जीव रंगला तुझ्यात

व्याप किती कामाचा


कसा रंगेल जीव ।
बघूनच माझ्याकडे
येईल कुणासही कीव ।

खोटे कशास बोलू
जीव रंगला तुझ्यात ।
वेळ पडतो अपुरा
दिसेल तुज माझ्यात ।

तुझ्या आणि माझ्यात
भाव भावनांचा खेळ ।
सांगेल तुज मी सारे
मिळू दे थोडा वेळ ।
Sanjay R.

आदर्श

कळेचना आता मज
कोण इथे हो आदर्श ।
पहिले बरेच मी जेव्हा
त्यांनाही नको स्पर्श ।
मनातल्या मनात सारे
करतात व्यक्त ते हर्ष ।
निराशेच्या खाईत सारे
पण होतात उगाच दर्श ।
त्राण न उरले आता
करू कसा मी संघर्ष ।
Sanjay R.

एकांत

धरू नको तू एकांत
हवीच कशाला खंत ।
उघडुन डोळे बघ जरा
जग किती हे अनंत ।

वाऱ्या विना सारे इथे
वाटते किती संथ ।
आभास होतो मनात
कण कण इथला शांत ।

काळ कुठे थांबतो
तोही करतो अकांत ।
फेर जीवनाचा हा
शेवटाला होतो अंत ।
Sanjay R.

अनंत यात्रा

होऊ नको उदास
सारेच इथे भास ।
बदलेल विश्व सारे
पुरे एकच श्वास ।

पाहू नको वळून
मागे सरला विनाश ।
क्षितिज नाही दूर
सोडू नको तू ध्यास ।

जरी वाट ही कठीण
हवेत निरंतर प्रयास ।
अनंताची ही यात्रा
आहेच मुळी खास ।
Sanjay R.

आनंद

तुझ्याच शब्दांनी
घर केले मनात ।


तळमळला प्राण
आले अश्रू क्षणात ।


सोड दुःख तू आता
बघ जरासे अंतरात ।


तिथला कोपरा खाली
भर आनंद तयात ।
Sanjay R.

शब्द कुंपण

घातले इथे सभोवती
शब्द कुंपण मी जरा ।
बंदिस्त झालेत शब्द

काय शब्दांची ती तऱ्हा ।


अर्थाचे होती अनर्थ
उलटा शब्दांचा फेरा ।
सूर लागेना कशास
वाटतो अवघड घेरा ।

शब्दात कधी गोडावा
खुलवे आनंद सारा ।
मोडून मन जाते जेव्हा
बरसे अश्रू होऊन धारा ।

शब्दांचे बाण शब्दात
धरतो होऊन मी वारा ।
शब्द शब्द पुटपुटतो
त्यात शब्दांचा पसारा ।

सामर्थ्य या शब्दांचे
देती शब्दच इशारा ।
शब्दात गवसतो शब्द
वाटे चमकला सितारा ।
Sanjay R.

धाव

कशास चालली रे
तुझी ही धावाधाव ।
बाजारच तर फसला
कुठे कशाचा भाव ।

आनंदाने झेल आता
सारेच तू घाव ।
आठवणार नाही कधी
तुझे तुलाच नाव ।

लुटाया बसलेत इथे
झालेत कसे साव ।
जमणार नाही तुला
मोडणे त्यांचा डाव

अश्रूंची काय किंमत
आहे ना तुला ठाव ।
उठ आता तू जरासा
जोर जरासा लाव ।
Sanjay R.

अहंकार

कशाचा तुला
अहंकार आता ।
सोबत काही
येईल का नेता ।

गरीब कोणी
श्रीमंत दाता ।
नेले कुणी रे
जाता जाता ।

भाव मनात
नको रे कोता ।
देवांचा देव तर
माता नी पिता ।

झालेत म्हातारे
तेही तर आता ।
देऊ नको दुःख
जाता जाता ।
Sanjay R.

नको बघू वळून

नको बघू तू वळून
सारेच आले कळून ।
जीवनाच्या या वाटेवर
सारे राख झाले जाळून ।

मागे बंद दरवाजा
निघतो मीही होरपळून ।
पुढेही बंद वाटा साऱ्या
जाणार कुठे पळून ।

जीवात नाही जीव
श्वासही गेलेत गळून ।
वयानेही सोडली साथ
शेवटी जायचेच ढळून।

अजूनही मनात आशा
वाटत हसावं खळखळून ।
पुन्हा येकदा बघावं
मागे परत तिथेच वळून ।
Sanjay R.

सुगंध मोगऱ्याचा

सुगंध मोगऱ्याचा
मन हरवून गेला ।
आठवणी अंतरात
त्या जागवून गेला ।

मन लागेना कशात
नजर आता वाटेवर ।
रोखून श्वास मीही
शोधतो तुला दूरवर ।

अंगणात झुलतो वारा
थांबेना तो क्षणभर ।
थांबवू कसे मी आता
मनही झाले भिर भिर ।
Sanjay R.

आस

नाही आस कशाची
व्यथा ही मनाची ।
घास चार हवेत
भूक ही पोटाची ।

पोटाला तर हवी
कोर भर भाकरी ।
पण नशीबच खोटे
फिरतो दारोदारी ।

जगतो माझा मीच
काय नेईल मी हाती ।
स्वार्थी किती मन
शेवटी उरेल ना माती ।
Sanjay R.

वाटसरु

एकटाच होतो चालत
विराण त्या रस्त्यावर ।
नव्हते मागे पुढे कोणी
रस्ताच उठला जीवावर ।

झाडं झुडपं पशु पक्षी
गेलेत कुठे नव्हते माहीत ।
मात्र सूर्य होता डोक्यावर
अंग अंग माझे जळीत ।

वाटले रक्त गेले सुकून
पडली कोरड घशाला ।
वाटे मृगजळ पुढेच आहे
धावलो मीच कशाला ।

रस्ता सरता सरत नव्हता
धाप लागली श्वासाला ।
धडपडलो थोडा अडखळलो
लागलो शेवटी मार्गाला ।
Sanjay R.

आयुष्याची नाव

आयुष्य ऐक नाव
आभास तिचा संथ ।
कळतच नाही कधी
नी त्यातच होतो अंत ।

प्रवासात जीवनाच्या
झेलायचे कईक वार ।
आधार कधी प्रहार
सोसत व्हायचे पार ।

आजचे नसेल उद्या
निसर्गाचा सारा प्रकार ।
बीज रुजते इथेच
आणि घेते नवा आकार ।
Sanjay R.

कृष्ण आणि राधा

दे मजसी तू साद
येते मला पण याद ।
सोड हा रुसवा तुझा
लागला तुझाच नाद ।

मनात किती आभास
नजरेतही आहे ध्यास ।
अंतरात चालले वेध
प्रतीक्षेत मी घेतो श्वास ।

बांधून बंध प्रीतीचा
का केलास तू वादा ।
विसरणे झाले अशक्य
मी कृष्ण नी तू राधा ।
Sanjay R.