” दिवाळी दसरा “

     आज दसरा आहे, पण वाटतच नाही दसरा आहे म्हणून. मन अशांत होतं. नेहमी दसऱ्याचा जो उत्साह असतो तो वाटतच नव्हता. सम्पूर्ण नवरात्र घरातच गेले होते. ना दुर्गादेवीचा उत्साह ना दांडियाचा जल्लोष. सगळं कसं शांत शांत गेलं होतं. उठल्या बरोबर गाडी धुवायला घेतली. हेच सगळ्यांच मुख्य वाहन झाले होते.  त्याचीच आज पूजा करायची होती.  वाहन पूजा हे दसऱ्याचं मुख्य कार्य असते. सो सकाळीच तयार होऊन बाजारात गेलो, अगदीच तुरळक दुकानं थाटली होती. झेंडूची फुलं , आंब्याची पानं आणि आपट्याच्या पानांचं सोन पण विकायला होत. दसऱ्याला या आपट्याच्या पानांना विशेष महत्व असते. सायंकाळी सगळे ही पानं सोनं घ्या सोनं घ्या म्हणून एकमेकांना देतात आणि आपले नाते घट्ट करतात.

     म्हटलं चला सोनं घेऊ या. आजची सायंकाळ मस्त जाईल हा विश्वास होता, थोरामोठ्यांना सोनं देऊ आणि त्यांचे आशीर्वाद घेऊ. नेहमीसारखीच वर्दळ होईल. सगळ्यांच्या गाठी भेटी होतील. सगळ्यांचा हाल अहवाल मिळेल.  ही अपेक्षा होती. सायंकाळ कशी मस्त जाणार होती. दर वर्षी नवरात्रीचे नऊ दिवस कशे जायचे ते कळतच नव्हते. शहरात सायंकाळी अगदी जत्राच भरायची.
आणि नटून थटून दांड्या खेळण्यात वेळ किती निघून जायचा ते काळायचेच नाही. यंदा मात्र ते सारं करताच आलं नव्हतं.

     झेंडूची फुल, सोनं, आंब्याची पानं आणि इतर काही वस्तू घेऊन मी घरी आलो. बसून छान झेंडूच्या फुलांचे हार तयार केले. त्यात हिरवी हिरवी आंब्याची पानं घातली. मनात उत्साह भरला. दाराला तोरण लावले हार चढवला. गाडीला पण एक हार चढवला. देवाच्या फोटोला हार घातले. घरातले होते नव्हते सारे शस्त्र म्हणजे खल बत्ता, कांदे कापायची पावशी, चाकू, किसनी, सांशी सराता काढले, मस्त धुवून त्यांना देवासमोर मांडले आणि मनोभावे शस्त्र पूजा केली. आजकाल शस्त्रपूजा या शस्त्रांचीच होते, रणांगणात युद्ध करताना लागणारे तलवार, भाले, बिचवे उरलेच कुठे होते. ते सर्व आता इतिहास जमा झाले होते. आणि आम्ही कुठे रणांगणात लढाईला जाणार. घरात कांदा कापताना होते तीच आमची लढाई असते. त्या युद्धात किती अश्रू निघतात हे आम्हालाच ठाऊक.  कधी कधी तर डोळे पण सुजतात या खोट्या रडण्याने. हाच आमचा महापराक्रम असतो.

     घरात पुरी भाजी चा बेत सुरू होता. नैवेद्याला गोड म्हणून खमंग तुपातला शिरा भाजणे सुरू होते. त्याचा सुगंध हवा हवासा वाटत होता. दुपारी देवाला नैवेद्य करून जेवण आटोपले. आणि आरामात घर सजवायला घेतले. सगळ्या वस्तू व्यवस्थित धुवून पुसून जागच्या जागी ठेवल्या. थोडी स्वच्छता केली. सायंकाळी लोक येतील तेव्हा सगळं कसं टाप टीप दिसायला हवं. करता करता बराच वेळ गेला. मनात उत्साह संचारला होता.

     सीमोलंघनाला जायची वेळ झाली. थोडे नवीन असलेले कपडे घालून तयार झालो. कपाटात ठेवलेला परफ्युम काढला. दोनदा तीनदा अंगावर उडवला. सुगन्ध छान येतोय याची खात्री करून घेतली. थोडा घरात पण शिंपडला. सगळे घर सुगंधित झाले होते.  मधेच बायको बोलून गेली. अहो हे कशाला मारलं, आता माझं डोकं दुखणार, तुम्हाला माहिती आहे ना मला याची एलर्जी आहे ते. तरी मी ते आलमारीत लपवून ठेवले होते. तिथे पण तुम्ही शोध लावलाच. मी थोडा खजील झालो. पण म्हटलं अग आज दसरा आहे सो उत्साह भरायला नको का सम्पूर्ण घरात. आजच्या दिवस चालवून घे. पंखा चालू करतो. थोड्या वेळात कमी होईल गन्ध. तुला त्रास नाही होणार.

