” बासरीचे सूर “

तुझ्या बासरीचे सूर
मन होते रे आतुर ।
लागे किती हूर हूर
नको होऊस तू दुर ।
अंतरात उठे काहूर
येई आसवांचा पूर ।
फुटतो किती हा उर
शोधते तुझाच सूर ।
Sanjay R.

” ओंजळ रीती “

कशी ग तू विसरलीस
वाट बघतोय मी तुझी किती ।
येशील माझ्या स्वप्नात म्हणून
जागून काढतो रात्री किती ।
ये ना आजही स्वप्नात माझ्या
देईल तुलाच मी माझी प्रीती ।
जाऊ नकोस सोडून परत
तुजविण माझी ओंजळ रीती ।
Sanjay R.

” तू कशी “

स्वतःलाच मी विचारतो
असशील तू कशी ।
सांगत अंतरमन माझं
असणार तू तशी ।
गोड तु हसावं आणि
व्हावी मला खुशी ।
विचार तुझा यावा नी
समोर दिसावी तू जशी ।
अतूट ते नाते किती
दिव्याला वात जशी ।
Sanjay R.

” फॅशन “

” फॅशन ”

काय तुही फॅशन
जसं रोज नवं ठेसन ।
गाडी चाले रुळावर
पर नवीन एक मिशन ।
तोरा किती कसा
तोंडाले लोशन ।
फिकीर बी न्हाई
हासत कोनी आसन ।
करू द्या करते त
मनात जे असन ।
नाईत रुसुन जाऊन
कोपरयात बसन ।
दिसच फिरले आता
पायजेल फॅशन ।
नसलं काई खाले
तरीबी चालन ।
Sanjay R.

” विचार “

स्वतःलाच मी विचारतो
असशील तू कशी ।
सांगत अंतरमन माझं
असणार तू तशी ।
गोड तु हसावं आणि
व्हावी मला खुशी ।
विचार तुझा यावा नी
समोर दिसावी तू जशी ।
अतूट ते नाते किती
सोबत कपाला बशी ।
Sanjay R.

” वाटतं मलाही “

आपलं म्हणावं असं
कुणीतरी असावं ।
त्यांनीही माझ्यावर
थोड्या रागानं रुसवं ।
अतीच राग आला तर
खळखळून हसावं ।
चार गोष्टी प्रेमाच्या
अंतरातून बोलावं ।
आवडता माझा तू
कानात येऊन सांगावं ।
मलाही वाटत मनातून
मनसोक्त पावसात नाचाव ।
कुणीतरी आपलं ना
मलाही असावं ।
Sanjay R.

” तुलाच शोधतो मी “

तुलाच शोधतो मी
कशी ही सांज झाली ।
घराला निघाले पक्षी
चांदणी आकाशी आली ।
दडला सूर्य पल्याड
चंद्र हसला गाली ।
चमचमला काजवा आणि
धरा अंधार ल्याली ।
टीमटीमते दूर पणती
मंदिरात घंटा झाली ।
रस्ते सुनसान झाले
रात्र अवचित आली ।
रात राणी माझी ग तू
सु गंधात न्हाली ।
Sanjay R.

” स्वप्न माझे “

रात्री आज ना
आघटीतच घडलं ।
झोपेत मला ना
एक स्वप्नच पडलं ।
मोठा मोठा खूप मोठा
पर्वता आड मी दडलो ।
छोटीशी गारगोटी
त्यावर जाऊन पडलो ।
आई आई करून
किती हो मी रडलो ।
कष्ट तिचेच ना
जोही आहे तो घडलो ।
विसरेल कसा बाबांना
त्यांच्याच बाळानं उडलो ।
त्यांच्याविना मी आज
स्वप्नातही तडफडलो ।
Sanjay R.

” ओळख पाळख “

साहित्यीक वयख पायख लेखमाला ३६🤝

” माह्या वऱ्हाडाची माती “

माह्या वऱ्हाडाची माती
फुलवते सारी नाती गोती ।

धनी राबतो थे शेती
होतो वला पावसाच्या घाती ।

पऱ्हाटीले फुटते पाती
वळे कष्टाच्या वाती ।

तवा येयी पयसा हाती
पोसे मानसाच्या जाती ।

घास दोन सारे खाती
कधी उपासाच्या राती ।

तुटे निसर्गाची गती
हाती ढेकलाची माती ।

दिस हपत्याचे साती
जीव उरफाटा घेती ।

अभंग तुकोबाचा गाती
फुले इंच इंच छाती ।

सपन उद्याचे पायतो
झोप सुखाची राती ।

व-हाडी बोलीभाषेवर प्रेम करनारे संजय रोंघे BE(Elect)MBA असुन पन आपल्या रोजच्या जगन्या वागन्यात व-हाडीपना संभावुन हाय! .. ईंजिनियर असलेला हा मानुस तसा नागपुरचा पन नोकरी मातरं यवतमाळले ! यवतमाळच्या रेमंड फ्याक्टरीत म्यानेजरची नोकरी संभावुन, संजुभौ साहित्यीक म्हनुन तं जगतेतचं ! पन संगच वावरावर बी ध्यान देतेतं ,एक कास्तकार असल्यानं त्यातलं सुख अन दुख आपल्या कवीताईतं मांडुन आनंद घेतेत अन देतेत … संजुभौ समाजासेवेत पन मांग नाईत ,अळल्या नळल्याले मदत करत असतेतं,त्याईच्या सुखातचं आपलं सुख पायनं हे त्याईले बेज्या आनंद देते .बातम्या आईकनं ,शिनमे पायनं ,टेक्नालॉजी ,डिस्कवरी ,नवं नवीन शोध यात बेज्या इंटरेस्ट असलेला मानुस !
👉सोशल माध्यमातु साहित्याचा प्रचार अन प्रसार …
👉सहभाग -९२वे अ . भा . म . सा . संमेलन यवतमाळ
👉सदस्य – अखिल भारतीय व-हाडी साहित्य मंच.
अशा हुरहुन्नरी अन मानसाईत मानुस पायना-या संजुभौले सुखी ,समाधानी ,निकोप अन निरोगी जिंदगानीच्या रेमंडभर शुभेच्छा ….💐💐✌🏻
तं मंग सकाय अनखीन भेटु एका नव्या वयखी पायखी संग ….
धन्यवाद 🙏🏻
✍🏻
श्याम ठक
अध्यक्ष
अखिल भारतीय व-हाडी साहित्य मंच
९९७५७९२५२०
abvsmakola@gmail.com
@SHYAM2473
shyamthak.blogspot.in/?m=1

