कथा आहे ही सासू आणि सुनेची .
सुन होते सासू किती ती गुणाची.
नवी नवखी सून येते जेव्हा घरात . भीत भीत टाकते पाऊल भीती तिला कुणाची .
सगळेच असते नवीन , कल्पना कुणाच्या स्वभावाची.
नवरा वागेल कसा चिंता त्याच्या मनाची.
सासू, सासरे, दिर, ननंद मर्जी सांभाळायची साऱ्यांची.
सासू असते तापट, बोलायला थोडी तिखट, ननंद तर नेहमीच तुरट.
सासरा असतो थोडाच गोड, दिर म्हणजे माथे फोड ,घरच किती खारट.
नवऱ्याच्या स्वभावाचा लागेना अंदाज, बोलतो किती गोड,
दाखवी कधी भीती, कधी घालतो मोड.
म्हणतो मग मधेच, जिथली गोष्ट तिथेच तू सोड.
स्वतःकडे बघ जरा, झालीस किती रोड.
कधी म्हणतो सिनेमाला जाऊ, तिकडेच जाऊन आईस्क्रीम खाऊ. जेवण करूनच मग घरी परत येऊ.
गोष्ट कळते सासूला. तिचा चढतो पारा.
धुसफूस धुसफूस होते सुरू, ननंद घालते मग हळूच वारा.
दिर म्हणतो चिंता मिटली . सोबत येतो मी पण, चला लवकर लवकर आवरा.
नणंद दिर सासू सासरे सारेच जातात सीनेमाला.
आईस्क्रीम कुठे जेवण कुठे. लागते तीच मग परत येऊन कामाला.
नसते कोणी मदतीला, धावपळ होते जीवाला.
तिखट भाजी, खारट वरण पोळी लागते करपायला.
सारे घेतात पोट भरून, तिलाच नाही उरत काही, घेते उरले सुरले जेवायला.
रोज असतो तसाच दिवस,
त्यातच येतो दिवस आनंदाचा, उधाण येते उत्साहाला,
सारेच करतात लाड प्रेम, नसते सीमा कशाला.
नव्या पाहुण्याची लागते चाहूल, लागतात सारेच कामाला.
हळू हळू दिवस सरतात, घेऊन येतात पाहुण्याला.
लळा लागतो पाहुण्याचा, लाडात वाढतो पाहुणा, कुणाकडेच नसतो वेळ मागे वाळुन बघायला.
छोट्याचा तो होतो मोठा, बहर येतो जीवनाला.
परत येते नवीन सून, सासू मिळते सुनेला.
जीवनाचा तर हाच परिपाठ , रात्री नंतर परत दिवस, अस्त कुठे त्या सूर्याला.
संजय रोंघे