     बायकोला मी बाहेर जातोय हे सांगून मी बाहेर पडलो. सीमोल्लंघनाला… कुठे जायचे काहीच ठरवले नव्हते. दरवर्षी दसरा ग्राऊंडला दसरा भरतो तिकडेच जायचे ठरवले आणि बाहेर रस्त्यावर आलो तर गर्दी खूपच तुरळक दिसत होती. सगळे लोक कदाचीत घरी परतणारेच असावेत असे वाटत होते. दरवर्षी सीमोल्लंघनाला जाणारी ती गर्दीच दिसत नव्हती. सगळं कसं शांत शांत भासत होतं. तरीही मी आपला चालत राहिलो. तसाच चालत चालत गावाच्या बाहेर  वेशी जवळ दसरा ग्राऊंडला पोचलो.  तिथे माणसांचा अगदी शुकशुकाट वाटत होता . सूर्यही परतीला पोचला होता. दरवर्षी लागणारी खेळण्यांची दुकानं, लहान मोठ्यांची गर्दी  गडबड गोंधळ , काहीच नव्हतं. रावण दाहणाचीही काहीच तयारी नव्हती. मी तसाच माघारी परत घरी पोचलो.

     आता थोडा अंधार पडला होता. घरात येताच हात पाय धुवून देवाला नमस्कार केला. पाहिले सोने देवाला द्यायचे या नियमाने देवाला सोने दिले. नमस्कार केला. बायकोनेही मला सोने दिले. नमस्कार करून आता सगळ्या बाहेरच्या थोरामोठयांना सोने द्यायला आपण मोकळे आहोत असे म्हणून हॉल मध्ये आलो.

     आज आई बाबांची आठवण येत होती. दरवर्षी त्याना सोनं द्यायचो आणि ते भरभरून आशीर्वाद द्यायचे ते आठवलं. ते जाऊन आता चार वर्षे झाली होती पण आठवण मात्र सुटत नव्हती. आठवण आली की सगळंच आठवायचं. आपलं लहानपण ते मोठं होईस्तो त्यांनी आपली घेतलेली काळजी, त्यांचे लाड प्रेम आणि कौतुक. आता त्यातलं काहीच उरलं नव्हतं.  मन हळवं झालं. बायकोनेही माझ्या मनात काय चाललं ते ओळखलं . आणि तीही हळवी झाली. वातावरण आनंदी व्हावं म्हणून ती बोलली चला आता लोकं येतील. थोडा चेहरा मोहरा बदला. थोडे आनंदी दिसा. चला तयारी करा आता.

     आम्ही दोघेही तयार झालो आणि वाट बघत बसलो सोनं वाटायची. बराच वेळ निघून गेला पण यंदा कोणीच कोणाकडे सोनं द्यायला आलं नाही की गेलं नाही. मन खिन्न झालं. दुधाची तहान ताकावर काढावी तसा मोबाईल घेऊन सासरे बुवांना फोन केला. त्यांना शुभेच्छा दिल्या. अजून दोन तीन कॉल केले. मग आम्हीही कपडे बदलून घेतले. मधेच बायको विचारून गेली जेवण करणार का. जेवायचाही मुडच गेला होता. सगळंच नको वाटत होतं. मन खिन्न झालं होतं. मग तशेच झोपायला गेलो.

     शेवटी बायकोच बोलली हे पूर्ण वर्षच कोरोनाने आपल्या विळख्यात घेतलं. सगळं आयुष्यच थांबवलं. माहीत नाही कधी जाणार हा कोरोना.
ना दसरा ना दिवाळी… घ्यायची फक्त कोरोनीलची गोळी …. जाऊ द्या जातील हेही दिवस.. आणि मग परत एकदा सगळे आनंदी होतील… पुढल्या वर्षी करू या छान आनंदात साजरी दसरा दिवाळी…
विचार करता करताच झोप केव्हा लागली कळलेच नाही.

संजय रोंघे
नागपूर

Leave a Reply

Fill in your details below or click an icon to log in:

WordPress.com Logo

You are commenting using your WordPress.com account. Log Out /  Change )

Twitter picture

You are commenting using your Twitter account. Log Out /  Change )

Facebook photo

You are commenting using your Facebook account. Log Out /  Change )

Connecting to %s

This site uses Akismet to reduce spam. Learn how your comment data is processed.