” बैल “

कशाला करतो रे
कष्ट तू राजा ।
धावपळ सारी
नशिबात रे तुझ्या ।
बैल म्हणतात तो
हाच का रे आज्या ।
नाही मर्यादा
कामाला रे तुझ्या ।
सदाच जुतलेला
बैला तू माझ्या ।
सण तुझा पोळा
कर आराम गज्या ।
बैल म्हणून जग
हीच तुझी सज्या ।
Sanjay R.

” सण आज पोळा “

सण बैलांचा पोळा
वर्षातून एकच वेळा ।
बसता तुतारीचा ढोस
होते कशी पळा पळा ।
नाकात वेसण त्याच्या
बसतो मानेला पिळा ।
पोळ्याच्या दिवशी मात्र
लावती सारेच टिळा ।
कष्ट जन्मभर वाट्याला
राबून पिकवतो मळा ।
इमान धन्याशी राखतो
सण त्यासाठी हा पोळा ।
Sanjay R.

” खेळ भावनांचा “

भावनांचा खेळ हा सारा
आकाशात कुठे एकच तारा ।

कधी वाहतो सोसाट्याचा वारा
तर कधी बरसतात धारा ।

भिजायचं होऊन स्वच्छंदी
वेचायच्या आनंदात गारा ।
Sanjay R.

” वृद्धाश्रमच्या वाटेवर “

ठाऊक कुणास आता
माणसाचे माणसाशी नाते ।
कुणी येतो जन्माला
कुणाची यात्रा बघा दूर जाते ।

भावनांची कदर कुठे
जगायचे म्हणून जगतो आता ।
देवही नसतो सोबतीला
विसरतो कसा रे माता पिता ।

बाळपणी तू होता निरागस
आता किति रे मोठा झालास ।
थांबव थोडे दिवसांना बघ
नको बोलवू म्हातारपणास ।
Sanjay R.

” मोगरा अंगणात फुलला “

ढगांनी वेढलं आकाश
सूर्याचा नाईलाज झाला ।
प्रकाशानं काढला मार्ग
दिवस उजेडून आला ।

पक्षांनी केली किलबिल
काळोखावर आघात झाला ।
मंद हवेची झुळूक घेऊन
झोके देण्या वारा आला ।

मंद धुंद सुगंध घेऊन
मोगरा अंगणात फुलला ।
दवबिंदूंच्या थेंबासंगे
काट्यातला गुलाब बहरला ।
Sanjay R.

” कष्ट “

आयुष्यभर माणसाला
करावे लागतात किती कष्ट ।
मागेच लागून असते
भूक पोटाची किती ती दुष्ट ।

टीचभरच ना हे पोट
भूक बघा ही त्याची किती ।
तरी इच्छेचा महासागर तो
नेहमीच असते ना ती रीती ।

आयुष्यभर करून कष्ट
होते शरीराची किती क्षती ।
लाभते म्हातारपण मग
आणी सोसवत नाही गती ।
Sanjay R.

” नशिबाचा खेळ सारा “

नशिबाचा खेळ सारा
येईल कधी कुठून वारा ।
काळ्या रात्री अंधारात
उजळेल मृत एक तारा ।
जगभर होईल कीर्ती
लखलख परिसर सारा ।
निरभ्र आकाशातून मग
बरसती कौतुकाच्या धारा ।
Sanjay R.

” भावनांची गाथा “

बघतो मी डोळ्यात जेव्हा
जाणतो अंतरातली व्यथा ।
ओठ होतात मग निशब्द
वाचतो भावनांची गाथा ।

बोल शब्दांचे तुझ्या अनमोल
घेतो टिपून हृदयात मी खोल ।
आठवणींची जेव्हा होते उकल
घेऊन आधार सांभाळतो मी तोल ।
Sanjay R.

” अपराध घोर “

हाती ज्याच्या दोर
लावतो तो जोर ।

होतो मग चोर
अपराध कुठे घोर ।

घेतो मिरवून आणि
होतो मोठा थोर ।

गरिबास हवी असते
भाकरीची एक कोर ।

पोटासाठी होता चूक
पडतात उघडी पोरं ।
Sanjay R.

” कळी उमलली “

अंगणात माझ्या
एक कळी उमलली ।
हसून सांगते कानात
मुद्दामच आज फुलली ।
विसरू नको रे तू
जरा बघ कशी खुलली ।
जीवनात तुझ्या सांग
स्थान तिचे अनमोल ।
अंतरात डोकावून बघ
तरंग आठवणींचे खोल ।
Sanjay R.

” जगण्याला कुठले कारण “

जगण्यासाठी कुठे
असते कुठले कारण ।
रोजच तर जगतो
येईल कसे मरण ।
दुःखात शोधत आनंद
बांधू सुखाचे तोरण ।
मार्ग सत्याचा धरुनी
पुढे जायचे धोरण ।
बहू अडचणी जीवनात
करायचे पार चरण ।
सिद्धी कार्याची होता
येईल सुखाचे मरण ।
Sanjay R.

” पाणी पाणी झाली धरती “

पावसाच्या वाटेवर
होती नजर वरती ।
आला उशिरा किती
पाणी पाणी झाली धरती ।

घरदार बुडाले पाण्यात
वाहून गेली स्वप्न सारी ।
दिवस मोजता मोजता
जीवनच झाले भारी ।

नाही आडोशाला छत
पावसाने केली गत ।
कसा दिवस कशी रात
उरले पाणी ओंजळीत ।
Sanjay R.

” नाही आशा खोटी “

अजूनही आहे
मनात माझ्या आशा ।
कोण म्हणतय
येताहेत ज्या लाटा
साऱ्याच निराशा ।

भरती नंतर असते
सागरात ओहोटी ।
हवा थोडा सय्यम
नाही आशा खोटी ।

सुर्यास्ता नंतर जरी
होते काळी रात्र ।
सुर्योदया नंतर
सूर्याचे एक छत्र ।

जीवन हाही आहे
एक अथांग सागर ।
सुख दुःखाच्या लाटांतून
भरायची आपली घागर ।

संपणार नाही ही वाट
पुढे अजून जायचे ।
जगता जगता अलगद
आनंद त्यातले वेचायचे ।
Sanjay R.

” नजर दूर वाटेवर “

फडफड तनात होते
तडफड मनात होते ।

काळजास चाहूल होता
धडधड उरात होते ।

नजर दूर वाटेवर
मनही आतुर होते ।

क्षण अधीर होता
डोळ्यात पूर येते ।
Sanjay R.

” माझी कविता “

मनात माझ्या तू
सांगू कसे तुला ।
छळतेस किती कशी
स्वप्नात तू मला ।

आहेस तू कविता
शब्दांची तू सरिता ।
आहेस तूच मनात
म्हणून
फुलते ही कविता ।

श्रावणातली सर तू
क्षणात दूर जाते ।
परी अंतरात माझ्या
आठवण तुझीच राहते ।

भिजून चिंब धरा ही
हिरवे गीत गाते ।
पूर आठवणींचा बघ हा
नेत्राच्या कडेतून वाहते ।
Sanjay R.

” हवा गुलाबाचा संग “

रूप आणि रंग
हवा गुलाबाचा संग ।
मन मोहरले माझे
गुलाबात मी दंग ।

काय कुणाचा छंद
होतो मोगराही धुंद ।
कळी गुलाबाची झुले
संगे वारा वाहे मंद ।

सलतो काटा मनात
राहूनही तो झाडात ।
करून मन मोकळे
जाते सल क्षणात ।
Sanjay R.