाप “

आई बाप आपल संपुर्ण आयुष्य आपल्या मुलांसाठी लावतात ।
त्यांची खुशी, शिक्षण हव नको ते सार सार अगदी खुशीन करतात ।
आणी जेव्हा त्यांना त्यांच्या म्हातारपणी मुलांची गरज भासते तेव्हा
मात्र मुल पाठ फिरवतात । आणी व्रुद्धाश्रमात पाठवुन मोकळे होतात ।
कींवा घरात खुप दुःख देतात । नोकरांपेक्षाही वाइट वागणुक देतात ।
का आम्ही आमची कर्तव्य विसरलोत की आमचे संस्कार संस्क़्रुती
विक्रुत होत आहेत ।

हे कुठेतरी थांबायला हवं ।

आम्हीच आमचा विचार करायला हवा ।

sanjay R.

पर्यावरण आणी आम्ही

यथा राजा तथा प्रजा

थोडे औद्योगीक क्रुतींकडे
लक्ष टाकले तर पर्यावरणाचा
नाश करण्यात त्यांचा वाटा
सगळ्यात मोठा आहे ।
कारखाने दिवस रात्र वर्षो …
न गणती पर्यावरणाशी खेळत
आहेत । त्यांच्यावर कोणाचेच
नियंत्रण नाही । कायदे आहेत
पण पैशापुढे लोळण घेतात ।
यथा राजा तथा प्रजा ।
आमचे सरकारही काही करु
इच्छीत नाही । युरोप
अमेरीकेत पर्यावरणाचे कायदे
फार कडक आहेत । म्हणुन
तिकडचे प्रोसेसींग युनीट्स भारतात
आणी इतर आशियन
देशात स्थलांतरीत होत आहेत ।
आणी आम्ही आपल्या हाताने
आपले पर्यावरण खराब करुन
घेत आहोत । या बाबींकडे
आम्ही आणी आमच्या
सरकारने लक्ष द्यायला हवे ।
राष्ट्राचा विकास साधताना
पर्यावरणाचा बळी जाता
कामा नये । नाहितर सगळे
संपल्यावर रडायलाही कोणी
उरणार नाही ।
sanjay R.