” खिडकी “

खिडकीत बघायचा नाद
वाटायचं मिळेल तिथे साद ।

जेव्हाही बघायचो कोण कुठे
कोणीच नसायचं तिथे ।

आजही वाटलं आभास असेल
कोण कशाला आतून हसेल ।

पण नव्हता तो भास
मग थांबले माझे श्वास ।

मन गेले मग हरकून
आता रोज बघतो फिरून ।
Sanjay R.

” कुठे उरली माणुसकी “

      नाहीच उरली माणुसकी असे आपण ठोसपणे नाही म्हणू शकत पण माणुसकीचा ऱ्हास झाला हे मात्र मान्यच करावेच लागते .प्रत्येक जण स्वार्थी झालेला आहे. तो फक्त स्वतःच तेवढं बघतो.
स्वतःच्या स्वार्थासाठी कुठल्याही पातळीला जाण्यास  तयार होतो. काहीही करण्यास तो मागे पुढे पहात नाही. भविष्यात होणाऱ्या दुष्परिणामांचीही त्याला चिंता नसते. विचार असतो तो फक्त आजचा. आपल्या खिशाचा. आपल्या सुखाचा. भलेही ते सुख क्षणिक का असेना.  आणि माणूस  माणसालाच लुटायला निघतो. मग आपण सहजच म्हणून जातो, माणूसकीच उरली नाही.

      अशीच एक ही कथा आहे  माणुसकीची,  आमच्या सदाशिवाची.

      छोट्याश्या गावात राहणारा सदाशिव. घरात म्हातारे आई  वडील , दोन बहिणी, दोघीही लग्नाच्या. बायको आणि दोन शाळेत जाणारी छोटी छोटी मुलं. घरात तो एकटाच कमावता. घरी चार एकर जमीन तीही नेहमीच ऐन वेळेवर धोका देणारी. सदाशिव कसा बसा संसाराचा गाडा ओढत होता. त्याच्या कष्टाची तर सीमाच नव्हती. सकाळी उठल्यापासून तर रात्री झोपेपर्यंत त्याचे अमाप कष्ट चालत असत. कधी आपल्या शेतातले काम सोडून कुणाच्या दुसऱ्याच्या कामालाही जावे लागे. तेवढीच प्रपंचाला मदत होत असे. सोबतीला आई, बायको, बहिणी ही राबायच्या. पण परिस्थितीत काहीही फरक पडत नव्हता. दिवसेनदिवस सदाशिवची परिस्थिती खराबच होत चालली होती. डोक्यावर कर्जाचा डोंगर वाढत चालला होता. बियाणे, खते, औषध यांच्या किमती वाढतच चालल्या होत्या.  कर्जा शिवाय तर शेती करणेच कठीण होते. आधीच पैशाची तंगी. त्यात काही आगाऊचा खर्च आला तर सावकारा शिवाय काहीच पर्याय नसायचा.  शेतात मजुरीचा खर्च तर न झेपणाराच होता. आणि पीक मात्र हमखास धोका देऊन जायचे. कधी पावसाचा मार, कधी पुराची धार.  कधी कीटकांचा हल्ला तर कधी सगळे बरोबर असताना मालाच्या किमतीवर व्यापाऱ्यांची चालायची कुऱ्हाड. दाम मिळत नाही बरोबर. सगळीकडून शेतकऱ्यावरच पडतो मार .

       सदाशिव बहिणींच्या लग्नासाठी खूपच काळजीत होता. बहिणी पाहायला बऱ्या असून सुद्धा हुंड्या पाई लग्नच जुळत नव्हते. बहिणींचे वय वाढत होते. जसजसे दिवस जात होते तसतसे सदाशिवची श्वासांची गतीही वाढत होती. काय करावे कुठून आणावा हुंड्याचा पैसा काही उपायच दिसत नव्हता. लग्नालाही खर्च लागणारच होता. दोघींचेही लग्न सोबत जुळवून एकाच मांडवात झाले तर ते त्याला परवडणारे होते. पण नशिबाने तशी साथ मिळायला हवी होती.

