” आली थंडी “

पहिला यंदा पावसाचा हिसका
आली थंडी थोडे सरका ।

पेटवा ना शेकोटी अहो काका
प्रसंग आहे मोठाच बाका ।

नका विचारू चहा घेता का
थर थर कापतोय वाटतो धोका ।
Sanjay R.

” एकतीस डिसेंम्बर… “

एकतीस दिसेम्बर मांगचा
आठवते अजून भौ मले ।
एक थेंब घ्याची न्हाई
ठरवलं होतं हे सांगतो तुले ।

काय वरीस निंघाल गा
प्याच लागली ना मले ।
पहिल्याच दिशी सांगतो
भेटाले दुरून दोस्त आले ।

न्हाई न्हाई म्हनता भौ
घेऊन गा मले गेले ।
घ्याच लागते म्हने सारे
न्हाईत पैसे द्या लागन तुले ।

रिकामा महा खिसा मुन
जीवावर आलत भांडे घासाले ।
पेउन झालो मोकळा तवा
सुखरूप पोचलो घराले ।

तवा पासून राजा ठरवलं म्या
सोडाची गोठ सांगाची नाई कोनाले ।
प्यावं वाटलं त एकटच जाऊन
खाऊन पेउन लागाच रस्त्याले ।

पायता पायता सरलं वरीस
पोचलो ना एकतीस डिसेंम्बरले ।
झक्कास पडलं पार सारं
बाकी पाहू पुढच्या वरसाले ।
Sanjay R.

” जीवन रंग “

काय जीवनाचा रंग
जगणेच आहे व्यन्ग ।

स्वप्नांचा होतो भंग
शोधायचे त्यात तरंग ।

होऊन विचारात दंग
घर ठेऊनिया संग ।

करायचा नेटका संसार
मुखी तुकोबांचा अभंग ।
Sanjay R.

” वर्ष सरतांना ‘

वर्ष सरतांना…..
उभा मागे इतिहास
पुढे भविष्याचा ध्यास ।
एक एक पान पालटून बघा
त्यात पुढे जायचा प्रयास ।
मनात होता आभास
थांबले नाहीत श्वास ।
नववर्ष येईल आता
करू सुरुवात खास ।
व्हायचे विजयी आम्हा
आहे हाच विश्वास ।
Sanjay R.

” अर्थ जीवनाचा “

” अर्थ जीवनाचा ”

जन्म आणि मृत्यु
जीवनाची दोन टोके ।
जगायचे मध्ये
टाळून सारे धोके ।

कधी हसायचं
कधी रडायचं ।
वादळ वाऱ्याला
झेलत जगायचं ।

नागमोडी वाटा इथे
खाचखळग्यांनी भरलेल्या ।
पार होतात सहज
विश्वासाने सारलेल्या ।

दिन दुबळे गरीब बिचारे
मदत करा जगायला ।
वेळ नाही लागत कुठली
तयार राहायचे मरायला ।
Sanjay R.

” मेरी ख्रिसमस “

आला आला
सँटा आला ।
दिसतो कसा
दाढी वाला ।

मोठी दाढी
मोठ्या मिश्या ।
वाटतोय बघा
सगळ्यांना खुशा ।

लाल झगा
लाल टोपी
हाती घंटी
झोळी पाठी ।

हवेत गिफ्ट
सांगा कुणाला
घोळका मुलांचा
म्हणतो मला ।

जिंगल बेल
जिंगल बेल ।
मुलं खुश
वाटतंय वेल ।

” हॅपी ख्रिसमस ”
Sanjay R.

” शोधतो मंगळ “

लग्न नाही जुळत
आहे म्हणतात मंगळ ।
दोघानाही असेल तर
होते का मग चंगळ ।

पृथ्वी वर राहताय ना
दूर आहे हो मंगळ ।
वाजते का थंडी मग
करू नका आंघोळ ।

यान आले जाऊन
बघून आले मंगळ ।
शोध पाण्याचा सुरू
जीवनाची सळसळ ।

मात्र अजूनही शोधतो
मंगळाला मंगळ ।
नाहीच मिळाले तर
होते का हो अमंगळ ।
Sanjay R.

