दिवस हे पावसाचे
आच्छादन आभाळाचे ।
साम्राज्य सावलीचे
नाही दर्शन सूर्याचे ।
रिमझिम नृत्य चाले
अंगणात पावसाचे ।
अंग अंग भिजले
लोट वाहे पाण्याचे ।
नदी नाले गेले भरून
थैमान तिथे पुराचे ।
जीवनाची झाली गती
ओघळ वाहे आसवांचे ।
Sanjay R.
Monthly Archives: August 2020
” कळी “
कळ्यांची झालीत फुले
कशी वाऱ्यासंगे डूले ।
दरवळ सुगंधाचा चाले
आणि मन मोहित झाले ।
Sanjay R.
” शेतकरी “
मी आहे शेतकरी
कर्माने मी कष्टकरी ।
राबतो मी दिवस रात्र
जीवन माझे हातावरी ।नेहमी नजर आकाशात
भीती असते अंतरात ।
निसर्गाचे चक्रच न्यारे
झेलतो सारेच मी आघात ।बांधावरती होऊन उभा
बघतो जेव्हा स्वप्न सुखाचे ।
मागून येऊन धडक मारते
जीवन माझे आहे दुःखाचे ।रक्ताचे मी करतो पाणी
लुटून नेतो दुसराच कोणी ।
भोग भोगतो शेतकर्यांचे
डोळ्यातही मग नसते पाणी ।
Sanjay R.
” स्वप्न मनातले “
प्रत्येकाचेच स्वप्न असते
नाव लौकीक मिळवणं ।
हळव्या असतात भावना
त्याही थोड्या जपणं ।
हवा असतो आनंद
मिळतो त्यात परमानंद ।
होतो कधी व्यक्त
शब्दात उतरवणे हाही छंद ।
रमतो स्वतःच्याच विश्वात
होतो त्यातच धुंद ।
बघून दुःख सारे
होऊन अश्रू गळतात बंध ।
Sanjay R.
” घेऊ नको श्वास “
बघ जरा तू माणसा
घेऊ नको श्वास ।
हवा फुकट जरी
त्यात कोरोनाचा भास ।
दूर थोडा तू रे राहा
नाही कोणाचा भरोसा ।
झाली बाधा तुला तर
होशील वेडा पिसा ।
दिवस किती अजून बाकी
नाही ठाऊक कुणास ।
जपूनच राहा तू रे जरा
येणार नाही कोणी मारणास ।
पैसा अडका दे सोडून
कमावले खूप तू जोडून ।
लुटू दे ते सारे आता
नाही फायदा रडून ।
पहा जगाचे झाले हाल
चीनचे फुलले गाल ।
जगण्याची रीत अशी
लढायचे घेऊन ढाल ।
Sanjay R.
” सारेच बाप्पा तुमच्या हाती “
आलेत आज बाप्पा
मिरवणूक कुठेच नव्हती ।
आनंद मनात तोच
उत्साह पण सभोवती ।
काय रे तू कोरोना
घातली मनात भीती ।
बाप्पा सोबत नेतील
सांग थांबशील तू किती ।
घे मिरवून तू दिवस दहा
करू नकोस कुणाची क्षती ।
हरवलेत सारे स्वप्न
बघ दुनियेची काय गती ।
करा बाप्पा तुम्हीच काही
सारेच आहे तुमच्या हाती ।
Sanjay R.
” दुःखाचे दुःख नाही “
दुःख हेच आहे
दुःखाचे दुःख नाही ।
पाहून दुःख माझे
सुखही दूरच राही ।
काळजाला काळजी
डोके चिंता वाही ।
शोधतो उत्तर जेव्हा
उरतात प्रश्न काही ।
उघडून बघतो जेव्हा
बघतात डोळे काही ।
कुजबुज होते थोडी
भिंतीला कान नाही ।
क्षण एक सुखाचा
दुःखाचा लवलेश नाही ।
हसत हसत जगायचे
आनंद कुठे कमी काही ।
Sanjay R.
” रिमझिम पाऊस “
” रिमझिम पाऊस ”
झडच लावली या पावसाने
झाला सगळीकडे चिखल ।
वर आभाळ गच्च भरलेले
त्यात नाही सूर्याची दखल ।
साचले पाणी जागोजागी
नाही जिथे जागा सखल ।
रस्ते झालेत ताल तलाव
गड्डे त्यात किती खोल ।
Sanjay R.
