” भ्रमण सूर्याचे “

सरते जिथे रात्र जेव्हा
आणि होते प्रभात ।
सूर्याच्या साक्षीने होते
दिवसाची सुरुवात ।

पूर्वे पासून पश्चिमेला
चाले सूर्याचे भ्रमण ।
होताच सायंकाळ
होई अंधाराचे आक्रमण ।

अस्त होताच सूर्याचा
येई साम्राज्य अंधाराचे ।
व्यापून जाई आकाश सारे
विश्व चंद्र आणि ताऱ्यांचे ।

कुठे लखलख कुठे चमचम
रातकिड्यांचे चाले आवाज ।
मधेच दिसतो दूर काजवा
सकाळ होता सरतो साज ।
Sanjay R.

” मलाही परत हसायचं “

” आहे मला हसायचं ”

अहो सांगा ना कोणी
शाळेत कधी जायचं ।

कंटाळा आला आता
किती घरात बसायचं ।

विसरलोच वाटते मी
दंगा मस्ती करायचं ।

भेट नाही गाठ नाही
कुठे मित्रांना शोधायचं ।

घरातल्या घरात आता
एकटच कसं खेळायचं ।

प्रश्न मनात झालेत जमा
कधी गुरुजींना विचारायचं ।

जा बाबा कोरोना तू
आहे मला हसायचं ।
संजय रोंघे

🥱😃🥱😃🥱😃🥱

” लावणी जीव तुझ्यात रंगला “

करून मी नट्टा पट्टा
झाली हो तय्यार….
घ्या बघून डोळे भरून
करू नका अंधार….

मज वाटते हो भीती
सांगू कशी किती….
राया जाऊ नका दूर
घ्याना हात माझा हाती….

गेले किती मी थकून
वाट तुमची हो बघून….
या जरा रंगात आज
जाइल ताण माझा निघून…

घ्या जवळ मला आज
काढते मी साज…
करा बंद तुम्ही डोळे
मज वाटते हो लाज…..

देते सारे मी तुम्हास
हळू घ्या ना जरा श्वास…
रात्र ही आजची
आहे किती खास…

मिठीत तुमच्या राया
मिटवा माझी क्षुधा….
प्रीत तुमची माझी
कृष्णाची जशी राधा….
Sanjay R.

” कवितेला मिळाली पावती “

माझ्या कवितेला मिळालेला सन्मान, आयोजकांचे खूप खूप आभार.

जीवन हे सारे
आहे फक्त श्वास ।
जगण्यास हवा
प्रेमाचा आभास ।

येती आणि जाती
दुःखाचे निश्वास ।
सदा मनी चाले
सुखाचाच ध्यास ।

करू मी किती
मनात प्रयास ।
अंतरात माझ्या
प्रीतीचा वास ।

सत्य हे जीवनाचे
हवा विश्वास ।
प्रेमविन नाही
काही इथे खास ।

विराण वाटेवर
कठीण प्रवास ।
असता होई सुकर
प्रेमाचा सहवास ।
Sanjay R.

” बापूच लगन “

बापू झाला मोठा
लगन त्याच कराचं ।
पोरगी निंगलो शोधाले
सगळ्यायले होतं सांगाच ।

दिसरात डोक्यात इचार
कसं काय थे कराचं ।
पोट्ट म्हणे बहीन
मधुरीलेच घरी आनच ।

म्या मानलं बावा
दाव मले तुयी माधुरी ।
मनानं तुयाच करू लगन
होऊ दे इच्छा तुयी पुरी ।

घेऊन आलं पोट्ट मोठं
शेनीमाच एक पोस्टर ।
म्हने हे व्हय थे माधुरी
नवराबी हाये तिचा दाकटर ।

समजेच न्हाई मले काई
डोकं फिरलं का याचं ।
माधुरी वानी आसन कोनी
त उरकून टाकू त्याचं ।

मंग शोधली म्या एक
दिसे डिकटो माधुरी ।
मनल जमते कारे बापू
हाये थोडीशी कारी ।

बापू बी मानला जरा
करा काय लागते गोरी ।
लेकरं झाले का मंग
हालवंन माही माय दोरी ।

ठरलं लगन मंग त्याच
50 मन्दिच कराचं ।
वाचतेत ना पैसे बी
कोरोना मन्दिच उरकवाचं ।

झालं सारं झक्कास
सगळेच झाले खुश ।
पुसला म्याबी घाम
हाये सुनंले कामाची हाऊस ।
Sanjay R.

” स्वप्न “

जीवनाची कथा
स्वप्नांची गाथा
सुख दुःख यथा
हृदयाची व्यथा

स्वप्न एक क्षुधा
मन होई द्विधा
निद्रेची बाधा
लक्ष तेची साधा
Sanjay R.

