सकाळ

अशी कशी ही झाली सकाळ
सूर्य दिसेना वरती आभाळ ।
गार वारा झुलतो कसा
जणू वादळाचं ते छोटं बाळ ।
Sanjay R.

ढगांची गर्दी

अजूनही बघतो मी आकाश
काळया ढगांनी तिथे गर्दी केली

तिरीप सूर्याची होती तिथे
कुणास ठाव ती कोणी नेली ।

आगिसम तापणारा तो सूर्य
शोधतो गर्मी त्याची कुठे गेली ।

गार होऊन तो पहुडला असेल
धराही सोबत कशी शांत झाली ।

रात्रीच पडून गेले चार टपोरे थेंब
गंध मातीचा सांगतो तीही ओली ।
Sanjay R.

झाली कशी दशा

दिशा न उरली आता
झाली कशी दशा ।
जो तो पाळतो फक्त
आहे पैशाची नशा ।

बोलताना शब्द कसे
असे उर्मट ती भाषा ।
शांत वाटतो अजूनही
गरीब तो वेडापिशा ।

सोडली नाही कुणीच
मनातली ती आशा ।
सांज ढळते दिवस सरतो
घेतो करून हशा ।
Sanjay R.

आजीचा बटवा

आजीच्या बटव्यात
कथा असे रोमांचक ।
ऐकतानाच घाम फुटे
वाटे भीती अचानक ।
कधी यायचा राक्षस
छातीत होई धकधक ।
परी येऊन निजवायची
थांबायची मग ठकठक ।
Sanjay R.

आजी

दिसते सुंदर आजही
झाली कुठे म्हातारी ।
गुणगुणते ती गाणे
बसून माझ्या शेजारी ।

गंमत इतकी करते नी
जोक्सही तिचे भारी ।
करमत नाही मुळीच
नसते जेव्हा स्वारी ।

मजाच येत नाही मुळी
नसते जेव्हा ती घरी ।
हवी हवीच वाटते
डोकावते मी दारी ।

हसते खेळते सोबत
खात नाही सुपारी ।
म्हणू कसे मी आजी
वाजवेल ना तुतारी ।
Sanjay R.

अबोला

नको वाटतो आता
धरला तू अबोला ।
शब्द गुंजतात कानी
जीव वेडा हा झाला ।

दूर बघतो आकाश
त्यात ढगांचा गलबला ।
क्षणिक होतो प्रकाश
सांगू काय त्या विजेला ।

आधार वाटतो भुईचा
जोरात हलत्या झाडाला ।
उन्मळून कोसळतो जेव्हा
दोष देऊ कसा वाऱ्याला ।
Sanjay R.

शोध

जिथे तिथे मी थोर शोधतो
कोण कुठला चोर शोधतो ।

नाही इथला सारे परके
काल होता तो पोर शोधतो ।

निसटून जातो वारंवार तो
बांधून ठेवण्या दोर शोधतो ।

ताकद त्याची भरी भरकम
हवा तितका मी जोर शोधतो ।

कठीण आहे ते सारे कळले
थोर सोडून मी ढोर शोधतो ।
Sanjay R.

भुकेला कुठली भाषा

मनात एक स्वप्न
आणि उदरात आशा ।
सरतो दिवस जेव्हा
पसरते तीच निराशा ।

काहूर माजते पोटात
भयाण वाटते निशा ।
फिरून कड निजतो
नेत्रांना कळेना दिशा ।

सरते ती रात्र काळी
नवी उजाडते उषा ।
परत तीच परिक्रमा
भुकेला कुठली भाषा ।
Sanjay R.

वादळ

कधी मनात
भरती आनंदाची ।
होते अनुभूती
सर्वस्वी सुखाची ।

कधी येते वादळ
अतीव दुःखाचे ।
ओहोटी ती असे
काहीच क्षणाची ।

नको मानू तू हार
अवस्था घडिभराची ।
सुख दुःख येती जाती
वाट हीच जीवनाची ।
Sanjay R.

तू

खळी तुझ्या गालावर
कळी तुझ्या ओठावर ।
डोळ्यात बघतो जेव्हा
लागते नजर तुझ्यावर ।
असते तू मात्र अनभिज्ञ
हसतो मीच माझ्यावर ।
सहजच सुचतात ओळी
होते कविता तुझ्यावर ।
शब्दांना नसतात बंध
खुलतात तुझ्या असण्यावर ।
दाद तुझी हवी असते
पण सुखावतो मी माझ्यावर ।
Sanjay R.