” मंगळ लग्नातला “

अंतराळात थोडे बघा
अति विशाल याचा आकार ।
नजर थांबेल पण
आकाश नाही सम्पणार ।
असंख्य ग्रह ताऱ्यांची
इथे आहे वस्ती ।
सगळे एकमेकात गुंफलेले
ढळला तो सरला ।
हा एकच सिद्धांत
आहे ठाऊक यांना ।
स्वतःच्या शक्तीनुसार
सतत भ्रमंती सुरू असते ।
प्रत्यकाला आपली
कक्षा आहे ठाऊक ।
कोणीच कक्षेच्या बाहेर
डोकावत नाही ।
आणि डोकावले तर
कपाळमोक्ष ठरलेला ।
पृथ्वी सूर्य चंद्र मंगळ
सारेच माळेतले मणी ।
मात्र इथे आम्ही
पृथ्वीवरचे ज्ञाणी ।
भक्तीवान काही
शक्तीवान काही ।
निर्बुद्ध काही तर
बुद्धिवान काही ।
मनात येईल तसे
आमच्याच मनाने वागतो ।
दिवस आणि रात्र
सांगेल तसे जगतो ।
मन भिर भिर
घाबरून थोडे बघतो ।
ज्ञानी जसे सांगतो
तसेच मग वागतो
मंगळाची दशा आणि
शनीचा राग टाळतो ।
पृथ्वी ला मात्र
मनात येईल तसे जळतो ।
स्वतःच्याच हाताने
विध्वंस स्वतःचा करतो ।
करून विनाश स्वतःचा
अनंतात मग विसावतो ।
Sanjay R.

” भेटन का कापसाले भाव “

फेल झाले
सरकारचे डाव ।
आता भेटन का
कापसाले भाव ।

एकोपा सरला,
मिटलं नाव ।
पेटून उठला ना
समदा गाव ।

सांगा ना भाऊ
आता कोनी ।
घरातले वांधे
कोनाले सांगाव ।

कफल्लक झालो
महागाई पाई ।
न्हाई खाले,
घर कसं चालवाव ।
Sanjay R.

” आनंद हवा जगायला “

विचार वयाचा कशाला
आनंद हवा जगायला ।
एक एक श्वासा सोबत
हवा उत्साह हसायला ।
मुखवटा सुंदर करायचा
इतरांना छान दिसायला ।
अंत तर निर्विवाद सत्य
वेळच कुठे विचार करायला ।
Sanjay R.

” रे बळीराजा…. “

रे बळीराजा…..

सहनशक्ती तुही सांग
किती हाये रे अपार ।

कयनार न्हाई कधीच तुले
थ्या चाकूची रे धार ।

न्हाइ ठाव, अजब रे
हाये हे सरकार ।

पोटावर तुह्या होते
किती किती रे वार ।

सांग तूच आता तुले
हाये कोनाचा आधार ।

किती रे झेलशीन तू
हे अशे परहार ।

काया मातीत राबतो
न्हाई तुले दिस वार।

घरात जगतेत किती
सांग किती तुहा भार ।

पै पै लागे मातीत
घेते पाऊसच इसार।

सावकारापुढ कसा
होतो रे तू लाचार ।

तिसरा मधीच कोनी येते
करते तुह्या व्यापार ।

खिसा घेते हिसकुन
आनं सरतेत ईचार ।

सांग ठनकावून जरा
तूच जगवतो सारा भार ।

नको रे सोसू असा
एकटाच सारे वार ।

फेक फंदा फाशीचा
दे घराले तू आधार ।

टाक उलटून आता
सरकारचा ह्या दरबार ।

जयुन तू रे जयनार किती
राखे ईना काय उरनार ।

टाक जायुन तू आता
पडू दे त्यांयचेच निखार ।

संजय रोंघे,
नागपूर .
मोबाईल : 8380074730

” तुझ्यापाई रे माणूस हरला “

काय झाले कुणास ठाऊक
शांतीचा तर रंगच पालटला ।
मोर्चा दगडफेक जाळपोळ
हिंसेचा तर डोंब उसळला ।

सगळीकडे अफवांचा बाजार
सुत्रधाराने एक डाव रचला ।
जीव कुणाचा जातोय सांगा
अविचारी तर तिथेच फसला ।

शांती अहिंसा गांधींचा मार्ग
कसा रे माणसा तू विसरला ।
हो ना थोडा शांत जरासा
तुझ्यापाई रे माणूसच हरला ।
Sanjay R.