       अचानक एक दिवस बाबाराव निरोप घेऊन आले. उद्या पाहुणे येणार. मुलगा नागपूरला नोकरी करतो. एक छोटा भाऊ आहे. तोही नागपूरलाच नोकरी करतो. सदाशिवला आशेचे किरण दिसले. त्याने पाहुण्यासाठी चहा पोहे ची व्यवस्था करून ठेवली. आजूबाजूच्या खुर्च्या जमा केल्या. घर छोटे असल्याने अंगणातच बसायची व्यवस्था केली. हे स्थळ आता जाऊ द्यायचे नाही असा पक्का निर्णय केला. घरातही त्याने सगळ्यांना बजावले. सगळं वयवस्थित व्हायला पाहजे. कोणत्याही परिस्थितीत लग्न जुळलेच पाहिजे. 

       दुसऱ्या दिवशी पाहुणे पोचले. चहा, पोहे आटोपले. पहाणीचा कार्यक्रम आटोपला. पाहुण्यांनी आपली पसंती दर्शवली. पुढची बोलणी सुरू झाली. मुद्दा हुंड्यावर आला. मूलाकडच्यानी पाच लाखाची मागणी केली. सदाशिवला तर घामच फुटला. त्याला काय बोलावे सुचेच ना. त्याने पाहुण्यापुढे हात जोडले आणि म्हणाला. भाऊ साहेब माह्या परिस्थितीचा थोडा इचार करा जी. इतका पैसा कुठून आणीन मी. माह्या बहिणीले पदरात घ्या. जे काही होईन थे मी करतो जी. पर इतका पैसा कसा जमन , थोडा इचार करा भाऊ साहेब.  मले अजून एक जबाबदारी पार पाडाची हाये. थे बी पाहा लागण जी. महावर उपकार करा जी, जन्मभर मी तुमचा दास होऊन राहीन जी.  सदाशिवची ती लाचारी बघून घरात आई, बहिणी, बायको सगळ्यांच्या डोळ्यात पाणी तरळत होते. मुलाकडचे काहीच ऐकायला तयार नव्हते. ते पाच लाखावर अडूनच बसले होते. सदाशिवने मग आशाच सोडली. आणि मग तो  पाहुण्यांना म्हणाला जाऊ द्या भाऊसाहेब नशिबात जे असं ते होईन. मी दीड लाख देईन, कसही करून मी एवढं जमवतो, पण या उपर काही मी काही देऊ शकत नाही. बसा चहा घ्या आन मग निघा पायजे त , असे बोलून त्याने घरात परत चहा ठेवायला सांगितले. त्याचे निर्वाणी चे शब्द ऐकून मुलाकडचे लोक गोंधळले. त्यांना पण वाटायला लागले आता सोयरीक तुटते. सगळे चूप होते. तेवढ्यात चहा आला. चहा होताच सदाशिवने पान सुपारी समोर केली. आणि पाहुण्यांना हात जोडले. कुणाच्याच तोंडातून शब्द निघत नव्हते. शेवटी सदाशिवचा दोस्त मधुकर बोलला. पहा भाऊसाहेब पैसा काय आज येईन उद्या जाईन, पर सबंध झाला त थो आयष्यभर राहीन, इचार करा तुम्ही. म्हणत असान त कुंकू बलावतो. पोराले कुंकू लावून टाकू. मंग आरामात लग्नाची तारीख काढत राहू. सगळे एकमेकांकडे बघत होते. कोणीच बोलत नव्हते. मग मधूकरच बोलला, सदा बोलाव गा कुंकू. मग मुलाला टिकला लागला. लग्न पक्के झाले.

        मग पाहुण्यांनीच एक अजून प्रस्ताव पुढे केला , तुमची लहान बहीण आमच्या लहान पोराले दाखवा, जमलं त इथंच दुसरं बी फायनल करून टाकू. तसा सदाशिव घरात गेला आणि आपल्या लहान बहिणीला सोबत घेऊन आला.  लहान मुलाची मुलीची पसंती झाली. परत गोष्ट हुंड्यावर आली. तसा मधूकरच बोलला,  जे सदान मोठ्या बहिणीले दिलं तेच छोटी ले बी देइन. सांगा लावाचा का टीका. परत कोणी बोलत नव्हतं. सगळे शांत झाले होते. मग मधुकर स्वतःच बोलला आणा कुंकू , हे बी फायनल करून टाकू. सदा आन भाऊ कुंकू.  मग लहान मुलाला पण टीका लागला. एकाच बैठकीत, एकाच घरात दोन्ही बहिणींचे लग्न जुळले. सदाशिवला आनंद तर झाला पण मोठी चिंताही लागली. एवढे पैसे आणायचे कुठून तीन लाख हुंड्याचे आणि कमीतकमी दोन लाख बाकीचा खर्च. सगळं मिळून पाच लाख लागणार होते. पाहुणे परत जाताच सदाशिव तर डोकेच धरून बसला.