शाप

कावळ्याच्या शापान
कठे कोण मारत ।
मन मात्र मनातच
खुप खुप झुरत ।
काळजी आणि भीती
त्यातच सार हरत ।
कळत नाही मग
आयुष्य ही सरत ।
Sanjay R.

प्रेमाचा वेध

प्रेमाचा वेध
नी मनात आस ।
क्षणो क्षणी कसे
होतात आभास ।
अंतरात धडधड
वाढतात श्वास ।
एकच पुढे लक्ष
त्यासाठी प्रयास ।
सारेच इथे व्यर्थ
मनात एक ध्यास ।
तुझ्याविना वाटे
नाहीच काही खास ।
Sanjay R.

प्रेम एक कथा

प्रेम एक कथा
की निव्वळ व्यथा ।
पण मात्र मला वाटते
होईल त्याची गाथा ।
म्हणा कोणी काहीही
आहे ही जुनीच प्रथा ।
नविण्याने सजते ती
फक्त वेळ जाता जाता ।
दोन बंध या मनाचे
जुळती ऐक होता ।
नाही विचार कशाचा
होतो संपूर्ण रीता ।
भगवंताची लीला न्यारी
ही पण एक गीता ।
ताटातूट होते जेव्हा
आठवते अजूनही सीता ।
राधा आणि तिचा कान्हा
संपूर्ण प्रेमाची संहिता ।
Sanjay R.

व्यथा

विचारांचे वादळ
डोक्याला किती भार
घोंगवणारे वारे
होती बुध्दी वर स्वार ।
सारेच होते मग
अगदी तार तार ।
शोधतो कुणाचा मग
मिळतो का तो आधार ।
निघतोच कुठे त्यातून
दूर किती असतो पार ।
बोथट झालेली असते
मनातली संशयी धार ।

मीही स्वीकार करतो
स्वतःची स्वतःचीच हार ।
Sanjay R.

पहाट

अंधार बघतो वाट
होईल कधी पहाट ।
चिव चिव चिमण्यांची
काय पहाटेचा थाट ।
रात्रीचा सरेल काळोख
घडेल सूर्याशी गाठ ।
येईल बहरून मोगरा
भरेल सुगंध काठो काठ ।
निपचित होती पडून
जाईल भरून ही वाट ।
दुर मंदिरातला नाद
नी वारा मोकळा सैराट ।
Sanjay R.

वादळ

अकाळी सुटला वारा
मनात वादळ मोठं ।
डोळ्यातून वाहे धारा
पावसाचं रूप खोटं ।

अंतरातल्या वेदना या
स्वप्न त्यात होतं छोटं ।
भाकरीची एक कोर
भरेल का उद्या पोट ।

नाही उरले वरती छत
दाबून ठेवी हुंदका ओठ ।
पाणी पाणी झाले सारे
घरातूनच वाहे लोट ।
Sanjay R.

आल्या रंगात गप्पा

आल्या रंगात गप्पा
दोस्त जिगरी भेटला ।
इलेक्शनचे वारे सारे
रंग पाहून तो पेटला ।

तू तू मी मी झाली खूप
मुद्दा त्यानेही खूप रेटला ।
वादावादात सरले सारे
कोण मी नी तू कुठला ।

नका तोडू हे नाते असे
विचार कधी कुणा पटला ।
विसरून सारे एक व्हारे
मित्रासाठीच गळा दाटला ।
Sanjay R.

पाणी

हरलेत आता वारे थंड
पुकारले सुर्यानेच बंड ।
निघतो कोण बाहेर आता
दुपार होता उन्हाचा दंड ।

थेंब थेंब पाणीही सरले
नदी नाले पालथे पडले ।
रानही आता उजाड झाले
विपरीत सारे कसे घडले ।

व्याकुळ सारे पाण्यासाठी
शोधती पाणी विहिरी काठी ।
दगड धोंडे तेही हरले
कपाळावर पडली आठी ।
Sanjay R.

हवी श्वासात

स्वप्नांना लावूनी पंख
चल जाऊ गगनात ।
सूर्य गेला आडोश्याला
थोडे हसू चांदण्यात ।

असू दे रात्र ही काळी
काजवेही चमचमतात ।
दरवळ रात राणीचा नी
पारिजात फुलतो मनात ।

कशी बेधुंद ही हवा
जाते सांगून कानात ।
तुझ्या विना नको काही
हवी तू मज श्वासात ।
Sanjay R.