” खोटा मुखवटा “

” खोटा मुखवटा ”

कोण खोटा कोण खरा
समजणे कठीण आहे ।
ओढून मुखवटा निघतात सारे
ते तर त्यांचे रुटीन आहे ।

धडधाकट ही करतो सोंग
ढोंग समजणे कठीण आहे ।
पैशासाठी करतील काही
ते तर त्यांचे रुटीन आहे ।
Sanjay R.

समृद्ध भारत

देश भारत माझा
समृद्धीने भरलेला ।
भिन्न भाषा भिन्न धर्म
विविधतेने फुललेला ।

प्राचीन इथला इतिहास
संस्कृतीने सजलेला ।
शूरवीरांची गाथा इथली
पराक्रमानी धजलेला ।

स्वातंत्र्याची घेऊन धुरा
तिरंग्यापुढे झुकलेला ।
देऊन आहुती प्राणाची
केले स्वतंत्र भारताला ।

गांधी नेहरू भगतसिंह
इथेच आले जन्माला ।
संत महात्मे इथलेच सारे
वंदन करतो मी मातीला ।
Sanjay R.

” माणसापुढे माणूस लाचार “

कोण कुणाचा आधार
माय बाप ही वाटे भार ।

बदलले सगळेच आचार
अंतरात या कुठले विचार ।

झाले पुसट सारे उपकार
माणसाचाच होतो प्रहार ।

काळजाला विकृत आकार
जडत चालला हा विकार ।

जगतो करून तो दुराचार
माणसापुढे माणूस लाचार ।
Sanjay R.

” आसवंही आहेत भिजण्यास आतुर “

एकटा असतो मी जेव्हा
विचारांचं उठतं मनात काहूर ।

वाढते गती श्वासांची आणि
भिर भिर नजर मग होते स्थिर ।

शोधतो काय आकाशात पण
बघत बसतो क्षितिजा आड दूर ।

कळतच नाही मग येतो कसा
डोळयांच्या कडेला आसवांचा पूर ।

अंतराळात गवसतो एकटाच नभ
टाकतो देऊन त्यास मी माझा सूर ।

मग वाट बघतो मी पावसाची
आसवंही आहेत भिजण्यास आतुर ।
Sanjay R.

” थंडी “

पहाटेला उठावे तर
वातावरण थंड ।
वाटतं झोपावं अजून
मन करतं बंड ।

सहा वजताही बाहेर
अंधारच असतो ।
सूर्याची वाट बघत मग
चहा पीत बसतो ।

चिमण्यांची चिव चिव
होते मग सुरू ।
कुडकूड करत वाटतं
कसा मी फिरू ।

रजई देते हाक मला
घे थोडं पांघरूण ।
पहाटेची स्वप्न येतात
का कुणाला सांगून ।

स्वप्न अशी खरी होतात
बघ तू जरा ।
फिरून गार गार थंडीत
होशील का बरा ।

निघाला सूर्य की मग
उन्हात तू बस ।
अनुभव ना जरा तू
जीवनाचा रस ।
Sanjay R.

” म्हातारपण “

सरतो आहे पुढे पुढे
आयुष्याचा एक एक टप्पा ।

सुटत चालली एक एक कडी
कोण उरेल करायला गप्पा ।

मी मी म्हणणारा प्रत्येक जण
तू चा घेतोय आधार ।

पेलवत नाही बघा आता
म्हातारपणाचा भार ।

कठीण किती जीवन हे
दिसे अंताला जीवनाचा सार ।

वाट बघतो बघत आकाशी
नेतील कोण मला चार ।
Sanjay R.

” सून सासुवर भारी “

सून सासुवर भारी
होते सासू बिचारी ।

सत्ता सुनेची सारी
ही संसाराची वारी ।

बघून सून टीव्ही
होते कशी दुराचारी ।

अवतार सुनेचा बघून
सासू होते मग विचारी ।
Sanjay R.