” कर ना वो भजे “
” कर ना वो भजे “झमझम झमझम
पाऊस पडून रायला
कर ना वो भजे
गया सुकून रायला ।एकच हाये गिलास
जमवतो त्याले पयला ।
बाबुराव येतोच मने
होईन मंग नैला दैला ।लय भिजलो पावसात
शर्ट न्हाई वायला ।
प्यांट त गच्च हाये वला
सुकून थोडा रायला ।बसल्या जागी इचार यते
पिकन का न्हाई च्यायला ।
कर्जाचा डोंगर डोईवर
फिटन कसा मायला ।जाऊ दे ना आता
इचार कहाले कराचा ।
चार चार भजे खाऊन
शिन सारा घालवाचा ।Sanjay R.
” हवा विरंगुळा “
धकाधकीच्या या जीवनात
हवा विरंगुळा काही क्षणाचा ।
येईल मन विसवून थोडे
आनंद किती या जीवनाचा ।
चाले सदा धावपळ किती
प्रश्न मोठा या पोटाचा ।
रक्ताचे होते पाणी आणि
पालथा डोंगर कष्टाचा ।
मैत्री नाते बंध किती हे
धागा कसा या जीवनाचा ।
अंत हे तर पूर्णच सत्य
विचार नकोच दुःखाचा ।
Sanjay R.
” मन अधीर झाले “
मन अधीर झाले
कशा कशात गेले ।
आकाश इतके विचार
फिरून नभात आले ।
गती किती या विचारांची
नाही विसावा मनाला ।
वाटे कधी मनात
आता सांगू मी कुणाला ।
भिरभिर पाहे डोळे
कान वेध तो घेती ।
मन भरले जरी तुडुंब
जागा अंतरात रीती ।
Sanjay R.
” नको जाऊस तू सोडून “
नको जाऊस तू सोडून
वारा आला आणि बघ
ढग गेले उडून ।
स्वच्छ झाले आकाश
क्षितिज बघ आहे पुढे
नाही काहीच दडून ।
घे पुसून डोळे जरा
हुंदकेही सावर जरा
सुकलेत आसवं रडून ।
अजूनही उभा वृक्ष
रोकून ते वादळ सारे
ये परत तू वळून ।
Sanjay R.
” नशीब फिराले वेळ नाही लागत “
बाबू घे ना हातात ईळा
पर लटकवू नको गळा ।
टाक ना कापून तन
पिकन जास्त मन दोन मन ।
येईन पैसा हातात त
लागण तुह्याचं कामात ।
पैशानच होते बापा सारं
दुःख गरीबच नाही बरं ।
लेकरायले नाही शाळा
चालते निस्ता खेळा ।
पडलं कोणी बिमार पोट्ट
औषध कुठी न डॉक्टर कुठी ।
मेहनतीवर तुयाच बापू
वाजते राजकारणात भोपु ।
नशीबच तुह गा फुटक
आयुष्यही झालं तुटक ।
कधी निसर्गाचा घात
धुते व्यापारी बी हात ।
पर हारू नको असा
दिवस तुह्या बी येईन तसा ।
सोडू नको गा मेहनत
नशीब फिराले येळ नाही लागत ।
Sanjay R.
” तू कोर चंद्राची “
तू कोर चंद्राची
राणी आहेस अंधाराची ।
टीम टीमती तारे
सभा आकाशाची ।
धराही फुलली
चमचम काजव्याची ।
ताल सूर जमला
मैफिल रातकिड्यांची ।
मधेच डोकावून जाती
आरास तिथे ढगांची ।
उठून सारे जाती
लागता चाहूल सूर्याची ।
Sanjay R.
” आहे मन मधुर “
मनच आहे ते
असंख्य विचारांचं घर ।
सोडलं मोकळं
पळतं दूर दूर ।
ठेवलं बंधून तर
होतं किती आतुर ।
गोधळत जेव्हा ते
लागत नाही सूर ।
सोडले धैर्य तर
होते चुर चुर ।
ठेवता अंकुश थोडा
येई आनंदाला पूर ।
जगायचे आनंदात
आहे मन मधुर ।
Sanjay R.
” नाते “
नात्यांचा तर झाला अंत
आहे ज्याला तो निवांतनसेल त्याच्या मनात खंत
भिर भिर पाही बसून शांतवाटे जणू तो मोठा महंत
नाते तुटले मनात आकांत
Sanjay R.