       पैशाच्या जमवाजमविचा हिशोबच लागत नव्हता. सदाशिवला काहीच सुचत नव्हते.  आधीच सावकाराचे देणे बाकी होते. आता परत तो कसा देईल ही चिंता होती. घरात तर एकही पैसा नव्हता. बायकोचे काही दागिने होते, त्यांची किंमत किती होईल ते बघायला पाहिजे होते.
काही दोस्त मित्र थोडी मदत करतील पण  त्यांचेही पैसे मग परत करावे लागतील. सदाशिवला खूपच चिंता लागली होती.  त्याला रात्री झोप सुद्धा लागत नव्हती.

       हळूहळू लग्नाचा दिवस जवळ आला. मुलाकडे तीन लाख पोचले होते एक लाख देणे बाकी होते.कपडे, किराणा, मंडप डेकोरेशन सगळंच उधारीत होत.  लग्नाच्या चार दिवस अगोदर मुलाकडून फोन आला. ते पैशाची चौकशी करत होते. सदाशिव लाचारीने त्यांना थोडं थांबायचं सांगत होता. पण ते लोक ऐकायलाच तयार नव्हते. हुंड्याची रकम पूर्ण दिली नाही तर दोन्ही नवरदेव मांडवात येणार नाही असे सांगत होते. सदाशिवला मार्गच दिसत नव्हता. तो परत सावकाराकडे गेला. सावकाराने पिकासकट जमीन गहाण करण्याचा सल्ला दिला. सदाशिवचे मन तयार होत नव्हते. पण दुसरा काहीच पर्याय दिसत नव्हता. त्याने सावकाराकडे शेवटी शेती गहन केली आणि पैसे घेऊन मुलाकडे पोचला. पैसे देऊन परत आपल्या गावाकडे निघाला. पण त्याला घरी जायचीच इच्छा होत नव्हती. आता घरी काय सांगायचे हा प्रश्न त्याला पडला शेती गहाण झाली. यंदाचे तोंडावर आलेले पीकही सावकार नेणार. मग करायचे काय. बाकी देणे कुठून पूर्ण करायचे . काहीच सुचत नव्हते. सदाशिव कसा बसा घरी पोचला. शरीरात ताप भरला होता. लग्न दोन दिवसावर होते. त्याने सगळा धीर एकवटला आणि तयारीला लागला.

        लग्न पार पडले. बहिणी सासरी गेल्या . आणि सदाशिवचा ताप अंगावर निघाला. तो तीन दिवसांपासून बेशुद्ध पडला होता. कशाचीच शुद्ध नव्हती. घरात आई वडील बायको मुलं सगळे चिंतेत होते. सदाशिवला दवाखान्यात नेणे आवश्यक होते. पण घरात तिकिटाचेही पैसे नव्हते.  सदाशिव खाटेवर निश्चल असा पडलेला होता. बायको सारखी रडत होती. शेवटी तिनेच लग्न झालेल्या आपल्या नंदेला फोन लावला. आणि सदाशिवचे काही खरे नाही. तुम्हा बहिणींना शेवटचे भेटायचे असेल  तर जशा आहात तशा निघा आणि पोहचा. बहिणींनी त्यांच्या घरी सगळी हकीकत सांगितली. सगळे सदाशिवला भेटायला निघाले . मोठ्या बहिणीच्या नवऱ्याचे मन द्रवले. त्याने सोबत डॉक्टर ला घेतले. डॉक्टर ने ही चौकशी करून औषध सोबतच घेतले. सगळे सादाशिवच्या घरी पोचले. सदाशिव बेशुद्धच होता. डॉक्टरने ताबडतोब आपला उपचार सुरू केला , सलाईन लावले. आता थोडी सदाशिवची हालचाल होत होती. पण अशक्तपणा खूप आला होता. पण सदाशिव मरणाच्या दारातून परत आला होता. मूलाकडच्यानीच सगळी चौकशी करून . सावकाराचे सम्पूर्ण देणे फेडले आणि शेताचे गहानपत्र परत आणले.  ते सदाशिवला ला देऊन आपण केलेल्या चुकीची माफी मागितली.