” एक निवांत क्षण “

घेऊन ओझे डोक्यावर
सुरू होती भ्रमंती ।
विचारांचा गोधळ डोक्यात
नव्हती मनाला शांती ।

दमला थकला किती उरला
काळवंडली कांती ।
मृत्यू समोर ठाकला जेव्हा
उरले काय अंती ।

घे जगून दिवस अजून
मग लाभेल शांती ।
हस थोडा नी हसव थोडा
शेवटी होशील निवांत ।
Sanjay R.

” लव्ह यु जिंदगी “

जीवनाचा काय भरोसा
घे ना जगून तू आता ।
पायावर तुझ्या उभा केला
तुझेच ते रे माता पिता ।

कर सेवा थोडी त्यांची
सर्वस्व सारे दिले तुला ।
तुझ्या विना रे कोण आता
जाग जरा रे तू मुला ।

वृद्धत्व तर अटळ आहे
जगला तू जर आयुष्य सारे ।
विसरू नको जीवनाला तू
सूर्य दिवसा रात्री तारे ।

धाडू नकोस वृद्धाश्रमी
आनंदाची होतील फुले ।
प्रसंग असाच येईल तुजवर
बंद खोली आकाश खुले ।
Sanjay R.

” ती “

विसरून कसे चालेल
ती तर जननी या धरेची ।
भूमिका तिच्या अनेक
बघा कोण ती कुणाची ।

जन्मापासून जुळते नाते
आहे किती ती गुणाची ।
होईल कशी परतफेड
दोरी मी तिच्या ऋणाची ।

तीच माता तीच भगिनी
भार्या झाली आयुष्याची ।
होते जेव्हा मुलगी कुणाची
कीर्ती गावी तिच्या गुणांची ।

अनुसूया पार्वती ती जगदंबा
आई भवानी ही ती जगाची ।
होते कधी कथेतली ती परी
कधी अप्सरा रंभा इंद्र दरबाराची ।

उचलते भार सारा प्रपंचाचा
नाही तुलना तिच्या सामर्थ्याची ।
स्वतःच सोसते घाव सारे
नसे काळजी कधी दुःखाची ।

अर्पण करते सर्वस्व आपुले
परी लकीर गालावर हास्याची ।
अंतरात जरी वेदनांच्या लाटा
चिंता कुणा तिच्या आसवांची ।
Sanjay R.

” पहिले प्रेम “

कधी पाहताच क्षणी प्रथम
वाटते व्हावी खूप जवळीक ।

ओढ लागते मग मनाला
नसते तीही कधी क्षणिक ।

लागते मन मग झुरायला
होते आस अधिकाअधिक ।

अन्न पाणी लागे ना गोड
होई क्षुधा अति अगतिक ।

प्रेमच कदाचित असावे ते
वेदना असते ती आंतरिक ।

नजरेला लागती वेध किती
प्रेमाची अवस्था ती भावनिक ।
Sanjay R.

” पण राहूनच गेलो “

तू तिथे आणि मी इथे
बोलणंच कुठे झालं ।
सांगतो सांगतो म्हटलं
पण राहूनच गेलं ।

डोळ्यात तुझ्या बघितलं
गालात मज दिसलं ।
फुललेला चेहरा तुझा
मन माझंही हसलं ।

भिर भिर झालो किती
मन तुझ्यात गुंतलं ।
काही सुचेना तुझ्याविना
गुपित प्रेमाचं आपलं ।

तशातच तू गेलीस दूर
मनातलं मनातच राहिलं ।
शोधतो अजूनही तुला
गुलाब फुल तुलाच वाहिलं ।
Sanjay R.

” झुकतो माथा आपोआप “

विचार तुझे निष्पाप
काढी शत्रूचा ताप ।

सगळेच करिती जाप
गाजवितो तू प्रताप ।

दुष्मना लागते धाप
अंतरात सोडतो छाप ।

सैनिक तू सीमेवरचा
अतिरेक्यांना मिळे शाप

शहीद जेव्हा तू होतो
झुकतो माथा आपोआप ।
Sanjay R.

” हरवले बालपण “

” हरवले बालपण ”

भीती कोरोनाची मनात
बालपण चालले घरात ।

नाही मित्र नाही मैत्रीण
वेळ काढणे घरात कठीण ।

शाळा नाही अभ्यास नाही
खेळू कुणाशी सांगा काही ।

टीचर येतात ऑनलाइन कधी
नेटवर्क नसते मोबाईल मधी ।

आई बाबांची मिळते माया
सम्पू दे कोरोना विठू राया ।

शाळेत जाईल खेळील खूप
बालपण असे करू नको चूप ।
Sanjay R.

