निरोप

जाणाऱ्याला देऊ निरोप
येणाऱ्याचे करू स्वागत ।
झाले किती गेले किती
हिशोब झाला जागत ।
नव्या दिशा नव्या आशा
चला करू पूर्ण मनोगत ।
मार्ग हा या जीवनाचा
बसू नका हो बघत ।
चला पुढे जाऊ चला
नववर्षाचे करू स्वागत ।
Sanjay R.

काट्याने निघतो काटा

काट्याने निघतो काटा
चालल्याने मिळे वाटा ।
नसेल द्यायचे उत्तर तर
विषयालाच द्यायचा फाटा ।
असेल जर मनात तर
दुकान तिथेच थाटा ।
विचार नका करु हो
नफा हो नाही तर तोटा ।
Sanjay R.

मुक्ती

कुणाला काय वाटते
अर्थ काय त्याला
प्रयत्नांना दिसेना दिशा
सांगू मी कुणाला ।
समजवता मीच आता
माझ्याच या मनाला ।
दाखवून द्यायचे एकदा
सम्पूर्ण या जगाला ।
मार्ग हवा जो जाई तिथे
सांगा मुक्ती हवी मला ।
Sanjay R.

जमेल म्हणता म्हणता

नेहमीच असतो
प्रश्न एक डोक्यात ।
मन मात्र असते
आपल्याच हेक्यात ।

जमेल म्हणता म्हणता
येतो मीच धोक्यात ।
शिरत नाही काही
रिकाम्या खोक्यात ।

होकार की नकार
दोन्हीही एकात ।
क्षणातच कसे ते
विचारच फिरतात ।
Sanjay R.

सुखी जीवन

शोधू नका आनंद
अंतरात तो लपलेला ।
कशात मिळतो तो
हवा थोडा शोधायला ।
छंदच असेल तो
सखा तो मन रमायला ।
आनंदा वीणा हवे काय
सुखी जीवन जगायला ।
Sanjay R.

सुगंध

कवितेचा छंद माझा
खुले मनातला बंध ।
शब्दांना देऊनी साज
फुलवतो त्यातून गंध ।
बघून दरवळ त्याचा
होतो मीही मग धुंद ।
प्रेम येते किती फुलून
काय त्याचा सुगंध ।
Sanjay R.

दुःखाच्या वाटेवर

दुःखाच्या वाटेवर ही
असतो थोडा आनंद ।
द्यायचा वेळ थोडा
पूर्ण करायचा छंद ।
डुंबून जायचे तयात
होऊनि सर्वस्वी धुंद ।
मन येते मग बाहेरून
दरवळतो कसा सुगंध ।
सारेच कसे येते जुळुनी
आणि तुटतात सारे बंध ।
Sanjay R.

छंद

छंद कुणाला कशाचा
तोची आनंद घ्यायचा ।
प्रफुल्लित होते मन
क्षण दुःख विसरायचा ।
लागे जीवाला आस
ध्यास काही करायचा ।
अभिमान वाटे मनास
मार्ग निघता सुखाचा ।
वेळ द्यायचा थोडासा
अर्थ लाभे जीवनाचा ।
Sanjay R.

मात

संसाराचा खेळ हा
जिंकणे कुठे यात ।
जीवनभर चाले खेळ
मिळे साऱ्यांची साथ ।
कधी हार कधी जित
त्यावरही करू मात ।
Sanjay R.

संवाद

गुन्ह्यासाठी माफी कशाला
शरणागतास शिक्षा कशाला ।
लावून पताका मग संवादाची
निघणार मार्ग  दुःख कशाला ।
Sanjay R.

संवादातून सारेच जुळते

वाद करुनि भले कुणाचे
वादापोटी येतो प्रकोप ।
नाट्यमधले धागे तुटती
मधुरतेचा तर होतो लोप ।

बोल कुणाचे असता गोड
विश्वासाची तयास जोड ।
कोण कुणाच्या होईल दूर
बंधनाची त्या नसेल तोड ।

संवादातून सारेच जुळते ।
प्रेमा मध्येच सारे मिळते ।
दुराव्याचा नाहीच उपाय
दुःखात मग मनही जळते ।
Sanjay R.

चंद्र सूर्य

पडतात किती स्वप्न
काय काय मी बघतो ।
जे जे मनात माझ्या
सारेच मी जगून घेतो ।
आभासी ती दुनिया
रडतो कधी मी हसतो ।
वास्तवात कुठे काय
चंद्रा वर जाऊन बसतो ।
अंतराळाची घडते यात्रा
मग सूर्यही मनात वसतो ।
Sanjay R.

मनीष की मनीषा

मनीष, साधा सरळ. एकांतात रमणारा, निसर्गाच्या दुनियेत, पाना फुलांमध्ये आनंद शोधणारा.

अगदी लहान पनापासून तो असाच आहे. कधीच स्वतःहून कुणाशी बोलत नसे. कुणी बोललं तर दुसऱ्यास कधी दुखावत नसे.