       सदाशिवचे संकट कमी झाले होते. त्याला दोन्ही जावई देवच वाटायला लागले होते.
Sanjay Ronghe
Nagpur

” उत्तर फक्त एक “

प्रश्न किती अनेक
उत्तर फक्त एक ।
आहे जगायचे मला
विचार किती नेक ।

जगण्यासाठी सारी
चढाओढ चाले ।
हाती कुणाच्या पुष्प
तर कुणाच्या भाले ।

वादळ वारे येती
देऊन दुःख जाती ।
उरते काय शेवटी
या रिकाम्या हाती ।

घेतो वेचून क्षण
काही थोडे सुखाचे ।
आसवं सुकून गेली
करू काय दुःखाचे ।
Sanjay R.

” नको प्रश्न नको उत्तर “

प्रश्नाला हवे उत्तर
प्रश्न कुठे थांबतो ।
उत्तरावरच तर
प्रश्न अजून लांबतो ।

येतात कुठून विचार
प्रश्न आहे मनाला ।
उत्तरही देते मन
सांगायचे मग कुणाला ।

अधीर होते कधी
होते विवश हे मन ।
नसते उत्तर प्रश्नाला
ओठ होतात मम् ।

नको प्रश्न नको उत्तर
खेळ हा विचारांचा ।
सुख आनंद शोधतो
मिळतो कल मनाचा ।
Sanjay R.

” काहूर म्हणू की पूर “

काहूर म्हणू की पूर
लागेना कशाचा सूर ।
लागली आग अंतरात
निघतो कुट्ट काळा धूर ।
कोण कशास कळेना
का असे इतका आतुर ।
मी मी म्हणतो मलाच
इतका का मी चतुर ।
Sanjay R.

” दुःखाला कुठे अंत “

दुःखाला आहे कुठला अंत
पुरावा हाच आहे मी जिवंत ।

खळखळाट त्या डोहात
पाणी वाटते जरी संथ ।

भोग भोगतो मी जन्माचे
वाटेना आता कशाची खंत ।

गिळून मूग मी बसलो आता
संपेल जेव्हा मी होईल शांत ।
Sanjay R.

” काहूर किती हे दाटले मनात “

काहूर किती हे दाटले मनात
सांगूं कसे तुजला मी शब्दात ।

विचार होतील व्यक्त कागदात
भावना कशा येतील लेखणीत ।

सूर गवसेना माझ्या या ओठात ।
मूक झालेत सारे, सांग कानात ।

जीवनाला तर हवी थोडी किनार
तुझ्याविना निरस सारे जगण्यात ।
Sanjay R.

आला दसरा दिवाळी येणार

आला दसरा दिवाळी येणार
चुन्नू मुंनू नवीन कपडे घेणार ।

घराला झाली रंग रंगोटी ।
दिवाळी करायची यंदा मोठी ।

मागची दिवाळी घरातच गेली
सगळी खुशी कोरोनाने नेली ।

मिठाई फटाके सगळंच आणू
आईही करेल नवीन काही मेनू ।

यंदा जायचेच मामाच्या गावी
मिरवायला थोडी हौसच हवी ।

लुटायची खूप दिवाळीची मजा
शाळेत गेल्यावर असेल सजा ।
Sanjay R.

नेमकच गेलं राहून

काय काय सांगणार
नेमकच गेलं राहून ।
दिवस झालेत ना खूप
देवा तुला रे पाहून ।
उघडलेत आता दरवाजे
यावे म्हणतो मी जाऊन ।
दर्शनाची ओढ मनात
वाटतं यावं आता धावून ।
रागावू नको देवा आता
घेऊ नको मनास लावून ।
व्याकूळ सारेच भक्त तुझे
घेशील तूच सांभाळून ।
Sanjay R.

आठवण करत नाही कोणी

आठवण येताच का
लागते हो उचकी
सांगेल का कोणी ।

म्हणून  वाटते मला
नकोच मनात आता
जुन्या त्या आठवणी ।

खबरदारीचा उपाय
येकच असा त्यावर
पिऊन घेतो पाणी ।

तेव्हा पासून सांगतो
आठवण माझी
करत नाही कोणी ।
Sanjay R.



” ज्ञानाची मज दिली वाणी “

मनात गुरूंचा आदर
नमन त्यांनाच सादर ।

मी घडलो जडलो जसा
गुरू शिष्य परंपरेचा वसा ।

निर्बुद्धाला तुम्ही केले ज्ञानी
ज्ञानाची मज दिली वाणी ।

केला उभा मज पायावरती
ऋण तुमचे हे कधी न सरती ।

गुरू वीणा तर शिक्षा अधुरी
तुम्हीच केली ती इच्छा पुरी ।

किरण आशेचा आम्ही बघतो
तुमच्या पुढेच  माथा झुकतो ।
Sanjay R.