” वर्हाडी दर्शन “

दर्शन घिऊन सन्या
लागलो मी लायनीत ।
घ्याची होती शिरनी
पर चित्त मायं वायनीत ।
Sanjay R.

भाव ठिवा मनात
त्याचीच इच्छा सारी ।
भेटते परसाद शिरणीचा
भगवंताच्या दारी ।
Sanjay R.

गोठनात बांधली गाय
हंबरते थे वासरासाठी ।
मायले किती कायजी
सारे तिच्या लेकरासाठी ।
Sanjay R.

पिऊन पिऊन दारू
आग लावली घराले ।

तोडला मोडला संसार
सांगू आता कोनाले ।

कोर भर भाकर आता
कठीन झाली जीवले ।

जाऊ दे मरू दे बावा
उदई लागो मूडद्याले ।
Sanjay R.

” जिजाऊ “

परतापी आमचा राजा
शिवबाची थोर आऊ ।
मराठीच्या मतिमंदी
परतेक माय जिजाऊ ।।
संजय रोंघे

वायून गेलं वावर सारं
करा उलंगवाळी ।
हाती काय आलं
ढेकलाची माती काळी ।
Sanjay R.

“वावर “
लय केली धावाधाव
न्हायी पिकलं वावर ।
कष्टा पायी थकलो आता
सरला सारा पावर ।
सालो साल उलटले कितीक
पान्याले न्हाई आवर ।
पांडुरंग तूच हाये आखरी
घर आमचं आता सावर ।
Sanjay R.

झाला तरास डोक्याले
पास्तावा आला मनाले ।
येळ गेली ना निंगून
सांगू आता कोनाले ।
पिकन मानलं पीक पानी
द्या लागलं सावकराले ।
उरली फकस्त आता माती
खाऊ काय घालू लेकरायले ।
इचार लय भारी आता
कराच कसं सांगा जगायले ।
Sanjay R.

” न्याहारी “

टीचभर हे पोट
कोनाले भेटे न्याहारी ।
कोर कुटक्यासाठी
कोनी फिरे दारोदारी ।

दिस रात चरे त्याचा
देह किती भारी ।
जन्माचा उपाशी राजा
वाटे कितीक आजारी ।

जागी एका बसून
मोजे नोटा व्यापारी ।
आटउन रक्त सारे
उपाशीच शेत करी ।

लटकते फासावर
किती झाले आतावरी ।
मोजूनरे थकलो आता
उपाशीच सारे घरोघरी ।
Sanjay R.

” अनादी अनंत “

आदी ते अंत
अनादी अनंत ।
जीवन हेची
असे मोठा ग्रंथ ।
कुणी इथे महंत
आणिक संत ।
वाहे झरा संथ
काय कुणाचा पंथ ।
द्वार कर्माचे शोधू
परी विचार निवांत ।
सारेच अशांत
वाटे मोठी खंत ।
बसुनी थोडे शांत
देखू स्वतःचा अंत ।
Sanjay R.

” तरास डोक्याले “

झाला तरास डोक्याले
पास्तावा आला मनाले ।
येळ गेली ना निंगून
सांगू आता कोनाले ।
पिकन मानलं पीक पानी
द्या लागलं सावकराले ।
उरली फकस्त आता माती
खाऊ काय घालू लेकरायले ।
इचार लय भारी आता
कराच कसं सांगा जगायले ।
Sanjay R.

” वावर “

” वावर “
लय केली धावाधाव
न्हायी पिकलं वावर ।
कष्टा पायी थकलो आता
सरला सारा पावर ।
सालो साल उलटले कितीक
पान्याले न्हाई आवर
पांडुरंगा तूच हाये आखरी
घर आमचं आता सावर ।
Sanjay R.

” ओलावते कडा डोळ्यांची “

लेक तू ग माझी लाडाची
आहेस सावली झाडाची ।

तीळ तीळ झाली मोठी
जशी तुळस अंगणाची ।

फुलविले छान घर तुने
झालीस फुल तू वेलाची ।

होतीस तू लहान जेव्हा
दुडू दुडू कशी ग चालायची ।

क्षण आनंदाचे होते सारे
खुदु खुदु किती ग हसायची ।

वाटतं अजूनही आहेस तू छोटी
छकुली माझ्या तू स्वप्नांची ।

येईल तो दिवस जाशील दूर
ओलावते कडा माझ्या डोळ्यांची ।
Sanjay R.

” कसा रे बापू “

आस तुला रे कशाची बापू
राम कसा तू विसरला बापू
तू कलंकित केला बापू
विश्वसच उडाला बापू
नावात तुझ्या रे राम बापू
तुजविण रावण बरा बापू
Sanjay R.