आवाज ही त्याचा गोड मधुर. पाहायला कुणीही खूपच सुंदर म्हणावं असा.

लहान असताना तर, सारेच त्याच्या आईस म्हणायचे…
 
“अग तारे चुकून हा मुलगा झाला असेल गं, बघ जरा मुलगीच असेल, विचार जरा डॉक्टरांना”.

” इतकी सुंदर तर मुलगीच असायला हवी होती “. 

मग तारालाही वाटायचं ही मुलगीच असती तर किती छान झालं असत.

तिलाही मुलीचीच आवड होती.

मग ती मनिषला मुलींचीच कपडे घालून छान पावडर गंध लावून छोटीशी वेणी घालून तयार करायची.

मनीष त्या वेशात खूपच सुंदर दिसायचा. कुणीही त्याला उचलून घ्यायचे. खूप लाड करायचे.

मनीष मात्र अगदी लहान असताना पासून मग गोंधळून जायचा. त्याला काय करावे काय बोलावे काहीच सुचत नसे. तो शांत राहून फक्त बघत बसायचा .

होता होता मनीष मोठा होत होता. पण आता तो मुलांना टाळू लागला होता. त्यांच्यापासून दुर दूर राहायचा.

त्याला स्वतःतच रमायला आवडायचे. तो आपल्याच विश्वात जास्त आनंदी असायचा. कुणी काही बोललं की गोंधळून जायचा. काय बोलावे. काय उत्तर द्यावे काहीच सुचत नसे.

आता मनीष सोळा सतरा वर्षाचा झाला होता. पण सदा त्याच्या मनात एक वेगळी घालमेल सुरू असायची.

त्याला मुलींच्या कपड्याबद्दल आकर्षण वाटायचे. आपणही तसे कपडे घालून मिरवावे, केसांची छान वेगवेगळी हेअर स्टाईल करून घेऊन मस्त पैकी मानेला झटका देऊन केस मागे सारावे, चेहऱ्यावर मस्त पावडर, क्रीम लावून, कपाळावर बिंदी लावून, ओठांना छान रंगीत गुलाबी लीप स्टिक लावावी. मस्त नटावे अशी इच्छा त्याला नेहमीच वाटायची.

पण कधी तसे करून बघितलेच आणि आई ला ते कळले तर मात्र ती मनीष वर खूप ओरडायची रागवायची. त्यासाठी त्याने आईचा खूपदा मारही खाल्ला होता.

पण त्याला काहीच कळत नव्हते. त्याला ही अशी इच्छा का होते.

एक दोनदा त्याने आई जवळ तसे संगण्याचा प्रयत्नही केला. पण आईकडून त्याला मार आणि ओरडण्याशिवाय काहीच मिळाले नव्हते.

आता त्याच्या चालण्या बोलण्यातही कुणाच्याही लक्षात यावा असा फरक दिसायला लागला होता.

शाळेतली मुलं त्याची टिंगल करायचे. त्याला मनीषा मनीषा म्हणून चिडवायचे.

त्यामुळे तो खूप दुःखी व्हायचा. मग एकांतात कुठेतरी लपून बसायचा.  स्वतःच रडत राहायचा.

का मी हा असा ? स्वतःलाच प्रश्न विचारायचा आणि स्वतःच उत्तर शोधण्याचा प्रयत्न करायचा.

त्याच्या मनाचा कोंडमारा व्हायचा.

मात्र त्याला कुणी मनीषा म्हटलं की खूप छान वाटायचं.

आताशा त्याने शाळेत जाणे पण बंदच केले होते. घरून शाळेत जाण्यासाठी निघायचा मात्र कुठेतरी दूर एखाद्या एकांत जागी जाऊन तो वेळ काढायचा, आणि शाळेच्या सुट्टीच्या वेळी बरोबर घरी यायचा.

मनातला कोंडमारा कुणाजवळ मोकळा करावा काहीच कळत नव्हते. आईला काही सांगायचे म्हटले तीही खूप रागवायची. 

मग त्याला वाटायचे आपले लहानपणच किती छान होते. सगळे किती लाड करायचे.

आणि आता, आता तर सगळेच मला दूर सारतात.  का हे असे होत आहे ?  देवा मलाच का हे असं बनवलं? यात माझा काय गुन्हा?

तो खूप रडायचा . मग त्याला देवाचाही राग यायचा. कुणीच त्याला समजून घ्यायला तयारच नव्हते. 

आतल्या आत त्याचे मन त्याला पोखरुन काढत होते. काय करावे काहीच कळत नव्हते.

नेहमीच तो दुःखी रहायला लागला. शेवटी त्याने एक निर्णय घेतला.

आज सकाळी शाळेत निघताना त्याने आपले घर अगदी डोळे भरून पाहिले. देवाला नमस्कार केला.

आईला बघून त्याच्या डोळ्यात आसवे आली. तो अचानक आईला बिलंगला. त्याला आईला सोडूच नये असे वाटत होते. 