” घे मानवा श्वास “

हत्या असो वा आत्महत्या
मार्ग विचारांचा हा मिथ्या ।

असो संकट वा मार्ग अनुकूल
धैर्याने जायचे पुढे सोडून भूल ।

शांत चित्त हवा आत्मविश्वास
संकटातही होईल सुखाचा प्रवास ।

लढाई ही जीवनाची नाही आभास
अंत अजून दूर आहे घे मानवा श्वास ।
Sanjay R.

” तुझे माझे नाते “

अवतरलो इथे मी
चरण प्रथम जीवनाचे
आई तू माता बाबा पिता
ताई दादा काका मामा
सारे नाते आयुष्याचे ।

शिकून सवरून मोठा झालो
दोस्त मित्र मिळाले सहयोगी ।
लेक कुणाची आली घरा
पत्नी झाली महान त्यागी ।

हळूच आले पुत्र पुत्री
जीवन सारे आनंदी झाले ।
हळू हळू हे जीवन गेले
नाही कळले कसे सरले ।
Sanjay R.

” वाट मी पाहतो “

नको वाट पाहू
गेला उडून पाऊस ।
आकाश निरभ्र झाले
नको दूर जाऊस ।

अजून आशा मनात
रिमझिम होईल पाऊस ।
फुलेल ही हिरवळ
नको निराश तू होऊस ।

येईल गंध या मातीला
भिजेल चिंब ही धरा ।
सूर्यही लपेल ढगाआड
होईल धुंद तो वारा ।

सागरात उफाळतील लाटा
निघेल न्हाऊन किनारा ।
पुसतील साऱ्याच वाटा
जीवन फुलण्याचा इशारा ।
Sanjay R.

” मनात होते धाकधूक “

कोरोना पाई चालला
घरातच जीव ।
येईन का आता आमची
कोणाला कीव ।

शाळा नाही ऑफिस नाही
म्हणे घरात राहा ।
आले कसे हे दिवस,
काय कसं पहा ।

शाळा होते ऑनलाइन
मोबाईल मध्ये शिका ।
भोगतोय आम्ही सांगा
कुणाच्या या चुका ।

काम धंदा बुडाला
पोट म्हणते भूक ।
घरात राहून कसं चालन
मनात होते धाकधूक ।

शिंका जरी आली तरी
भीती लय वाटते ।
जगायचं कसं सांगा
जीव आतच तुटते ।
Sanjay R.

” दोस्ताची दोस्ती “

आठवत न्हाई मले
झाली कवा दोस्ती ।
लहान होतो जवा
चाले मोठी दंगा मस्ती ।

शायेत मीयुन जावो
एकाच बेंचावर बसो ।
खोड्या काढून सन्या
जोरजोरानं मंग हासो ।

मस्ती आमची पाहून
मास्तर लैच ओरडे ।
झोडपे मंग बसलेका
डोये होये कोरडे ।

कालेजात असतांनीच
लागली त्याले नवकरी ।
तवापासून न्हाई भेटला
म्या बी सोडली मस्करी ।

एकदिस फेसबुक वर
मेसेज त्याचा आला ।
मनलं म्या त्याले राजा
गायब कसागा तू झाला ।

नोकरी संगच मले बावा
छोकरी भी भेटली ।
तिच्या नादात लागलो
आनं दोस्ती बी तुटली ।

मंग केलं म्या लगन राजा
आली संसाराची कायजी ।
निपटलं बहिन सारं आता
झालो मिबी आता बावाजी ।

नातवानं देल काढून मले
फेसबुकचं हे खातं ।
तेथच दिसला गा तू बावा
आठवलं दोस्तीचं नातं ।

इसरलोच होतो गा सारं
माफ करशीन का मले ।
लहानपन होतं मस्त
एकडाव भेटाचं हाये तुले ।
Sanjay R.

” मन उरते अधर “

मन विचारांचा सागर
अहोरात्र चाले जागर
कधी न भरे ही घागर
बुद्धी साऱ्यांची चाकर
कर्म कर्तृत्वाचा नोकर
हवी पोटाला भाकर
भरले पोट देई ढेकर
लालसा मनी निरंतर
नाही तृप्ती चा आदर
आत्मा मग होई सादर
होई आयुष्याची मरमर
लागे कलंकाची नजर
सरते श्वासांची घरघर
मुक्ती ठाकते सामोरं
विसावतो होऊन अमर
अटळ जन्ममृत्यूचा प्रहर
मन उरते मग अधर
Sanjay R.