” आठवणी “

आठवणीच तर देई
क्षणाचा दिलासा ।
टाकतो कधी मग
श्वासात उसासा ।

येते कधी असेच
मुखावर हास्य ।
तर कधी डोकावते
डोळ्यात आसवं ।

सोडू कसे  सांग
त्या आठवणींना ।
त्याच तर आहेत
सोबती मनाच्या ।

आयुष्याची साथ
भासे सुखाच्या ।
झेलतात वेदना
माझ्या हृदयाच्या ।
Sanjay R.

” आयुष्याचे गणित अवघड “

विचार करण्यास सवड नाही
आयुष्याचे गणितच अवघड ।

दिवस रात्र घालतो पालथी
जगण्यासाठीच सारी धडपड ।

बोलू कुठे मी सांगू कुणाला
निश्फळ होते सारी बडबड ।

कष्टाविना तर मिळेना काही
जीवन झाले सारेच गडबड ।
Sanjay R.

वाट किती मी पाहू

गुलाबी साडीला
हिरवी किनार ।
सांगा ना आता
कशी मी येणार ।

नाकात नथनी
कमरेला पट्टा ।
करू नका हो
अशी माझी थट्टा ।

हातात माझ्या
हिरवा चुडा ।
बांधलाय बघा
केसांचा जुडा ।

पदर माझा
हवेत उडला ।
तुम्हावर माझा
जीव हा जडला ।

धडधड होते
जीवाची माझ्या ।
नजर माझी
वाटेवर तुझ्या ।

सजून धजून
वाट किती पाहू ।
तुझ्या विना मी
सांगा कशी राहू ।
Sanjay R.

सूर्याने मज केले जागे

स्वप्न तुझे ते गोड किती
फुलली मनात माझ्या प्रीती ।

वाटे मजला सांगू कसे मी
स्वप्नात अपुली जुळली नाती ।

हरवून गेलो कुठे कसा ग
हात तुझा मी घेऊन हाती ।

रातराणीच्या गंधात न्हालो
हसत होता चंद्रही राती  ।

सुर्याने मज मग केले जागे
आभास सारे अनोखी प्रीती ।
Sanjay R.

” एक स्वप्न अनोखे “

पाहिले मी पहाटेस
एक स्वप्नच अनोखे ।
गर्दीत अडकलो मी
सोबतीला तुही सखे ।

आली गळ्यात कोरड
सावली मज का रोके ।
निघेना शब्द मुखातून
चहूकडे फक्त धोखे  ।

गेलीस निघून तू दूर
जगणेच वाटे फिके ।
आवाज तुझा ऐकून
पकडले मीच डोके ।
Sanjay R.

दिसे तेज

कोण कशात तरबेज
चेहऱ्यावर दिसे तेज ।
इतिहास बघा जरा
भविष्याला एक पेज ।

वाहवा होईल सारी
आहे बदलायचा आज ।
विजयाचा वेगळा बाज
असेल वेगळा अंदाज ।
Sanjay R.

” सत्य टाकतो पुरून “

सत्य टाकतो पुरून
अफवांचा येता पूर ।
खोट्याचा बोल बाला
लागे दुष्टांचा सूर ।

स्वप्न सुखाचे जिथे
दुःखात होते चुर चुर ।
रक्ताचे वाहती पाट
दुष्ट इथले आतुर ।

भ्रष्टच झाली बुद्धी
होते किती ते चतुर ।
झाले सारे इथे आता
नरभक्षक आसुर ।

उरली कुठे दया माया
माणुसकी तर दूर ।
असत्त्वच मिटले सारे
जिकडे तिकडे धूर ।
Sanjay R.

नाविक

नाविक मी या नौकेचा
जीवन हा अथांग सागर ।
दूर शोधतो मी तो किनारा
पोटाला हवी एक भाकर ।
Sanjay R.

” उरले आता मरण “

देऊ नकोस वेदना
करू किती मी सहन ।

झाले दुःख अपार
होईल कधी हे दहन ।

वेचतो आता मी
माझ्यासाठीच सरण ।

नाही विश्वास उरला
झाले सुखाचे हरण ।

अंतरात बघ वाकून
तिथे दुःखाचे भरण ।

भरला कुंभ शिगेला
उरले आता मरण ।
Sanjay R.