आईनेच त्याला रागावून बाजूला केले. म्हणाली अरे हे काय मनीष. आता तू लहान का आहेस. जा तुझ्या शाळेची वेळ झाली बघ. निघ शाळेला वेळ व्हायला नको. उशीर झाला तर टीचर पनिश करतील तुला.

जड अंतकरणाने तो आई पासून दूर झाला. त्याने आपली स्कुल बॅग उचलली आणि निघाला.

आज मुद्दाम तो वर्गात गेला. सगळी मुलं त्याची टिंगल करत होते.

कुणीच त्याला इतके दिवस का आला नाही , कुठे होता, काय झाले काहीच विचारत नव्हते.

सगळ्यांना फक्त त्याची टिंगल मात्र करायचे सुचत होते. त्याला सगळ्यांचाच खूप राग आला. मग मात्र तो स्कुल मध्ये न थांबता सरळ झपाटल्यासारखा रस्त्याने एकटाच आपल्याच तंद्रीत  निघाला.

सायंकाळ होऊनही मनीष आज घरी परत आला नाही म्हणून तारा ला काळजी लागली. तिला काय करावे काहीच सुचत नव्हते.

तेवढ्यात कोणी तरी तिला सांगितले गावाच्या बाहेर कुणी तरी एका मुलाने फाशी घेऊन आत्महत्या केली. 

तिचा हृदयाचा थरकाप उडाला ती तशीच खाली बसून रडायलाच लागली….

संजय रोंघे
नागपूर

आभासी या दुनियेत

आभासी या दुनियेत
सारेच खेळ मनाचे
काय करू काय नको
काय कुठल्या गुणाचे ।

फेसबुक असो वा व्हाट्सप
नकळतच लागतो लळा ।
उघडून उघडून बघतो मग
मोजू नकाच किती वेळा ।

विचारांची माया सारी
जगाची होते वारी ।
दिवसा ढवळ्या दिसे स्वप्न
डोळे ओलावतात मन भारी ।

कधी होतो ताप डोक्याला
म्हणतो आता सांगू कुणाला ।
टोपी घालून जातो कोणी
भोगतो दुःख सांगे मनाला ।
Sanjay R.

स्वप्न कळेना

उघड्या डोळ्यांनी बघतो स्वप्न

स्वप्न कशाचे मी माझ्यात मग्न ।


कधी होतो मी धनवान बहुत
कमी कशाची मी स्वार्थी भूत ।

करून घेतो मी ब्रह्मांड दर्शन
हाती असते कृष्णाचे सुदर्शन ।

वाटते कधी मी ताकदवान किती
माणूस बघूनच मग वाटते भीती ।

मनातले सारेच घेतो मी बघून
कळते शेवटी उपयोग काय जगून ।
Sanjay R.

आयुष्य तर क्षणाचे

वारे हे बदलले
परत बदलतील ।
वारे थंड किती हे
गरम ही होतील ।

जगही बदललं
गरिबी पण गेली ।
श्रीमंती असूनही
तृप्ती नाही सरली ।

आसुसलेले हे मन
अजूनही रिकामेच ।
भरू किती धरू किती
आयुष्य तर क्षणाचेच ।
Sanjay R.

निषेध

ठेऊ कशाची उमेद
मनास होते वेध ।
सुटून गेले सारेच
फसले सारे बेत ।
बघू मी कुठे आता
पदरी आला निषेध ।
Sanjay R.

अजून मी हरलो नाही

पुढे पुढे मी आलो चालत
मागचे काही कळले नाही ।
खडतर होती वाट सारी
मागे वळून फिरलो नाही ।
मनात होत्या किती आशा
निराशेत मी भारलो नाही ।
निर्धार आहे मनात पक्का
मीही अजून सरलो नाही ।
दुःखच माझे सखे सोबती
सुखात मी शिरलो नाही ।
विजयाचा जळेल दीपक
अजूनही मी हरलो नाही ।
Sanjay R.

जीवन खेळ नाही

वादाशी होतो वाद
शब्दांत संवाद नाही ।
अर्थाचे होती अनर्थ
बोलणेच सार्थ नाही ।
मुक्यानेच सारे कळते
बोलूनही वळत नाही ।
राखेत टाका काही
काहीच जळत नाही ।
हवी कशाला चर्चा
मनाचाच मेळ नाही ।
मानाचा होतो अपमान
जीवन हे खेळ नाही ।
Sanjay R.

आखोमे आसू कितने

आखोंमे बुंदे कितनी
गिनू मै जितनी ।
अनमोल वह मोती
किमत है उतनी ।

छिपा है दर्द उसमे
दिलकी भी कहानी ।
टपकते जब कभी
ना समझो पानी ।

हसते हसते कभी
कहे मै दिवानी ।
गालो पर थमे तो
याद आये सुहानी ।

हो बरसात कभी
लगे आसमानी ।
रोक करभी रुकेना
बस करे मनमानी ।
Sanjay R.